वसंत आबाजी डहाके यांचा जन्म ३० मार्च १९४५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील ‘बेलोरा’ या गावी झाला.
वसंत आबाजी डहाके हे मराठीचे भाषातज्ज्ञळ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे तर पाचवी ते बी.ए. पर्यंतचे शिक्षण चंद्रपूर येथे झाले. त्यां वेळेपासून ते कविता करीत असत.
१९६६ साली ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले.
‘कविता लिहितो म्हणून मी आहे’ असे ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके म्हणतात, तेव्हा ते म्हणणे फक्त कवितेपुरते नसते. अभिव्यक्तीचा व्यापक पैस त्यामागे असतो.’
आपल्या अस्तित्वाच्या तुकडय़ातुकडय़ांचे काम करीत, भाषेच्या सडसडण्याचा आवाज ऐकणे, याशिवाय दुसरे काहीच नव्हते करण्यासारखे..’ असे म्हणत डहाके साठच्या दशकापासून लिहिते आहेत. सुरुवातीला काही नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी त्यांना खरी ओळख मिळाली ती १९६६ साली.. ‘सत्यकथे’तल्या एका अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘योगभ्रष्ट’ या त्यांच्या दीर्घ कवितेने! साठच्या दशकातील अस्वस्थ तरुणाईच्या मनातील कल्लोळ टिपणारी ही कविता होती.
आपल्या काळाविषयीचे काव्यात्म विधान करणाऱ्या त्यांच्या अशाच काही कवितांचा गुच्छ पुढे १९७२ साली ‘योगभ्रष्ट’ याच शीर्षकाने प्रसिद्ध झाला. या कवितासंग्रहामुळे तेव्हा सखोल सामाजिक भानाचा टोकदार आविष्कार मराठी कवितेत झाला.
पुढे १५ वर्षांनंतर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘शुभवर्तमान’ आणि त्यानंतर दहा-दहा वर्षांच्या अंतराने आलेले ‘शुन:शेप’ व ‘चित्रलिपी’ आणि अगदी अलीकडचे ‘रूपान्तर’ व ‘वाचाभंग’ हे कवितासंग्रह असा त्यांचा कवितागत प्रवास आहे.
आजूबाजूची राजकीय-सामाजिक परिस्थिती आणि तिचा माणसावर होणारा परिणाम यांच्यातील द्वंद्व मांडणे हे डहाकेंच्या कवितेचे सूत्र राहिले आहे. वास्तवाच्या अनुभवातून आलेले अस्वस्थपण मांडणे ही त्यांच्या कवितेची खासियत. जेव्हा जेव्हा हे मांडणे कवितेच्या चौकटीत सामावणारे नव्हते, तेव्हा तेव्हा त्यांनी कथात्म-वैचारिक लिखाणातील शक्यता अजमावल्या. ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या असोत वा ‘मालटेकडीवरून..’सारखे ललित लेखन असो किंवा ‘कवितेविषयी’, ‘कविता म्हणजे काय?’, ‘मराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक’ आदी समीक्षाग्रंथ असोत; डहाके यांच्या लेखनात विविध विषयांच्या तौलनिक अभ्यासातून आलेल्या मूल्यगर्भ चिंतनाची डूब जाणवते. म्हणूनच साहित्याचा आणि त्यामागील विचारव्यूहाचा साक्षेपी अभ्यास करणारे डहाके ‘दृश्यकला आणि साहित्य’ यांच्यातील संबंध तपासू शकतात.
आपल्याकडे मराठी साहित्य म्हणजे निव्वळ आनंदयात्राच, असा सर्वसाधारण समज. अशी समज असणाऱ्या समाजात सृजनाच्या अनेकविध शक्यता आणि त्यामागील तात्त्विक विचार जाणून घेण्याची, ती मांडण्याची असोशी असणे तसे दुर्मीळच. पण डहाकेंच्या लेखनात ती सातत्याने आढळते, किंबहुना ती अधिक उन्नत होत गेलेली दिसते. ही जाणण्याची असोशी आणि ती मांडण्याचे, मांडू देण्याचे स्वातंत्र्य ज्या समाजात असते, तो समाजही उन्नत होत जातो. तसे न झाल्यास काय होते, हे डहाके यांनीच सांगितले आहे- ‘गोष्ट सांगितली गेलीच पाहिजे, नाही तर ती वाटेल त्या रीतीने बाहेर येते, दडपून ठेवणाऱ्या व्यक्तीचा (आणि समाजाचाही) सूड घेते.’
“चित्रलिपी” या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्रकाशित साहित्य संपदा
काव्य संग्रह- शुभवर्तमान (१९८७).योगभ्रष्ट (१९७२),
शुन:शेप (१९९६),चित्रलिपी
ललित साहित्य-अधोलोक (कादंबरी),यात्रा-अंतर्यात्रा (ललितलेख ),प्रतिबद्ध आणि मर्त्य (कादंबरी), मालटेकडीवरून (ललित लेखसंग्रह),सर्वत्र पसरलेली मुळे (दीर्घ काव्य),
वैचारिक/ संशोधनपर साहित्य
कवितेविषयी- दृश्यकला आणि साहित्य,मराठीतील कथनरूपे,मराठी नाटक आणि रंगभूमी – विसावे शतक,
मराठी समीक्षेची सद्यःस्थिती आणि इतर निबंध,
मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती (संशोधित लेखन),
वसंत आबाजी डहाके यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कादंबरी व कवितेसाठी १९८१ व १९८७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार.
२००३ मध्ये गंगाधर गाडगीळ पुरस्कार.
२००५ मध्ये महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार.
२००९ मध्ये विदर्भ साहित्य संघाचा “जीवनव्रती” पुरस्कार.
साहित्य अकादमी पुरस्कार २००९: ‘चित्रलिपी’ या काव्यसंग्रहासाठी.
२०१० मध्ये मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानतर्फे ‘शांता शेळके’ पुरस्कार.
कविवर्य दामोदर अच्युत कारे पुरस्कार.
पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply