गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी झाला. महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या ‘करमणूक’ नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत.त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी ‘मासिक मनोरंजन’मध्ये ‘बाळकराम’ ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह ‘रिकामपणची कामगिरी’ ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. राम गणेश गडकरी यांचे २३ जानेवारी १९१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply