माधव मनोहर म्हणजे माधव मनोहर वैद्य यांचा जन्म नाशिक येथे २० मार्च, या १९११ रोजी झाला. माधव मनोहर हे मराठीमधील समीक्षक, नाट्य-समीक्षक, नाटककार, लेखक होते. ते एस. एन. डी.टी. कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, आणि ते तिथून निवृत्त झाले. इंग्रजी वाङ्मय वाचल्यावर माधव मनोहर यांना मराठी साहित्य आणि मराठी नाटक खूपच खुजे आणि परावलंबी असल्याची जाणीव झाली. येथूनच पुढे माधव मनोहर या समीक्षकाचा उदय झाला. इंग्रजीतले चांगले वाङ्मय मराठीत आणण्याचा त्यांनी सपाटा लावला. त्यावेळी त्यांनी अनेक वृत्तपत्रातून समीक्षषणात्मक विपुल लेखन केले.
माधव मनोहर वृत्तीने स्थितप्रज्ञ होते. त्यामुळे टीका आणि स्तुती दोनही त्यांना समान असे. कोणी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली आणि तीही शब्दांच्या माध्यमातून, तरी ते त्याला लेखणीने प्रत्युत्तर देत असत. त्यांची लेखणी इतकी परखडपणे बोलत असे त्यांना कधी काही बोलावेच लागले नाही. मराठी साहित्यावर टीका करताना ते साहित्य कसे आहे यावरच त्यांचे लक्ष असे, ते कोणाचे आहे याला त्यांच्या लेखी काहीच महत्त्व नसे. आचार्य अत्रे यांनी त्याच्या संबधी जे त्यांच्या शैलीत उद्गार काढले त्याची चर्चा खूपच झाली होती.
आम्ही कॉलेजमध्ये असताना त्यांची खूप भाषणे आइकली आम्ही कॉलेजला असताना दोन माणसांची भाषणे कधीही चुकवली नाही मग ती कुठेही असोत ग. वा. बेहेरे आणि माधव मनोहर बरेच काही नवीन कळायचे. ग. वा.बेहरे यांना तर त्यावेळी ‘ गोरा अत्रे ‘ म्हणत. माधव मनोहर यांच्याशी बोलण्याचे माझे डेअरिंग होत नव्हते, बोलणार काय कपाळ त्याच्या मानाने माझे वाचन तोकडेच होते.माझा मित्र प्रवीण दवणे त्यांचा काही काळ लेखनिक होता तेव्हा आम्ही शिवाजी पार्कला जायचो. प्रवीण त्यांच्याकडे लिहायला गेला की आम्ही मित्र शिवाजी पार्क मध्ये फिरायचो. फिरून झाल्यावर त्यावेळी मोबाईल नसल्यामुळे सुधीर फडके यांच्या बिल्डिंगखाली वाट बघायचो, पण त्याच्या घरी जायचे डेअरींग होत नव्हते. प्रवीण आला की त्याच्याबद्दल खूप सांगायचा. आपल्या पुस्तकांवर सातत्याने टीका होत असली तरी अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकांच्या प्रस्तावना माधव मनोहर यांच्याकडून लिहून घेतल्या.
माधव मनोहर यांचे वाचन अफाट होते, त्यावेळी अनेक लेखक मंडळी, नाटके लिहिणारे विदेशी साहित्यातील काही मराठीत आणत आणि आपणच लिहिले असा टेंभा मिरवत, माधवरावाना मात्र त्याच्या अफाट वाचनामुळे हे कुठून आणले आहे ते समजत असे आणि ते त्याचा खरपूस समाचार घेत असत. आजही किती मराठी लेखक इंग्रजी वाचतात हा पण एक समीक्षेचा विषय आहे. एखाद्याबद्दल न वाचताही लिहिणारी मंडळी आजूबाजूला दिसतात तेव्हा वाटते आणि मनात विचार येतो ही माणसे ‘ वरच्या ‘ पदाला पोहचतातच तरी कशी हा प्रश्न हल्ली अनेकांना पडतो. दुर्देवाने या लेखन ‘ व्यवसायात ‘ अशी माणसे खूपच आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने समीक्षा केली जाते का हाही संशोधनाचा विषय आहे कारण हल्ली ‘ प्रमोट ‘ करण्याला महत्व आहे. परंतु माधव मनोहर यांचा खरोखर एक धाक होता, ते कोणी कितीही मोठा असो त्याला जुमानत नसत. त्यामुळे ते साहित्यातील चोर्या सहज पकडत. त्यावेळी वसंत कानेटकरांच्या सर्व नाटकांवर परखडपणे हल्ला करणार्या माधव मनोहर यांनी त्यांच्या ’ गगनभेदी ’वर प्रशंसेची मुक्ताफळे उधळली होती.
मला आठवतंय एक वृतापत्रांत ते दूरदर्शनच्या आठवड्याच्या कार्यक्रमाबद्दल लिहीत, वास्तविक पाहता ते अत्यंत साधे लिखाण होते पण माधवराव खास वेगळ्या शैलीने लिहीत आणि ते सहसा दर्दी वाचक चुकवत नसत. त्यांनी विपुल लेखन केले, परंतु त्यांची ‘ दौरा ‘ नावाची कादंबरी वाचून मी त्यावेळी अगदी हबकून गेलो होतो.
त्यांनी अनेक नाटकाची भाषांतरे करून मराठीत आणली, कथा, कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांची नावे अशी आहेत. आई हे भाषांतरित नाटक, आजोबांच्या मुली ही रूपांतरित एकांकिका, आपण सार्या दुर्गाबाई ही रूपांतरित एकांकिका, चेटूक हे भाषांतरित नाटक, झोपलेले जग हे भाषांतरित नाट, डावरेची वाट हे भाषांतरित नाटक, प्रकाश देणारी माणसं हे रूपांतरित एकांकिका, रामराज्य हे भाषांतरित नाटक, सशाची शिंगे हे भाषांतरित नाटक, सौदा हे रूपांतरित एकांकिका, अनाथ विद्यार्थी गृहाच्या मेळ्यासाठी पोवाडे, पदे, अन्नदाता ही अनुवादित कादंबरी, आशा, एक आणि दोन हीअनुवादित कादंबरी, किल्ली ही अनुवादित कादंबरी, क्लिओपॅट्रा (अनुवादित कथा), पंचमवेध (निवडक माधव मनोहर), मधुचंद्राची रात्र (कथा), मुलांची शाळा (कथा), स्मृतिरंग हे अप्रकाशित खंडकाव्य.
१९८१ मध्ये माधव मनोहर यांना नाट्यसमीक्षा लेखनाबद्दल विष्णुदास भावे सुवर्णपदक मिळाले.
नाट्यसमीक्षक माधव मनोहर हे सातारा येथे १९९० साली झालेल्या ७१ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
माधव मनोहर यांचे १६ मे १९९४ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply