लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना असते. लग्न कशासाठी, याची समज येण्यासाठी आणि त्याचं अवलंबन करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. विचारस्वातंत्र्य हवं आणि तरी विश्वास हवा. या दोन गोष्टींमधून प्रेम जन्म घेतं. संसारात अडचणी असणारच आणि त्याचे क्लेश होतात तेव्हा साथीदार लागतो. तसा साथीदार जोडीदाराच्या अडचणीच्या वेळी हजर असला तर लग्न कशासाठी ते नीट कळतं.
आज एवढी वर्षे झाली अजूनही एका प्रश्नाचा खरा उलगडा होत नाही. लग्नाच्या वयाचे हजारो मुलगे आणि हजारो मुली आसपास आहेत. पण आपल्याला हवा तसा जोडीदार मात्र शोधणं इतकं बिकट आहे की त्याचं वर्णन करणं कठीण आहे.
लग्न कशासाठी हे ज्याला नीट कळलं त्याला पुढच्या निर्णयातला बराचसा भाग सोपा होतो.
यावर मी चालवतो त्या ‘जीवनसाथ’ अभ्यास मंडळात बऱ्यापैकी सविस्तर चर्चा चालतात. आत्ता मात्र मी त्या चर्चाचा केवळ सारांश सांगतो. ‘कायद्यात बसणाऱ्या, समाजमान्य पद्धतीने एक सज्ञान स्त्री आणि एक सज्ञान पुरुष यांच्यात लैंगिक संबंध ठेवण्यासाठी’ हे त्याचं उत्तर आहे. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. कोणाशी लग्न करायचं हा निर्णय घेताना जी मुख्य गोष्ट समजायला हवी ती अशी, ‘स्वत:च्या कुवतीप्रमाणे, उपलब्ध व्यक्तींपैकी, उपलब्ध वेळेत, त्यातल्या त्यात चांगल्या जोडीदाराची मी स्वत: निवड केली आहे. सर्व ताकद वापरून मी हे लग्न टिकवण्याचा प्रयत्न करीन. काही ताण आले तर मार्ग काढण्याचा सगळा प्रयत्न करीन.’ दुसऱ्या कोणी तरी मंत्र म्हणण्यापेक्षा यातला प्रत्येक शब्द नीट समजावून घेतला तर ते उपयोगी पडेल. हे ऐकल्यावर अनेक जण म्हणतात, ‘हे सोप्या भाषेत आहे, पण सोपं नाही’.
हा हेतू स्पष्टपणे कळलेला असला की निर्णय सोपा होतो. ज्या जोडीदाराशी भावनिक, वैचारिक जवळीक असेल त्याच व्यक्तीशी लग्न करायला पाहिजे, तरच समाजमान्य आणि तरीही मनपसंत पद्धतीने शारीरिक संबंध शक्य आहेत. भावनिक, वैचारिक जवळीकीसाठी बराच वेळ लागतो. त्या काळात दोन-तीन भावी जोडीदारांशी एकाच काळात चर्चा-भेटी चालू असल्या तरी काही बिघडत नाही. प्रत्यक्षात असंच होत असतं, पण ते उघडपणे कोणी मान्य करत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी. एक स्त्री आणि एक पुरुष लग्नाच्या करारावर सह्य़ा करतात तेव्हा ते दोन न लिहिलेल्या अटींवर सह्य़ा करत असतात. एक म्हणजे यापुढे त्यांची पैशाची भागीदारी गृहीत असते. संसार या ‘बिझनेसचे ते पार्टनर’ होतात. म्हणजेच फायदा किंवा तोटा ते विभागून घेतात आणि फक्त एकमेकांशीच शरीरसंबंध करण्याचं बंधन पाळण्याचा करार करतात.
वाईट गोष्ट अशी आहे की, अनेक पुरुषांच्या मनात अशी छुपी इच्छा असते की लग्न केलं की बायकोवर स्वामित्व गाजवता येईल. त्यांना हे समजत नाही की, कोणाचाही स्वामी बनून गळ्यात माळ घालून घेतली की त्या माळेत जबाबदारीचे मणी असतात. आणखी एक गोष्ट ऐकली की मला फार वाईट वाटतं. बिघडलेला, मंदबुद्धी, नाकर्ता, व्यसनी असा मुलगा पदरी असलेले आईवडील चक्क असा विचार करतात की, याचं लग्न करून देऊ म्हणजे हा सुधारेल. लग्नामुळे असा मुलगा सुधारल्याचं उदाहरण लाखात एक असतं. मुलीच्या आयुष्याची वाट लागते त्याचा विचार कोणीच करत नाही. काही ठिकाणी अशा मुलाच्या आईवडिलांनी मुलीच्या आईवडिलांना स्पष्ट परिस्थिती सांगितलेली असते, पण मुलीला बिचारीला काही माहीत नसतं. आणि अशा तऱ्हेने झालेली लग्नं टिकतातही. कहाणीचा त्याच्या पुढचा भाग ऐकून तर माझा थरकाप होतो. लग्नामुळे मुलगा सुधारत नाही कळल्यावर पुढे सगळे मिळून ठरवतात की, मूल होऊ दे म्हणजे तो सुधारेल. बापरे! म्हणजे पुढे त्या मुलाचेही हालच हाल. त्या जन्मलेल्या मुलाच्या मनात वडिलांविषयी काय भावना असतील, त्याची आपण सगळे कल्पना करू शकतो.
लग्न कशासाठी, याची समज येण्यासाठी आणि त्याचं अवलंबन करण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. विचारस्वातंत्र्य हवं आणि तरी विश्वास हवा. या दोन गोष्टींमधून प्रेम जन्म घेतं. संसारात अडचणी असणारच आणि त्याचे क्लेश होतात तेव्हा साथीदार लागतो. तसा साथीदार जोडीदाराच्या अडचणीच्या वेळी हजर असला तर लग्न कशासाठी ते नीट कळतं. लग्नाचा एक महत्त्वाचा उद्देश क्रीडा असा असतो. क्रीडा म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाही तर सहवासाचा आनंद. दोन इंग्लिश शब्द ‘प्ले’ आणि ‘गेम’ आहेत. त्याचा अर्थ खरं म्हणजे स्पष्ट आहे. ‘प्ले’ म्हणजे क्रीडा व ‘गेम’ म्हणजे नियमांच्या आधारे केलेली स्पर्धा. त्यात हार-जीत असते. क्रीडेत हार-जीत नसते. फक्त आनंद असतो. ही गोष्ट नवरा-बायकोला समजणं जरुरीचं आहे.
लग्न कशासाठी, याचं उत्तर देताना एक जण म्हणाला होता, ‘लग्न म्हणजे थ्री इन वन आहे. सोय, शरीरसंबंध आणि आधार.’ जणू काही ‘सोफा कम बेड कम सेटी’. कितीही विनोदी वाटलं तरी हे खरं आहे. फक्त तो सोफा नीट वापरण्याची अक्कल हवी. त्याचा ‘मेंटेनन्स’ हवा.
जोडीदाराची निवड करताना योग्य वय काय असावं, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. १४-१५ व्या वर्षी वैद्यकीयदृष्टय़ा स्त्री आणि पुरुष दोघंही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी योग्य झालेले असतात. त्यामुळे तेही उत्तर सोपं आहे. कायद्याचं उत्तर फार स्पष्ट आणि आकडय़ामध्ये आहे. मुलीचं वय १८ पूर्ण आणि मुलाचं २१ पूर्ण. निसर्गरचना, वैद्यकीय कल्पना आणि कायद्याची कल्पना यामध्ये इतका फरक असण्याचं मुख्य कारण वैचारिक, भावनिक परिपक्वता कायद्याला अभिप्रेत आहे. आणि तिथेच खऱ्या प्रश्नाला सुरुवात होते. ‘परिपक्वता!’ किती मोघम, मोठी, पसरट कल्पना आहे!
पुरुष स्त्रीपेक्षा मोठा असावा हे लोकांच्या डोक्यातून जात नाही. परिपक्वतेचा विचार केला तर ते बंधन मानण्याची जरूर नाही. परिपक्वता किती वयात येते हे सागणं कठीण आहे. पण जोपर्यंत पालक आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचा निर्णय घेतायत तोपर्यंत त्याला बालविवाहच म्हटलं पाहिजे. इतर कशाचीही ‘प्रॅक्टिस’ करायला लोक ५-१० वर्ष कॉलेजमध्ये जायला तयार असतात. डॉक्टर्स, वकील, इंजिनीअर्स अनेक वर्ष शिकतात आणि मग ‘इंटर्नशिप’ करतात. ‘संसार’ या महत्त्वाच्या ‘प्रॅक्टिस’साठी मात्र निर्णय घ्यायला काही तास किंवा काही मिनिटं दिलेली असतात. त्या काही मिनिटांत त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला नुसता स्थळाचा पत्ता द्या. बाकी काही शिकवू नका. पुढे काय करायचं ते आम्हाला सगळं माहितीय.
खरी गोष्ट अशी की, नॉर्मल मुलाला किंवा मुलीला साधारण २ वर्षांत जोडीदार सापडत नसेल तर कुठे तरी काही तरी चूक आहे. ती चूक शोधायला हवी आहे. मी कितीही म्हणालो ज्यांनी त्यांनी स्वत: निर्णय घेऊन जोडीदार निवडावा आणि पुढे स्वत:च्या हिमतीवर संसार निभावून न्यावा, तरी कुठे होतंय् तसं? जोडीदाराची निवड करण्यासाठी लोकांना आईवडिलांची नाही तर वधूवर सूचक मंडळांची मदत लागतेच आहे.
स्वत:चा जोडीदार स्वत: निवडू न शकणारे असतात तसेच स्वत: निर्णय घेण्याची इच्छा नसलेलेही असतात. त्यांनी मनाशी केलेलं विधान असं असतं, ‘बरोब्बर मला पाहिजे तशी व्यक्ती लग्न करण्यासाठी दुसरं कोणी तरी शोधून देईल आणि मग त्यामुळे माझा संसार आपोआप सुखाऽऽऽचा होईल’. छोटय़ा गावांमध्ये, पुणे-मुंबईखेरीज महाराष्ट्रभरातल्या मोठय़ा शहरांत मुलींच्या विचारात बऱ्यापैकी फरक आढळतो. मुलाच्या श्रीमंतीविषयी तर्क चालू असतात. पोशाख, शिक्षण, वाहन, कामाचं ठिकाण, बरोबरीची मुलं याविषयी अंदाज बांधणं चालू असतं. वडील काय करतात, मालमत्ता किती, शेती किती, याची छोटय़ा गावांत सबंध गावाला मुळात माहिती असतेच. शहरात सगळ्यांचाच पोशाख आधुनिक असतो. राहणीवरून काही पत्ता लागत नाही. त्यामुळे व्यवसाय, नोकरी याबद्दलची माहिती आवश्यक ठरते. वधू-वर सूचक मंडळांच्या जाहिराती बघितल्या की, ‘क्रॉस सेक्शन’ची माहिती समजते. त्यात मुलाचा ‘पगार’ हाच महत्त्वाचा मुद्दा असतो.
अभ्यास मंडळात एका गोष्टीची नेहमी चर्चा चालते. लग्नाच्या वयात एखाद्या मुलाची श्रीमंती आवडली तर ती त्याची स्वत:ची कमाई कशी असेल? खरी परीक्षा त्या मुलाकडे श्रीमंत होण्यासाठी लागणारे गुण आहेत की नाहीत, ही नको का असायला? आईवडील काय शिकले, काय करतात, किती पैसे मिळवतात, यावरून आईवडिलांचा आर्थिक स्तर कळायला मदत होते खरी; पण मुलाची धमक कशी कळणार? ‘मनी पर्सनॅलिटी’ कशी कळणार? जिथे तो मुलगा काम करत असेल, तिथल्या त्याच्या सहकाऱ्यांशी बोलणं, हे मला खूप गरजेचं वाटतं.
पूर्वीचं त्रिसूत्र ‘अन्न, वस्त्र, निवारा’ होतं आणि त्या तीनही गोष्टी म्हणजे एकत्रितपणे चरितार्थाची सोय असं म्हणून आधुनिक त्रिसूत्री आपण कशाला म्हणतो आहोत हे स्पष्ट करू या. ‘चरितार्थ, लैंगिक स्वास्थ्य आणि सन्मान’ ही नवी त्रिसूत्री. ज्यांना हे मी म्हणतोय ते मान्य नाही असे खूप जण असणारच आहेत. पण तेही मला मान्य आहे ना!
— अनिल भागवत.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply