नवीन लेखन...

वूली मॅमथचा दूरसंचार!

वूली मॅमथ हा गेल्या हिमयुगातला, अंगावर केसाळ कातडी असणारा, एक प्रचंड आकाराचा सस्तन प्राणी होता. सुमारे पाच-सहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत जरी तो काही मोजक्या ठिकाणी तुरळक संख्येत अस्तित्वात असला तरी, दहा हजार वर्षांपूर्वीच तो जवळपास नामशेष झाला. गवत व इतर वनस्पतींवर गुजराण करणाऱ्या या शाकाहारी प्राण्याची उंची सुमारे तीन मीटर, म्हणजे आजच्या आफ्रिकन हत्तीइतकी होती. परंतु त्याचे वळणदार सुळे मात्र तीन मीटरपेक्षा अधिक वाढू शकत होते. उत्तरेकडच्या आर्क्टिक प्रदेशात वावरणाऱ्या या प्राण्यांचे अवशेष अमेरिकेतील अलास्का तसंच रशियातील सायबेरिआत सापडले आहेत. या अवशेषांवरून या प्राण्यांच्या शरीराचं स्वरूप जरी काही प्रमाणात कळू शकलं असलं तरी, या प्राण्यांच्या जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे सुमारे चार लाख वर्षं अस्तित्वात असणारा हा प्राणी संशोधकांच्या दृष्टीनं कुतूहलाचा विषय ठरला आहे. या वूली मॅमथच्या जीवनावर महत्त्वाचा प्रकाश पडू शकेल, असं संशोधन ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ अलास्का फेअरबँक्स या विद्यापीठातील मॅथ्यू वूलर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या या संशोधनावरून वूली मॅमथ हा मोठ्या प्रमाणात, दूरपर्यंत संचार करणारा प्राणी असल्याचं दिसून आलं आहे. या संशोधनाचं वैशिष्ट्य म्हणजे, या संशोधनाद्वारे एका वूली मॅमथच्या संपूर्ण आयुष्यभराच्या प्रवासाचा माग काढला गेला आहे… आणि तोही त्याच्या फक्त सुळ्याच्या आधारे!

‘युनिव्हर्सिटी ऑफ अलास्का म्यूझिअम ऑफ दी नॉर्थ’ या संग्रहालयात त्या भागात सापडलेल्या अनेक वूली मॅमथचे अवशेष जतन करून ठेवले आहेत. यात आर्क्टिक प्रदेशातील, ब्रूक्स रेंज या सुमारे अकराशे किलोमीटर पूर्व-पश्चिम पसरलेल्या पर्वतराजीत सापडलेल्या, एका वूली मॅमथच्या अवशेषांचा समावेश आहे. हे अवशेष सुमारे सतरा हजार वर्षांपूर्वीच्या वूली मॅमथचे आहेत. मॅथ्यू वूलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनात याच अवशेषांचा उपयोग केला गेला. हे अवशेष वूली मॅमथच्या नराचे असल्याचं त्यांच्या जनुकीय विश्लेषणावरून दिसून आलं आहे. या वूली मॅमथचा सुळा व्यवस्थित टिकून राहिला आहे. या सुळ्याची लांबी सुमारे अडीच मीटर इतकी आहे. वूली मॅमथ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं वय जसं वाढत जातं, तसं त्यांच्या सुळ्यांत काळागणीक नवेनवे थर जमा होऊन सुळ्याची जाडी वाढत जाते. त्यामुळे या प्राण्यांच्या सुळ्यांतील या थरांची संख्या मोजून त्यांचं वय समजू शकतं. (वृक्षांतील वाढचक्रांसारखाच हा प्रकार!) मॅथ्यू वूलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनातून, हा वूली मॅमथ अठ्ठावीस वर्षं जगला असल्याचं दिसून आलं.

सुळ्याच्या आत वयानुरूप जमा होणाऱ्या थरांतील विविध मूलद्रव्यांच्या आणि त्यांच्या समस्थानिकांच्या (एकमेकांच्या सापेक्ष) प्रमाणावरून, वूली मॅमथसारख्या प्राण्याचा प्रत्येक वर्षीचा आहार, त्या-त्या वर्षीचं हवामान, इत्यादींची माहिती मिळवणं शक्य असतं. समस्थानिकं म्हणजे एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळा अणुभार असणारे अणू. मातीत आढळणारं स्ट्रोन्शियम हे आहाराद्वारे प्राण्याच्या हाडांत आणि दातांत जमा होतं. या स्ट्रोन्शियममधील विविध समस्थानिकांचं सापेक्ष प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणच्या मातीत वेगवेगळं असतं. त्यामुळे वूली मॅमथच्या सुळ्यातील, एखाद्या विशिष्ट वर्षाच्या थरातील स्ट्रोन्शियमच्या समस्थानिकांचं मापन केलं तर, त्यावरून हा वूली मॅमथ त्यावर्षी कोणत्या प्रदेशात वावरला होता, याचा अंदाज बांधता येतो.

मॅथ्यू वूलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथम, वस्तूसंग्रहात जतन केलेल्या, अलास्कातील विविध ठिकाणच्या घुशी-उंदरांसारख्या प्राण्यांच्या दातांतील स्ट्रोन्शियमच्या समस्थानिकांचं प्रमाण मोजलं. हे प्राणी आपली राहण्याची जागा बदलत नाहीत; तसंच एखाद्या ठिकाणच्या मातीतील स्ट्रोन्शियमच्या समस्थानिकांच्या सापेक्ष प्रमाणातही दीर्घ काळ फरक पडत नाही. त्यामुळे या प्राण्यांच्या दातांतील स्ट्रोन्शियमच्या समस्थानिकांचं प्रमाण हे त्या प्राण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची ‘खूण’ मानता येते. ठिकठिकाणच्या अशा प्राण्यांच्या दातांतील स्ट्रोन्शियमच्या समस्थानिकांच्या प्रमाणावरून या संशोधकांनी, स्ट्रोन्शियमच्या समस्थानिकांच्या प्रमाणावर आधारलेला एक नकाशा तयार केला. त्यानंतर या संशोधकांनी, संशोधनासाठी निवडलेल्या वूली मॅमथच्या सुळ्याचे काळजीपूर्वक उभे दोन भाग केले. सुळ्याच्या अंतर्भागाचं निरीक्षण करून त्यातील वयानुरूप निर्माण झालेला प्रत्येक थर हा, त्या वूली मॅमथच्या कोणत्या वयात तयार झाला आहे, ते शोधून काढलं. त्यानंतर या संशोधकांनी, या सुळ्यातल्या सुमारे साडेतीन लाख बिंदूंवरील स्ट्रोन्शियमच्या समस्थानिकांचं प्रमाण मोजलं. प्रत्येक बिंदूतलं समस्थानिकांचं प्रमाण, अगोदर तयार केलेल्या नकाशाशी ताडून, हा वूली मॅमथ कुठेकुठे फिरला ते कळू शकलं. तसंच हा बिंदू सुळ्यातल्या ज्या थरातला आहे, त्या थरावरून त्यावेळचं त्या वूली मॅमथचं वयही समजू शकलं. अशा प्रकारे वूली मॅमथचं राहण्याचं ठिकाण आणि त्याचं वय यांची सांगड घातली गेली. यावरून वूली मॅमथच्या अठ्ठावीस वर्षांच्या जीवनातील संपूर्ण प्रवासाचं अगदी तपशीलवार चित्र समोर उभं राहिलं.

या वूली मॅमथचा प्रवास विलक्षण होता. या प्राण्यानं आजच्या अलास्कातील मोठा भाग तर पालथा घातला होताच, परंतु त्याबरोबरच तो कॅनडाच्या ईशान्य भागातही फिरून आला होता. या वूली मॅमथनं आपल्या आयुष्यातला, अगदी सुरुवातीचा दोन वर्षांचा काळ हा अलास्काच्या अंतर्भागातील, यूकॉन नदीच्या खोऱ्याच्या खालच्या भागात व्यतीत केला. दोन वर्षांचा झाल्यानंतर त्यानं दूरची अंतरं पालथी घालायला सुरुवात केली. सुमारे चौदा वर्षं तो सतत उत्तरेकडील ब्रूक्स पर्वतराजीकडे ये-जा करीत असे. तसंच ब्रूक्स पर्वतरांगांच्या पूर्वेकडच्या टोकापर्यंतही तो जाऊन येत असे. हे त्याचं फिरणं, कदाचित त्याच्या कळपाबरोबरचं फिरणं असावं.

वयाच्या सोळाव्या वर्षांनंतर या वूली मॅमथनं अधिक दूरवर जायला सुरुवात केली. आता तर तो ब्रूक्स पर्वतांपलीकडील, उत्तरेकडच्या उतारांवर जाऊन येऊ लागला. यावेळी तो आपल्या कळपासून वेगळा होऊन एकटाच फिरायला लागण्याची किंवा दुसऱ्या एका फक्त नर असणाऱ्या नव्या कळपात सामील झाला असण्याची शक्यता हे संशोधक व्यक्त करतात. कारण, असे कळप अधिक दूरपर्यंत फिरत असतात. वूली मॅमथचं इतक्या दूर जाणं, हे कदाचित अन्नाच्या शोधातलं भटकणं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकं भटकण्याची गरज त्याला कदाचित प्रतिकूल हवामानामुळेही निर्माण झाली असावी. आयुष्याच्या अखेरच्या दीड वर्षात त्यानं आपलं वास्तव्य ब्रूक्स पर्वतराजीच्या उत्तरेच्या एका छोट्या भागापुरतं मर्यादित ठेवलं होतं. अखेर अठ्ठावीस वर्षांचा असताना त्याला अन्नाअभावी मृत्यू आला. हा काळ हिवाळ्याच्या उत्तरार्धाचा किंवा नंतर येणाऱ्या वसंत ऋतुच्या सुरुवातीचा असावा. वूली मॅमथनं पालथं घातलेलं हे सर्व अंतर सुमारे ऐंशी हजार किलोमीटर इतकं प्रचंड भरतं. हे अंतर म्हणजे पृथ्वीला दोनदा प्रदक्षिणा घालण्यासारखं आहे!

हजारो वर्षांपूर्वीच्या पुरातन काळातल्या एखाद्या प्राण्याच्या आयुष्यभराचा संपूर्ण प्रवास असा प्रथमच उभा केला गेला आहे. वूली मॅमथच्या या प्रवासानं, संशोधकांचं वूली मॅमथबद्दलच कुतूहल वाढलं आहे. कारण अशा प्रकारच्या संशोधनानं, वूली मॅमथच्या जीवनक्रमाची अधिक ओळख होऊ शकेल. तसंच जनुकीयदृष्ट्या आजच्या हत्तीचं भावंड असणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण प्राण्याच्या नामशेष होण्यामागील निश्चित कारणंही स्पष्ट होऊ शकतील.

आभार: डॉ. राजीव चिटणीस.

(विज्ञानमार्ग संकेतस्थळ)

छायाचित्र सौजन्य: Royal British Columbia Museum, Canada/ Thomas Quine/ Wikimedia

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..