हा दिवस आपण का साजरा करतो, हे बहुतांश लोकांना माहीत नसते. अंध व्यक्ती चालताना व फिरताना जी सफेद काठी वापरतात, त्या काठीचे महत्त्व अंधांसाठी किती आहे व अंध व्यक्तींना तिचा किती फायदा होतो, यासाठी साजरा केला जातो.
१९२१ मध्ये जेम्स बिग हे व्यावसायिक छायाचित्रकार अमेरिकेत कार्यरत होते. दुर्दैवाने एका अपघातात त्यांना आपले डोळे गमवावे लागले. त्यात त्यांना कायमचे अंधत्व आले, पण अंधत्वाला न घाबरता सगळीकडे विहार करण्यासाठी पहिल्यांदा सफेद काठीचा वापर करण्यात आला. सुरुवातीला ही काठी पूर्ण सफेद रंगाची होती. ती लाकडी व साध्या पद्धतीची होती. फक्त तिला पांढरा रंग देण्यात आला होता. १९३१ मध्ये फ्रान्समध्ये गिली हर्बट माँट याने फ्रान्सच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांसमोर सफेद काठीचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर गिली हर्बट यांनी निवृत्त अंध सैनिक व अंध लोकांसाठी पाच हजार काठ्यांचे वाटप केले. वाहनचालकांना अडचणीचे वाटू नये म्हणून या काठीला काळ्याऐवजी पांढराच रंग देण्याचे जागतिक स्तरावर ठरविण्यात आले.
१९३० मध्ये पिवोरा एलिनॉईज यांनी पांढऱ्या काठीचा कायदा प्रथमतः जगात अमलात आणला. १९६४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंकन बी. जॉन्सन यांनी १५ ऑक्टोबर हा ‘सफेद काठी दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असे घोषित केले. तसेच ‘युनो’नेसुद्धा जागतिक सफेद काठी दिन १५ ऑक्टोबरलाच साजरा केला जाईल, असे जाहीर केले. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.
अंधांना सुलभ प्रवासासाठी पांढरी काठी नक्कीच उपयुक्त ठरली आहे. या काठीचे लॉग केन, सिम्बॉल केन, गाईड केन, लिडी केन, आदी प्रकार आहेत. सर्वसाधारणपणे वापरात लॉग केनचा वापर केला जातो. अंध व कर्णबधिर असलेल्या व्यक्तीच्या काठीच्या खालील बाजूवर लाल रंगाचे दोन पट्टे असतात. अंध व्यक्ती जी पांढरी काठी वापरतो ती अगदी साधी असते. यात कोणत्याही तंत्राचा वापर नसतो. काठीचा वापर करताना समाजातील लोकांनी या अंधांना योग्य त्या मार्गाची माहिती द्यावी. हातात काठी घेणारी व्यक्ती वृद्ध आहे, असे समजू नये. तसेच त्या काठीत एक जादू आहे असा गैरसमज करून घेऊ नये. ही काठी साध्या पद्धतीने अॅल्युमिनियम धातूपासून बनविलेली असते. समाजात असलेले काठीबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत अशी अपेक्षा आहे.
अभियंत्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा पद्धतीची पांढरी काठी बनवावी. आधुनिक पद्धतीने काठी बनविल्यास त्याचा अंध व्यक्तींना प्रवास करताना चांगला लाभ होईल. आधुनिक पांढऱ्या काठीत छोट्या कॅमेऱ्याचा वापर करावा. तो डिजिटल व टॉकिंग असावा. त्यामुळे या कॅमेऱ्याद्वारे अंध व्यक्ती चालताना अडथळे स्कॅन होतील व ते त्यांना टॉकिंग कॅमेऱ्यामार्फत ऐकायला मिळतील. असे तंत्रज्ञान विकसित व्हावे असे मला वाटते. या ढोबळ तंत्रज्ञानापेक्षाही इतर चांगले व आधुनिक तंत्राचा वापर पांढऱ्या काठीत केल्यास अंधांना ते वरदानच ठरेल.
— डी. जी. वाडेकर.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply