FIDE World Chess Federation म्हणजेच वर्ल्ड चेस फेडरेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना २० जुलै १९२४ रोजी झाली. ‘वर्ल्ड चेस फेडरेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा स्थापना दिन ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. FIDE च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून बुद्धिबळ खेळला जात आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला होता.
बुद्धिबळ हा नुसता खेळ नसून जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारा खेळ आहे. जीवनात केंव्हा पुढे जायचे, कुठे माघार घ्यायची, कुणाला शह देऊन त्याचा पराभव करायचा तर जिंकण्याचे सर्व मार्ग संपले तरीही हिम्मत न हरता आपल्या बुद्धीच्या जोरावर मार्ग काढून परिस्थितीवर मत करायची याचे शिक्षण बुद्धिबळातून मिळते.
बुद्धिबळ हा अतिशय संयमाने आणि एकाग्रतेने खेळला जाणारा खेळ आहे. दोन खेळाडूंनी पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. बुद्धिबळ सध्या जगातील सर्वांत प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक आहे. बुद्धिबळ या खेळाचे नाव जरी काढले तरी दोन हात लांब सरकणारे बुद्धिबळ प्रेमी आपल्याकडे आहेत. बुद्धिबळाची सुरुवात भारतातून झाली. परंतु आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते.
साहित्यामध्ये बुद्धिबळाचा पहिला संदर्भ इ.स. पूर्व ५००मध्ये भारतात दिघ निकय मध्ये ब्रह्मजल सुत्त या ग्रंथात आढळतो. पर्शियामधील पहिला संदर्भ इ.स. ६०० च्या दरम्यान आढळतो, येथे त्याला शतरंज असे म्हटले आहे. सातव्या शतकात मोहर्यांचे वर्णन केलेले आढळते. इ.स. ८०० पर्यंत खेळ चीनमध्ये शिआंकी नावाने पोहोचला होता. इ.स. १००० पर्यंत हा खेळ सर्व युरोपभर पसरला. पहिली आधुनीक बुद्धिबळ स्पर्धा लंडनमध्ये १८५१ ला घेण्यात आली. त्यात जर्मनीचा अॅडॉल्फ अँडरसन विजयी झाला. यानंतर अँडरसनला आघाडीचा बुद्धिबळ तज्ञ मानले जाऊ लागले. आज जगभरात हौशी व व्यावसायिक असे अंदाजे ६० कोटी हून आधीक लोक विविध माध्यमांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.
बुद्धिबळ या विषयावर लिहिलेले पुस्तक ‘रिपीटेशन ऑफ लव्ह अँड आर्ट ऑफ प्लेयिंग चेस’ स्पेनच्या लुइस रामिरेझ दे लुसेना याने सालामांका येथे प्रसिद्ध केले. या पुस्तकाचा उल्लेख करण्याचे कारण की हे पुस्तक सर्वात जुने आणि अजूनही टिकलेले छापील पुस्तक म्हणून ओळखले जाते.
आज भारतात हा खेळ विश्वनाथ आनंद यांच्यामुळे ओळखला जातो. त्यांनी केलेले विश्वविक्रम जगविख्यात आहेत. जागतिक सफरीनंतर स्थानिक पातळीवर हा खेळ कसा पसरला आहे. त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply