याला वैद्यकीय भाषेत ‘हिपेटायटीस’ असे संबोधतात तर मराठीत त्याला ‘यकृतदाह’ असे म्हणतात. हिपेटायटिस म्हणजेच कावीळ हा आजार आजही भारतात चिंतेचा विषय आहे. सर्वात जास्त मृत्यू होण्यामध्ये कावीळ या आजाराचा तिसरा क्रमांक लागतो. पण, आजही कावीळबाबत लोकांमध्ये तितकीशी जनजागृती पाहायला मिळत नाही. खरंतर, दुषित पाण्यामुळे, उघड्या वरच्या खाल्लेल्या अन्नपदार्थांमुळे कावीळ होते. पण, आजही लोकांचा या आजारासाठी गावठी औषधं म्हणजेच झाडपाल्यांच्या औषधांकडे जास्त कल असल्याचं समोर आलं आहे. भारतात ५० टक्के नागरिक आजही कावीळसाठी झाडपाल्यांची औषधं वापरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात प्रत्येक ३० ते ४० सेंकदाला एका व्यक्तीचा मृत्यू हा यकृताच्या आजाराने होतो. पण, तरीही आपल्या शरीरामधील पाचशेहुन अधिक कार्य करणाऱ्या आणि अनेक रोगांना दूर ठेवणाऱ्या यकृताच्या आजाराबद्दल अजूनही जागरूकता आलेली नाही. कावीळबाबत भारतामध्ये बरेच गैरसमज आहेत. जसे की, माळ बांधणे आणि कावीळ उतरणे या गैरसमजुतींचा या रोगाशी काहीही संबंध नाही. या अंधश्रद्धेतूनही अनेकदा लोकांचा जीव जातो. कावीळ आपणास अनोळखी नाही. डोळ्यांमधील पांढरा भाग पिवळा होणे, त्वचा पिवळसर दिसणे आणि लघवी गडद पिवळी होणे ही काविळीची लक्षणेही आपल्याला माहिती असतात. मुळात कावीळ हा काही आजार नव्हे, ते एक लक्षणच आहे.
कारण ते आपल्याला जाणवते, दिसून येते. कावीळ होण्याची कारणे अनेक आहेत. त्यांचा परिणाम यकृताच्या कार्यपद्धतीवर होत असतो. यात सर्वात महत्त्वाचे व नेहमी दिसून येणारे कारण म्हणजे यकृतावर झालेला विषाणूंचा हल्ला.
कावीळबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून २८ जुलै हा दिवस ‘वर्ल्ड हिपेटायटिस डे’ म्हणून साजरा केला जातो.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply