हळवेपण ही भावना साधारण स्त्रियांशी संलग्न असते. पण ठरविले तर एखादा पुरुष उत्कट हळवा होऊ शकतो याचा थरार आणणारा अनुभव किशोर देतो ” वो शाम कुछ अजीब थी ” या ओळींना जिवंत करून !
” खामोशी ” हा जीवन-मरणाचा उत्सव होता. पोरगेलासा राजेश खन्ना, त्यामानाने थोराड वहिदा आणि पाठमोरे पुसट अस्तित्व देणारा सिनिअर कलाकार धर्मेंद्र ! गुलज़ार ,हेमंतदा आणि सर्वच टीम एक नजाकतभारी कलाकृती निर्माण करण्यात यशस्वी झाले. वैद्यकीय गुंतागुंतीची ही कहाणी -शक्यतो दवाखान्यात घडणारी ! गोठणारे वातावरण, सर्वदूर गूढ शांतता, किचकट मानसिक घडामोडी यातून श्वास घेण्यासाठी राजेश आणि वहिदा नदीवरील बोट निवडतात आणि त्यांनी बरोबर आणलेले असतात पाण्यासारखेच नितळ किशोरस्वर !
राजेश स्वतःत मश्गुल, मोकळी हवा आत खोलवर भरून घेण्यात गुंतलेला – वहिदाकडे फारसे लक्ष देत नसणारा ! ती मात्र त्याचे शब्दनशब्द चेहेऱ्यावर दाखविणारी ! तिचा तितकाच तलम भावपूर्ण चेहेरा त्याच्या भावनांना कोरे पोर्ट्रेट पुरविणारा ! एखादा चित्रकार रंगाचे फर्राटे ज्या वेगाने आणि कुशलतेने कागदावर ओढतो, त्याच वेगाने वहिदाच्या चेहेऱ्यावरील भूत -वर्तमान-आणि भविष्याचे रंग ओघळतात. तिला फक्त सलाम करावासा वाटतो. अशाच सलामाची ती मानकरी ठरते – “गाईड” मधील नृत्य प्रसंगांमध्ये ! अर्थात तिचा इतरत्रही वावर तितकाच वाखाणण्याजोगा आहे पण आज एवढाच संदर्भ !
संध्याकाळची वेळ निवडण्याचे कारण माझ्या मते असे असावे – अंधार आणि उजेड बरेचदा आरोपांचे धनी असतात. संध्याकाळ नितळ, ओरखडे नसलेली असते. आकाश आणि धरित्री काही स्वीकारण्याच्या मूडमध्ये असते. राजेश अंतरंग मोकळे करण्याच्या मूडमध्ये असतो आणि वहिदा गुरफटलेली असते धर्मेंद्र आणि राजेशच्या केसमध्ये ! किशोर लाटांवर गुलजारचे शब्द आणि हेमंतदांची सुरावट आपल्या स्वरांमधून सोडण्यात स्वतःच हळवा होतो.
कदाचित स्वतःचे “असे ” क्षण आठवत असतील त्याला.
आपण सगळे त्या बोटीत आहोत असं सतत वाटत राहतं आणि या जाणिवेसाठी किशोरला शंभर टक्के मार्क्स द्यावे लागतीलच.
पांढऱ्या पडद्यावरील सगळे “गौरीशंकर” या “किशोरा “च्या समोर नतमस्तक होतात ते त्याच्या कर्तृत्वाच्या उंचीमुळे ! किशोर या व्यक्तीमत्त्वाला किती कंगोरे आहेत, हे आपल्याला माहीत आहे, पण त्याचे हळवे स्वर त्याहीपुढे जातात. नातं ही भावनेची जाणीव असते आणि त्यातूनच किशोरशी असलेल्या आपल्या नात्याला मला सलाम करावासा वाटतो.
अशा गाण्यांचं वय त्या गायकांच्या वयापेक्षा नेहमीच अधिक असतं. शब्द,चाल,वाद्य ,गायकी, पार्श्वसंगीत या साऱ्यांपेक्षा हे गीत “जीवनावर” भाष्य करतं आणि म्हणून ते अक्षर ठरतं .
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply