२३ मे १९०४ रोजी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे पहिले जागतिक ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
जगातील १३० पेक्षा जादा देश कुस्ती खेळतात, त्याचबरोबर कुस्ती बघण्यासाठी नेहमीच प्रेक्षक गर्दी करत असतात.
कुस्ती या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्रानेच सर्वात मोठे महत्त्व दिले आहे. तसा हा पारंपरिक खेळ आहे. छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिला आणि पश्चिम महाराष्ट्रात खास करून कोल्हापूर जिल्ह्यात कुस्तीचे आजही महत्त्व आहे. खासबागच्या मैदानावर आजही हजारो लोक कुस्तीच्या दंगलीला गर्दी करतात. अजूनही ग्रामीण भागात, खेड्यापाड्यातसुद्धा तालमी आहेतच. लाल आखाड्यात माती आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हय़ांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरत आहेत. त्यातूनच महाराष्ट्र केसरी तयार होतात. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले, पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील एकाही मल्लाला त्यांच्याएवढी उंची गाठता आली नाही.
कुस्ती हा मराठी शब्द ‘कुश्ती’ या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्व खेळले जाई, त्यास कुश्ती हे नाव प्राप्त झाले. फार्सी भाषेत कुश्त म्हणजे ठार मारणे किंवा कत्तल करणे. लक्षणेने प्रतिस्पर्धावर शक्तीने वा युक्तीने मात करुन त्याला नामोहरम करणे, हा कुस्ती ह्या शब्दाचा अर्थ आहे. कुस्तीचा प्रधान हेतू तोच असतो.
आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढया चढया करीत आला, त्यांतूनच कुस्तीच्या द्वंद्वाचा उगम झाला. छोटे प्राणी माठया प्राण्यांवर युक्तीने कशी मात करतात व स्वत:चा बचाव करू शकतात हे पाहून, मानवाने मल्लविद्येची उपासना व जोपासना सुरू केली. पुढे मानवामानवांमधील द्वंद्व स्वत:चे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी मल्ल विद्या उपयुक्त ठरली. कालांतराने या प्राथमिक द्वंद्वास जागतिक स्वरूप प्राप्त झाले व त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनत गेले. देशोदेशी त्यामध्ये विविधता निर्माण झाली असली, तरी त्यातील मुलभूत तत्वे कायमच आहेत.
कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातील मल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते. कृष्णाने मुष्टिक व चाणूर ह्या कंसाच्या दरबारातील महामल्लांना मल्लयुध्दात मारून शेवटी कंसालाही मारले. पांडव अज्ञातवासात असताना भीमाने जीमूत नावाच्या मल्लाला मल्लयुध्दात ठार केले आणि पुढे कीचकाला व जरासंधलाही ठार मारले.
इ. स. पू. ३००० वर्षे इजिप्त देशातील नाईल नदीजवळ बेनीहसन येथील मशिदीच्या व दर्ग्याच्या भिंतींवर केलेल्या कोरीव कामात कुस्त्यातील डावपेचांचे शेकडो देखावे पहावयास मिळतात. प्राचीन ग्रीक वाङ्मयातही मल्लयुध्दाचा उल्लेख आढळतो. हामरच्या इलीअड या सुप्रसिध्द महाकाव्यात ऍजेक्स ओडिसियस यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीचा उल्लेख आहे. ग्रीक सांस्कृतीत सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडा सामन्यांत मल्लयुध्दाचा समावेश केलेला होता. पायथॅगोरस या सुप्रसिध्द ग्रीक तत्ववेत्याचा शिष्य मिलो याने मल्लयुध्दात पराक्रम केला होता. ऑलिंपिक सामन्यांत त्याने सलग सहा वेळा कुस्तीत अजिंक्यपद मिळविले होते. ग्रीक लोकांनी कुस्तीची कला बरीच प्रगत केली होती. त्यांच्या पँक्रॅशियन या कुस्ती पध्दतीत प्रतिस्पर्ध्यास ठोसे मारून, फेकून, जायबंदी करून शरण यावयास लावीत. हा प्रकार ऑलिंपिक सामन्यात रूढ होता. पुढे त्यात बदल होत जाऊन साधी निरूपद्रवी चितपटीची कुस्ती आली.
कोरोनामुळे कित्येक दिवसांपासून तालमी, आखाडे बंद आहेत त्यामुळे मल्लांना सराव करणे अवघड झाले आहे. आजच्या कुस्तीदिनी आशा करूयात, लवकरच हे कोरोनाचं संकट दूर होईल आणि पुन्हा एकदा शड्डूचे आवाज व जोर बैठकांचे हुंकार घुमू लागतील.
सर्व कुस्तीगीर, वस्ताद मंडळी व कुस्ती शौकिनाना जागतिक कुस्ती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!!
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply