तिच्या कवितांमध्ये केवळ एका विशिष्ट भागाचे, भाषेचे वा स्थानिक प्रश्नांचे प्रतिबिंब पडलेले नाही; तर त्यामध्ये संपूर्ण मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच १९९६ सालचा साहित्यविषयक नोबेल पुरस्कार तिला मिळाला. या पोलिश कवयित्रीचे नाव होते विस्लावा सिम्बोर्सका. तिला नोबेल पुरस्कार बहाल करताना स्वीडिश अकादमीने म्हटले की सिम्होर्सका यांच्या कविता मानवी जीवनातील सत्याच्या इतिहासाबरोबरच जैविक संदर्भाच्या बाबतीतही तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत.
विस्लावा सिम्होर्सका हिचा जन्म २ जुलै १९२३ रोजी प. पोलंडमधील बिन या शहरात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ती क्रेको येथे गेली. तेथील विद्यापीठात तिने पोलिश साहित्य व समाजशास्त्राचा सुमारे तीन वर्षे सखोल अभ्यास केला. त्यानंतर १९५३ मध्ये ती क्रेकोनमधील ‘जिसी लिटरेकी’ या नामवंत साहित्य पत्रिकेच्या कविता विभागाची संपादक बनली, त्या पत्रिकेतच तिचे स्तंभलेखनही सुरु झाले. तिच्या कविता हळूहळू प्रसिद्ध होऊ लागल्या व त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे थोड्याच दिवसात तिचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. तिच्या पहिल्या दोन काव्यसंग्रहामध्ये प्रामुख्याने स्टॅलिनवाद व तत्कालीन राजकारणाची मार्मिक टिप्पणी करण्यात आली होती परंतु नंतर तिच्या कवितांमध्ये प्रामुख्याने बालपण, मातृत्व, तसेच स्त्रीच्या इतर समस्यांवर भर देण्यात आला होता. तिला याबद्दल जेव्हा विचारले तेव्हा ती स्पष्टपणे म्हणाली की कोणी माझ्या कवितांना ‘स्त्रीच्या कविता’ म्हटले तर मला त्याचे मुळीच वाईट वाटणार नाही आणि त्याबाबत माझी चर्चा करण्याचीही इच्छा नाही.
तिच्या कवितांसाठी जेव्हा साहित्याचे नोबेल जाहीर करण्यात आले तेव्हा एका समीक्षकाने म्हटले की तिच्या कविता जुन्या फॅशनच्या असतीलही परंतु त्या विसाव्या शतकातील युरोपियन कवितांचा आवाज आहेत. त्यामुळे ती केवळ पोलिश कवयित्री नाही, तर संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारी कवयित्री आहे. सिम्बोर्सका यांच्या कवितांचे अंतरंग एवढे विशाल आहे.
Leave a Reply