जगातील पाश्चिमात्य देशातील प्रसिद्ध वाद्य म्हणजे पियानो. ८८ स्वरांच्या कळांचे हे झंकारणारे वाद्य, म्हणूनच दरवर्षीच्या ८८ व्या दिवशी हा “पियानो दिवस” साजरा केला जातो. पियानो ला ‘एलिट’ वर्गाचे वाद्य समजले जाते. . इटलीतील ख्रिस्तोफर बाटरेलोमिओ या सद्गृहस्थाने ३०० वर्षांपूर्वी पहिल्या पियानोची निर्मिती केली असे मानले जाते. ‘बेबी पियानो’ आणि ‘ग्रँड पियानो’ असे पियानोचे दोन ढोबळ प्रकार असून ग्रँड पियानो इकडून तिकडे नेणे मोठे जिकिरीचे काम आहे. पियानोच्या टय़ुनिंगलाही खूप वेळ लागतो. या खर्चीक बाबीमुळेच आज बऱ्याचशा रेकॉर्डिगमध्ये पियानोचे काम सिंथेसायझरवरच केले जाते. हिंदी चित्रपटसृष्टीने संगीतात पियानोचा भरपूर वापर करून घेतला पण बहुतांशी नायक-नायिकांच्या विलग प्रसंगी विरह गीतावेळीच. चित्रपटांतही पियानोचा वापर पूर्वीसारखा आता दिसत नाही.
हिंदी चित्रपटांतील सुमधुर संगीतातून ठसा उमटविलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकार जोडगोळीतील शंकर यांचा पियानो पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात तयार करण्यात आलेला हा पियानो सुमारे ९० वर्षांपूर्वीचा आहे. स्कीडमायर कंपनीच्या या अप्राइट पियानोमध्ये साडेसात सप्तकातील ८८ पट्ट्या आहेत. संगीतकार नौशाद हे स्वत: उत्तम पियानोवादक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या अनेक गाण्यांत पियानोचा वापर केला आहे. ‘अनमोल घडी’ या चित्रपटात ‘जवाँ है मुहब्बत हसीं है जमाना..’ या नूरजहाँने गायलेल्या गाण्यात पियानोचे दर्शन घडते. पण कुठंतरी बसून गाणं म्हणायचं ते तिनं पियानोसमोर बसून म्हटलंय, इतकंच. मेहबूब खाननिर्मित ‘अंदाज’मध्ये दिलीपकुमार, राज कपूर आणि नर्गिस असा प्रेमत्रिकोण आहे. त्यातली ‘झूम झूम के नाचो आज..’, ‘तू कहे अगर जीवन भर..’, ‘हम आज कहीं दिल खो बठे..’, ‘टूटे ना दिल टूटे ना..’ ही गाणी दिलीपकुमारवर चित्रित करण्यात आली आहेत. या चारही गाण्यांमध्ये पियानो अविभाज्य आहे. गंमत म्हणजे इथे दिलीपकुमार रफी-तलत नाही, तर चक्क मुकेशच्या आवाजात गाताना दिसतो! शूटिंगच्या आधी दिलीपकुमारला जेव्हा हे कळलं तेव्हा तो संतापून नौशाद यांच्याकडे गेला आणि म्हणाला, ‘‘रफी किंवा तलत यांच्याकडून ही सगळी गाणी पुन्हा रेकॉर्ड करून घ्या; नाहीतर मी शूटिंगला उभा राहणार नाही.’’ नौशादमियांनी त्याला कसंबसं समजावत ती गाणी ऐकायला राजी केलं. गाणी ऐकताना मात्र मुकेशच्या आवाजातला दर्द त्याच्या काळजाला भिडला आणि त्याने आपला हट्ट मागे घेतला. ‘बाबूल’मध्ये पुन्हा एकदा पियानोवर बसलेला दिलीपकुमार दिसतो. यात तो मुनव्वर सुलतानाच्या जोडीने ‘मिलते ही आंखे दिल हुआ दीवाना किसी का..’ हे युगुलगीत गातो. तलत महमूद आणि शमशाद बेगम यांनी गायलेल्या या गाण्याचं संगीत गुलाम मोहम्मद यांचं आहे.
‘अनहोनी’मधील ‘मैं दिल हूँ इक अरमान भरा..’ या राज कपूरवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यासाठी संगीतकार रोशन यांनी तलत महमूदचा मुलायम आवाज वापरला आहे. याला खऱ्या अर्थाने ‘पियानो साँग’ म्हणता येईल. कारण इथे पियानो केवळ तोंडी लावण्यापुरता नाही. गाण्याचा इंट्रो (गाण्यापूर्वीचं म्युझिक), क्रॉस लाइन्सचं म्युझिक, पहिल्या आणि दुसऱ्या कडव्याआधीचं म्युझिक यांत पियानो वाजतो.
या गाण्याप्रमाणे मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गीता बालीवर चित्रित करण्यात आलेल्या ‘जेलर’ चित्रपटातील ‘हम प्यार में जलनेवालों को चन कहाँ..’ हे गाणं पूर्ण पियानोने व्यापलं आहे. गाण्याचा इंट्रो आणि दोन्ही कडव्याआधीचं म्युझिक यांत पियानो वाजतो. यात गीता बालीने नायिकेची तगमग पडद्यावर सुंदर आविष्कारित केली आहे. आणि लतादीदींच्या आवाजातील मधुरता काय वर्णावी!
नूतनवर चित्रित झालेल्या ‘अनाडी’मधील ‘तेरा जाना दिल के अरमानों का लूट जाना..’ (गीत : शैलेन्द्र, संगीत : शंकर-जयकिशन) या गीतात केवळ इंट्रो म्युझिकपुरताच पियानो वाजतो. गाण्याचा मुखडा पियानोवर वाजवून नूतन उठते. अत्यंत भावदर्शी चेहऱ्याची व बोलक्या डोळ्यांची नूतन यातली विमनस्क, भावविभोर नायिका उत्कटतेनं साकारते.
‘चलो इक बार फिर से..’ या ‘गुमराह’मधील गाण्यात संगीतकार रवी यांनी पियानोचा छान वापर केला आहे. या गाण्याचा इंट्रो आणि दोन्ही कडव्यांआधीच्या म्युझिकमध्ये पियानो ऐकू येतो. गायक महेंद्र कपूर आणि पडद्यावर सुनील दत्त याने या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे.
‘एक राज’ या चित्रपटातील ‘अगर सुन ले तो इक नग़मा हुजुरे यार लाया हूँ..’ (संगीत : रवी) हे किशोरकुमारने गायलेलं गाणं त्यानेच पडद्यावर साकारलंय. हे गाणं किशोरकुमारच्या पियानो- वादनासाठी बघायलाच हवं. दोन्ही हातांचा सुयोग्य वापर करत त्याने अगदी सफाईदार ‘वादन’ केलं आहे. प्रत्यक्षात त्याने केवळ अभिनय केलाय, पण त्याची बोटे त्या- त्या सुरांबरहुकूम त्याच पट्टय़ांवर पडताना दिसतात. राज कपूर, धर्मेद्र, सुनील दत्त, शम्मी कपूर, जॉय मुखर्जी या मंडळींना त्यांच्या गाण्यांच्या शूटिंगच्या आधी या गाण्याचा व्हिडीओ निर्मात्यांनी दाखवायला हवा होता असे राहून राहून वाटते.
याआधीही ‘नया अंदाज’मध्ये किशोरकुमारला आपण ‘मेरी नींदों में तुम..’ हे युगुलगीत शमशाद बेगमबरोबर पियानोवर म्हणताना ऐकलं व पाहिलं आहे. या गाण्याचे संगीतकार ओ. पी. नय्यर यांना तोपर्यंत ‘आशा’ नावाच्या परीसाचा शोध लागला नव्हता म्हणून (तोपर्यंत त्यांची आवडती गायिका असलेल्या) शमशादकडून ते गाऊन घेत. परंतु किशोरकुमारच्या सुरेल आवाजापुढे शमशादचा किरटा आणि चिरका आवाज ऐकवत नाही.
‘शगुन’ चित्रपटाची सहनायिका निवेदिता आणि कमलजीत यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो..’ हे पियानोवरचं आणखी एक बहारदार गीत. जे खय्याम यांच्या संगीतात त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी पंजाबी ढंगात गायले आहे.
राज कपूरचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘संगम’मध्ये राज कपूर अनेक वाद्यो वाजवताना दिसतो. ‘मेरे मन की गंगा’मध्ये बॅगपायपर, ‘हर दिल जो प्यार करेगा’मध्ये अॅ‘कॉर्डियन आणि ‘दोस्त दोस्त ना रहा’मध्ये पियानो! राज स्वत: हार्मोनियम आणि ढोलक उत्तम वाजवायचा. तो चालीही तयार करायचा. खरा वादक झोपेतसुद्धा कुठलेही वाद्य चुकीच्या प्रकारे वाजवणार नाही वा हाताळणार नाही. इथे तर परफेक्शनिस्ट असणारा राज होता. असे असूनदेखील या चित्रपटात त्याची वाद्यांवर फिरणारी बोटे ‘परि तू जागा चुकलासी’चा प्रत्यय देतात.
‘तीन देवीयाँ’मधील ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’ हे एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि किशोरकुमारने देव आनंदसाठी गायलेलं गाणं टिपिकल ‘पार्टी साँग’ आहे. ‘वक्त’ हा हिंदी चित्रपट जगतातील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट. बलराज सहानी, राजकुमार, सुनील दत्त, साधना, शशी कपूर, शर्मिला टागोर आदी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटातील रवी यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही गाजली. यात ‘चेहरे पे खुशी छा जाती है..’ हे गाणं साधनाने पियानोवर चांगलं साकारलं आहे. साधना यात दिसतेही अतिशय गोड!
‘अनुपमा’ हा हृषिकेश मुखर्जी यांचा अभिजात चित्रपट. यात ‘धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार..’ हे खऱ्या अर्थाने अतिशय गोड असे पियानो साँग (संगीत : हेमंतकुमार) आहे. या गाण्याचा इंट्रो, पहिल्या व दुसऱ्या अंतऱ्यापूर्वीचे म्युझिक आणि कडव्याच्या प्रत्येक ओळीनंतर पियानो ऐकू येतो. चित्रपटाची नायिका आहे शर्मिला टागोर. पण पडद्यावर ते अतिशय अप्रतिमपणे साकारलंय सुरेखा पंडित या कलावतीने. ती दिसायला लौकिकार्थाने सुंदर नाही, पण खूप गोड आहे. हिंदी चित्रपटांत आपण बहुतेक वेळा अनुभवतो, की गाणं चालू असताना प्रवेश घेण्यासाठी जणू ताटकळत थांबलेले नट-नटी गाणं संपलं की मगच प्रवेश घेतात. इथे तसं घडत नाही. पियानोवर गाणं म्हणण्यात दंग झालेल्या सहनायिकेला पहिल्या कडव्यानंतरच सहनायकाची (तरुण बोस) चाहूल लागते. ती गाणं थांबवते. पण तो म्हणतो, ‘‘गाना कभी अधूरा नहीं छोडना चाहिए.. आगे गाओ!’’ ती गाणं पुढे म्हणते.
‘ब्रह्मचारी’मधलं ‘दिल के झरोकों में तुझको बिठाकर..’ हे खरं तर पियानो साँग; पण संगीतकार शंकर जयकिशन आणि भरगच्च ऑर्केस्ट्रेशन हे समीकरण असल्यामुळे ५०-६० व्हायोलिन्सचा ताफा पियानोवर मात करतो. अर्थात सुरुवातीला वाजलेला पियानोचा पीस मात्र अगदी अप्रतिम. तो नायकाच्या मनातील खळबळ, खेद, खंत, निराशा, उदासी सुरांतून साकार करतो आणि प्रसंगात अधिक गडद रंग भरतो. पियानोच्या सुरांच्या या सुंदर वातावरणनिर्मितीनंतर व्हायोलिन्सचा भलामोठा रन, मग वेस्टर्न कॉयर, पुन्हा व्हायोलिन्स आणि शेवटी पियानोच्या दोन आवर्तनांच्या पीसनंतर गाणे सुरू होते. १७० सेकंदांचा हा इंट्रो कदाचित हिंदी गाण्यांतला सर्वात मोठा इंट्रो असावा. या गाण्यात शम्मी कपूर दिसतो नेहमीप्रमाणे हँडसम; पण त्याने पियानो वाजवण्याचा थोडा सराव करायला हवा होता, म्हणजे त्याच्या बोटांच्या हालचाली विचित्र दिसल्या नसत्या. इथे ‘तिसरी मंझील’मधल्या त्याच्या ड्रमवादनाच्या अभिनयाची आठवण येते. जणू तो स्वत:च ड्रम वाजवतोय असा भास त्या चित्रपटातील सर्व गाण्यांत होतो.
संगीतकार आणि संगीत संयोजकांनी आपला अनुभव, कसब आणि प्रतिभा पणाला लावून निर्माण केलेल्या सुंदर गाण्यांचं आणि त्यातल्या पियानो म्युझिकचं अनेक नट-नटय़ांनी मात्र हसं करून टाकलंय. यात आघाडीवर आहे अर्थातच धर्मेद्र. त्याला जसा अभिनय जमला नाही तसाच पियानो वाजवण्याचा अभिनयही. हे त्याने अनेकदा दाखवून दिलं. ‘आदमी और इन्सान’मध्ये मुमताज धर्मेद्रला हाताला धरून पियानोवर बसवते. तो शिलाई मशीनवर कपडे किंवा हातमागावर बसून कापड विणावं तशा थाटात पियानो वाजवतो आणि एकीकडे मुमताज आशाच्या आवाजात ‘जिंदगी इत्तेफाक है..’ (गीत : साहिर, संगीत : रवी) गाणं म्हणते.
‘फिर वही दिल लाया हूँ..’मधील ‘आपके हसीन रुख पे आज नया नूर है..’ हे ओ. पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि रफीने मधाळ आवाजात गायलेलं पियानो साँग धर्मेद्रवरच चित्रित झालं आहे. गाण्यात धर्मेद्र नक्की पियानो वाजवतोय की दोन्ही हातांनी पीठ मळतोय, ते समजत नाही! धर्मेद्रच्या पियानोवादनाचं पितळ उघडं पडू नये यासाठी दिग्दर्शकाने पियानोच्या पीसच्या वेळी कॅमेरा एकदा तनुजाच्या चेहऱ्यावर, तर एकदा माला सिन्हाच्या चेहऱ्यावर फिरवला आहे. तनुजा यात खूपच गोड दिसली आहे. अर्थात धर्मेद्रही दिसतो अतिशय उमदा नि देखणा.
‘मुझे तुम मिल गये हमदम..’ हे ‘लव्ह इन टोकिओ’मधील लताने गायलेलं गोड गाणं पडद्यावर साकार करते आशा पारेख.. पण पियानोवर आहे जॉय मुखर्जी. ‘पत्थर के सनम’ चित्रपटात ‘पत्थर के सनम.. तुझे हमने’ हे गीत चित्रपटाचा नायक मनोजकुमार पियानोवर बसून रडक्या चेहऱ्याने गातो. पण गाण्यात पियानो कुठे ऐकूच येत नाही. कुठंतरी बसून वा उभं राहून गाणं म्हणायचं त्याऐवजी हिंदी फिल्मवाले पियानोचा असा सर्रास वापर करीत आले आहेत. भावहीन, मख्ख चेहऱ्याच्या मनोजकुमारला बघणं ही खरं तर एक शिक्षाच; पण त्याला उतारा म्हणूनच की काय, गोड गोजिरी मुमताजही यातल्या प्रत्येक फ्रेममध्ये दिग्दर्शकाने टिपली आहे.
‘तकदीर’ या चित्रपटात पियानो हे एखादे मध्यवर्ती पात्र असल्यासारखंच आहे, इतकं त्याचं अस्तित्व सतत जाणवत राहतं. या चित्रपटात ‘जब जब बहार आयी’ हे लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं अतिशय गोड गाणं आपल्याला तीन वेगवेगळ्या ‘व्हर्जन्स’मध्ये मोहम्मद रफी, लता, उषा मंगेशकर, उषा तिमोथी आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये ऐकायला, पाहायला मिळतं.
‘हमराज’मधील ‘किसी पत्थर की मूरत से मुहब्बत का इरादा है..’ हे सुनील दत्तवर चित्रित करण्यात आलेलं एक पार्टी साँग. साहिर-रवी-महेन्द्र कपूर हे ‘कॉम्बिनेशन’ यात नेहमीप्रमाणेच यशस्वी ठरले आहे. महेन्द्र कपूर छान गायलाय. त्याच्या आवाजात मार्दवतापूर्ण आर्जव जाणवतं. गाण्याच्या दोन्ही कडव्यांच्या आधी एकच म्युझिक पियानोवर ऐकू येतं.
‘साथी’ हा नौशाद यांचं जरासं वेगळं संगीत असलेला चित्रपट. यात ‘ये कौन आया रोशनी हो गयी..’ हे पियानो गीत सिमी गरेवालवर चित्रित करण्यात आलं आहे. पण केवळ सुरुवातीचं संगीत पियानोवर वाजवून ती पियानोवरून उठते. संपूर्ण गाण्यात पियानो मात्र ऐकू येत राहतो.
‘लाल पत्थर’ या मेहरांच्या चित्रपटात ‘गीत गाता हूँ में..’ हे किशोरकुमारने गायलेलं पियानो साँग विनोद मेहरावर चित्रित करण्यात आलं आहे. मात्र, १२ किलो वजनाचा सूट ३० किलो वजनाच्या माणसाने घातल्यावर जे होईल ते इथे झालं आहे. किशोरकुमारचा दमदार आवाज विनोद मेहराला पेलत नाही. या गाण्यात राजकुमार, राखी आणि हेमामालिनी यांचंही दर्शन होतं. शक्ती सामंतांच्या ‘कटी पतंग’मधील ‘प्यार दीवाना होता है..’ हे पंचमदांचं एक गोड, रोमँटिक पियानो साँग लोभस चेहऱ्याच्या राजेश खन्नाने पडद्यावर सुंदर साकारलं आहे.
‘दूर का राही’ या ‘सबकुछ किशोरकुमार’ असणाऱ्या चित्रपटातलं ‘बेकरार दिल तू गाये जा..’ हे उत्तम जमलेलं भारदस्त गाणं. यात पार्टी नाही, खोटं खोटं हसणं-खिदळणं नाही. पडद्यावर फक्त किशोर आणि त्याचे मोठे बंधू दादामुनी. व्हीलचेअरवर बसलेले दादामुनी पत्नीच्या आठवणींनी बचन आहेत. किशोर त्यांना पियानोपाशी घेऊन जातो आणि ते किशोरच्या सुरात हे गाणं गातात. पहिल्या कडव्यानंतर जिन्याच्या पायऱ्या उतरत तनुजा येते आणि दुसरे कडवे सुलक्षणा पंडितच्या आवाजात पूर्ण करते.
तर, ही अशी काही निवडक पियानोवरची गाणी. या सगळ्या गाण्यांत ज्यांनी प्रत्यक्षात बहारदार पियानो वाजवला आहे ते गुणी वादक होते- सन्नी कॅस्टेलिनो, रॉबर्ट कोरिआ, माइक पचाडो आणि टोनी पिंटो. विशेष म्हणजे यात ल्यूसिलिया पचेको आणि बिजी काव्र्हालो या दोन महिलाही होत्या.
https://www.youtube.com/watch?v=nt7X9XM_waU
https://www.youtube.com/watch?v=O-qW-lP2Wew
— जयंत टिळक.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply