१९५६ सालातील गोष्ट आहे. ‘सी.आय.डी.’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तो बाॅक्सऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला. त्यानिमित्ताने गुरुदत्त यांनी, चित्रपटाच्या दिग्दर्शकाला एक आलिशान कार भेट दिली. त्या दिग्दर्शकाचं नाव होतं. राज खोसला!!
३१ मे १९२५ रोजी पंजाब मधील एका गावात, राज यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर, राजला आपण पार्श्र्वगायक व्हावं असं वाटू लागलं. त्यासाठी त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरी स्वीकारली. मात्र माणूस ठरवतो एक आणि होतं वेगळंच. या उक्तीनुसार राजची, देव आनंदशी भेट झाल्यावर त्यानं राज यांना गुरुदत्त यांचा सहदिग्दर्शक होण्याचा सल्ला दिला.
‘मिलाप’ या देव आनंद व गीता बालीच्या पहिल्या चित्रपटाचं अपयश, त्याच्या ‘सी.आय.डी.’ या चित्रपटानं धुवून काढलं. त्यानंतर राज खोसला यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांच्या एकाहून एक सरस अशा यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरु झाली.
‘काला पानी’, सोलवाॅं साल’, ‘बंबईका बाबू’, ‘वो कौन थी’, ‘दो बदन’, ‘मेरा साया’, ‘दो रास्ते’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘कच्चे धागे, ‘शरीफ बदमाश’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’, ‘दोस्ताना’, इत्यादी. चित्रपटांनी राज खोसला यांचं नाव नामवंत दिग्दर्शकांमध्ये गणलं जाऊ लागलं.
राज खोसलांनी चित्रपटातील नायिकांना विविध भूमिका देऊन त्यांचं सर्वोत्तम सादरीकरण केलं. त्यांना संगीताची उत्तम जाण असल्यामुळे, गाण्यांच्या चित्रीकरणाची त्यांची खासियत होती. पटकथेतील प्रसंगानुसार त्यांनी प्रत्येक गाणं हे अजरामर केलेलं आहे. आजही ‘सी.आय.डी.’ मधील ‘लेके पहला पहला प्यार.’, ‘काला पानी’ मधील मधुबालाचं ‘अच्छा जी मैं हारी.’, ‘बंबईका बाबू’ मधील सुचित्रा सेनचं ‘देखने में भोला है.’, ‘वह कौन थी’ मधील साधनाचं ‘लग जा गले.’, ‘मेरा साया’ मधील ‘तू जहाँ, जहाँ चलेगा.’, ‘दो रास्ते’ मधील ‘ये रेशमी जुल्फे.’, ‘मेरा गाव मेरा देश’ मधील ‘कुछ कहता है ये सावन.’ ‘दोस्ताना’ मधील ‘बने चाहें दुश्मन जमाना हमारा.’ अशी असंख्य गाणी कुणीतरी विसरणं शक्य आहे का?
‘बंबईका बाबू’ नंतर तेरा वर्षांनी राज खोसला यांनी देव आनंद सोबत ‘शरीफ बदमाश’ हा चित्रपट केला, मात्र त्याला फारसं यश मिळालं नाही. देव आनंद यांनी ‘गाईड’ चित्रपटासाठी राज खोसलाचा विचार केला होता. परंतु वहिदा रेहमान हिनं, दिग्दर्शक राज खोसला असतील तर मी काम करणार नाही, असं देव आनंद यांना स्पष्ट सांगितलं. राज खोसला त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचा क्लायमॅक्स पटकथेनुसार न करता त्यांच्या कल्पनेने करायचे. सहाजिकच चित्रपट यशस्वी होत असे. विशेषतः ‘मेरा गाव मेरा देश’ मधील शेवटची धर्मेंद्र व विनोद खन्नाची फायटिंग, ही त्यांच्या खास पद्धतीने चित्रीत केलेली आहे. एकदा चित्रपटाचे नियोजन सहदिग्दर्शकाला सांगितले की, राज खोसला सेटवर न थांबता त्यांची इतर कामं करीत असत. ‘दासी’ चित्रपटाचे वेळी मौसमी चटर्जी, राज नाहीत म्हणून काम न करता तशीच बसून राहिली होती. सहदिग्दर्शकांनी राज यांना बोलावून घेतले. राज सेटवर आले व मौसमीची कानउघडणी केली. तेव्हापासून कोणत्याही कलाकारांनी राज सेटवर हवेतच, असा आग्रह धरला नाही. राज खोसला यांना त्यांचा एखादा चित्रपट यशस्वी झाला की, पुन्हा त्याची काॅपी करण्याची सवय होती. ‘मेरा गाव मेरा देश’ नंतर त्यांनी तसाच ‘कच्चे धागे’ केला होता. प्रेम चोप्राला, ‘वो कौन थी’ मध्ये, बिंदूला ‘दो रास्ते’ मध्ये, ‘कच्चे धागे’ मध्ये मौसमी चटर्जीला राज खोसला यांनीच ब्रेक दिला होता.
‘मेरा गाव मेरा देश’ चित्रपटाचे वेळी महेश भट्ट, राज खोसलांचे सहदिग्दर्शक होते. या शुटींगच्या दरम्यान विनोद खन्ना व महेश भट्ट यांची जिवलग मैत्री झाली. संजय दत्तच्या पदार्पणातील ‘राॅकी’ चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना सुनील दत्त यांना नर्गिसच्या उपचारासाठी वारंवार परदेशात जावं लागे. तेव्हा राज खोसला यांनी मैत्रीला जागून, उर्वरित चित्रपट पूर्ण केला.
‘दोस्ताना’ चित्रपटानंतर केलेल्या त्यांच्या चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही. त्या अपयशामुळे ते नैराश्यात गेले. ८४ सालातील ‘मेरा दोस्त मेरा दुश्मन’ चित्रपटाच्या अपयशानंतर पुढील सात वर्षे त्यांनी स्वतःला व्यसनात बुडवून घेतलं. परिणामी तब्येत ढासळत गेली. ९ जून १९९१ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी हा गायक होऊ इच्छिणारा परंतु पटकथा संवादावर हुकूमत असणारा, श्रेष्ठ दिग्दर्शक मायानगरी सोडून गेला.
राज खोसला गेल्यानंतर त्यांची मुलगी सुनीता खोसला भल्ला, हिनं ‘राज खोसला फाउंडेशन’ची स्थापना केली. त्याचे चेअरमन शत्रुघ्न सिन्हा आहेत व इतर अनेक नामवंत कलाकार इतर पदांवर कार्यरत आहेत.
राज खोसला यांना जाऊन ३१ वर्षे झाली. त्यांची अजरामर गाणी पाहून जर उद्या कुणी विचारलं, ‘वो कौन था?’ तर आमच्या पिढीतील सिनेरसिक अभिमानानं सांगतील. ‘वो, ‘दी बेस्ट’ डायरेक्टर था!’
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३१-५-२२.
Leave a Reply