या चिमण्यांनो,
परत फिरा रे
घराकडे आपुल्या
हे ग. दि. माडगूळकर यांचे गाणे आजच्या दिवसाला लागू होते. हल्ली या चिमण्यांनो असेच म्हणावे लागते.
निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा… सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे.
चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय अशी भिती वा़टू लागली आहे. शहरात मातीच्या भिंती, कौलारू घरे पहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला आता दिसत नाही, अंगणही राहिले नाही तर अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी , बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सीमेंटच्या जंगलात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली. अपवादाने वृक्ष नजरेस पडतात.
कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने होणारी घराघरातील सकाळ आता केवळ आठवणीतील एक अनुभूती झाल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा केला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांची संख्या कारणीभूत ठरला. एकीकडे मुंबई, पुण्यासारख्या महानगरात सामान्यत: आढळणारी चिमणी म्हणजेच ‘इंडियन कॉमन स्प्रॅरो’चेही दर्शन दुर्मीळ होत असताना पर्यावरण संवर्धनामुळे निमशहरी भागातील काही परिसरात विविध प्रकारच्या चिमण्या सकाळ-सायंकाळ गुंजारव करताना आढळतात. यासाठी आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत, परसात जर त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली तर आपल्याला चिमण्या दिसू लागतील. याचा अर्थ असा नाही की, आज आपण ‘बर्ड फिड’ ठेवले आणि उद्या लगेच १०-१२ चिमण्या दिसतील लागल्या. चिमणीलाही ती सवय होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, यासाठी गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची.
चिमण्यांनाही द्या जागा…
– फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा. चिमण्यांना पाण्यात खेळायला प्रचंड आवडते.
– घरात काही वस्तूंची (बूट, चप्पल इत्यादी) रिकामी खोकी पडलेली असतात. त्यांना चिमण्या आत जाईल, असे भोक पाडून, घराबाहेर खिडकीच्यावर उंच जागेवर टांगले तर तेथे चिमण्या घरटे करतील.
– शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांना खाद्य भरवायचे फिडर बनवू शकतो.
– घराजवळच्या मोकळ्या भूखंडावर, कॉलनीतील रस्त्यांच्या कडेला लहान झुडुपवर्गिय रोपांची लागवड करा. व संवंर्धन करा.
– चिमण्यांसाठी नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी बाभूळ वृक्षाची लागवड व संवर्धन करा. यावर चिमण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बाभूळावर त्या आनंदाने वास्तव्यास असतात.
– घराच्या टेरेस, बाल्कनीत कुंड्यात जेथे झाडे लावलेली आहेत अशा जागी बर्ड फिडर लावा. चिवचिवाटाने भकास, ओसाडपणा जाऊन जागेच्या सौंदर्यात भरच पडेल.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply