५ जून २०२२ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे. सतराव्या शतकात ‘संत तुकारामांनी’, वृक्षाचे महत्त्व सांगताना “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’, असा अतिशय सुंदर अभंग रचून सामाजिक संदेश दिला. मानव समूहाचे घटक म्हणून निसर्गातील विविध घटकांचे संरक्षण आपण करीत आहोत का असा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे.
आज अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले आहेत. तसेच निसर्गातील सजीवांच्या अनेक अन्न साखळ्या तुटण्याच्या स्थितीत आहेत. हवामानात सतत होणारे बदल, प्रदूषणातील वाढ, घातक वायू गळती, घनकचऱ्यांची विल्हेवाट, वाहनांमधून होणारे घातक उत्सर्जन, निसर्गाला ओरबाडून घेण्याची वृत्ती, मानवाचा बेफिकीरपणा आणि बदलती जीवनशैली या गोष्टी हानीला, विध्वंसाला कारणीभूत आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जल -वायु प्रदूषण, आण्विक शस्त्रांचा वाढता वापर, लादलेली युद्धे, त्यात मोठ्या प्रमाणावर भर घालीत आहेत..
या सर्व कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळेच ‘पर्यावरण संरक्षणासाठी’ व ‘संवर्धनासाठी’ ५ जून – ते १६ जून १९७२ साली ‘युनो –‘ संयुक्त राष्ट्रसंघाच्या’ च्या सर्वसाधारण सभेने, ‘मानव आणि पर्यावरण’ विषयी एक ‘परिषद, स्वीडन मधील ‘स्टॉकहोम’ येथे आयोजित केली होती. त्याच दिवशी पर्यावरण संरक्षणाची जाणीव सर्व मानवतेला देण्यासाठी ‘जागतिक पर्यावरण दिन’ दर वर्षी साजरा करायचा असे ठरविण्यात आले. १९७२ साली युनोच्या पहिल्या परिषदेत ‘’ओन्ली वन अर्थ ‘’ हा ‘मोटो’ ( बोधवाक्य ) घोषित करण्यात आले. दर वर्षी ‘पर्यावरण दिनासाठी’ एक ‘थिम’ ठरविली जाते. ही ‘थीम’ – ‘केवळ एक पृथ्वी’ – अधिक शाश्वत, हरित जीवनशैलीकडे वळण्याच्या शक्यतांवर प्रकाश टाकेल. यासाठी एक देश ‘यजमान’, म्हणजे ‘होस्ट’ असतो. विशेष आनंदाची बाब म्हणजे, यंदा त्याचे ५० वे वर्ष साजरे होत असल्यामुळे ‘ओन्ली वन अर्थ’ हेच बोधवाक्य ठेवून स्वीडनकडेच या परिषदेचे यजमानपद सोपविण्यात आले आहे .
५ जून १९७२ नंतर दोन वर्षांनी , ५ जून १९७४ रोजी पहिला ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यास सुरवात झाली. पर्यावरणाचे महत्त्व व संवर्धनाची गरज लक्षात घेऊन आज जवळजवळ १५० देश यामध्ये सहभागी झाले आहेत. पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं, तर त्याचा फायदा संपूर्ण मानव जातीलाच होईल म्हणूनच “पर्यावरण रक्षणाची धरा कास, तरच होईल मानवाचा विकास” हा संदेश घरा घरात, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.
– वासंती गोखले
Leave a Reply