मराठीची एक धाकटी बहीण कोकणी भाषेला ओळखले जाते. कोकणी म्हणजे गोव्याची भाषा असा एक समज आहे, पण तो पूर्ण खरा नाही. कोकणी गोव्यात बोलतात, महाराष्ट्रात बोलतात, कर्नाटकात बोलतात, तशीच केरळमधेही बोलतात.
गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही गोव्याची राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो.
कोकणी घटनेच्या ८ व्या परिशिष्टात भाषा म्हणून समाविष्ट झाली आहे, पण ती मराठीला इतकी जवळची आहे, की ती स्वतंत्र भाषा आहे की मराठीची बोलीभाषा याबद्दल लोक वर्षानुवर्षे वाद घालत आले आहेत आणि यापुढेही घालत रहातील.
अगदी साध्या गोष्टी बघितल्या तर, मराठीतला ‘मला’ हा शब्द घ्या. तर कोकणीत ‘म्हाकां’. मराठीत ‘इकडे, इथे’ तर कोकणीत होतो ‘हांगा’.
कोकणी थोडी सावकाश बोलली तर मराठी माणसाला तिचा अर्थ कळतो नक्की! कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क ‘कोकणी लोक’ असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात ‘गौड’ शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही! पण कदाचित त्यामुळेच असावं, कोकणीत बऱ्याच शब्दांचे उच्चार बंगालीसारखे ‘ओ’ कारान्त होतात. अगदी नावाची रुपे सुद्धा ‘धेंपे’ चं ‘धेंपो’. मराठीतला ‘बोका’ कोकणीत ‘बोकलो’. मराठीतला ‘दादला’ कोकणीत ‘दादलो’ होतो. अशी खूप उदाहरणं आहेत.
२००६चा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र केळेकर यांना प्रदान करण्यात आला होता. कोकणी भाषेला प्रथमच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply