जागतिक व्याघ्र दिवस दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन साजरा करावा म्हणून घोषित करण्यात आला. वाघ हे नाव उच्चारताच जंगलातील निर्धास्त चाल, काळजाचा थरकाप उडविणारी डरकाळी यांसारखी असंख्य गुणवैशिष्ट्ये समोर येतात. परंतु खेळ, मनोरंजन, स्वातंत्र्यानंतर वाढत्या लोकसंख्येमुळे वाघांच्या अधिवासावर आक्रमण होऊ लागले आहे. त्यामुळे ही डरकाळी लुप्त होणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. फेलिडी या मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. आज देशभरात ३९ व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांचा अधिवास घनदाट जंगलात असल्याकारणाने त्या ठिकाणच्या जमिनीची धूप होत नाही. परिणामी पाण्याचे स्रोत कायम राहतात. या स्रोतामुळेच या ३९ व्याघ्र प्रकल्पातून छोटया-मोठय़ा ३५० पेक्षा जास्त नद्यांचा उगम होतो. जगात फक्त चीन, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड, तिबेट, नेपाळ, भूतान अशा अगदी बोटांवर मोजता येतील एवढ्याच देशांमध्ये वाघांच्या निरनिराळ्या जाती आढळतात. जगातील एकूण वाघांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाघ भारतात असल्यामुळे जगभरातील सर्व पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण संरक्षकांची आशा भारतावरच टिकून आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply