नवीन लेखन...

WWE मधील ‘द अंडरटेकर’ मार्क कॉलॉवे

जन्म. २४ मार्च १९६५

बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र ‘कोण हा अंडरटेकर?’ असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु ‘अंडरटेकर’ हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला!

मार्क विल्यम कॉलॉवे. हे नाव फारसं कुणाला माहिती असण्याचं काही कारण नाही. १९९० मध्ये, वयाच्या साडे चोविसाव्या वर्षी डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ रेसलींगच्या रिंगमध्ये ‘द अंडरटेकर’ या नावाने पाय ठेवल्यापासुन मार्क कॉलॉवेनं जगाला सगळंकाही विसरायला लावलंय, अगदी स्वतःचं खरंखुरं नावही. रेसलींग न बघणा-यांसाठी तो एक ‘भयावह पहेलवान’ आहे. फॅन्ससाठी तो सर्वात मोठा ‘ईंटरटेनर’ आहे, आणि व्यावसायिक रेसलींगच्या क्षेत्रात आज ‘द अंडरटेकर’ हे दैवत आहे. जगभर ‘व्यावसायिक रेसलींग’ जाणणा-या आणि ना जाणणा-या आबालवृद्धांकरिता या क्षेत्राचा शुभंकर बनलेल्या ‘अंडरटेकरचा’ ‘बि-लेटेड’ हॅपी बर्थडे हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या रवीवारी होणा-या डब्ल्य़ुडब्ल्य़ुईच्या वर्षातल्या सगळ्यात मोठ्या ‘रसलमेनिया’ नावाच्या स्पर्धेमध्ये दरवर्षी आपोआपच साजरा होत असतो. कारण गेल्या एकोणविस वर्षापासुन या स्पर्धेत अंडरटेकरने पराजय पाहिलेला नाही. या वर्षीच्या रसलमेनियामध्ये जेव्हा स्टेडिअम अंधारात बुडून जाईल, दूरवरच्या स्मशानातलं मोठठं घड्याळ एकामागुन एक बारा ठोके देइल, गुढ निळसर प्रकाशकिरणांनी आसमंत भारला जाईल, आणि पांढ-या धूराच्या लोटांमधून काळे कपडे घातलेला सहा फुट दहा ईंचाचा, एकशे छत्तीस किलोचा ‘द अंडरटेकर’ धिम्या गतीने एक एक पाऊल टाकत रिंगमध्ये पदार्पण करेल तेव्हा त्याच्या खांद्यावर स्मशानातल्या हाडं गारठवीणा-या थंडीपासुन बचाव करणारा काळा कोटच नव्हे, तर आपल्या विजयामालीकेमध्ये आणखी एका वर्षाची बेरीज करून २०-० असा स्वतःचाच विश्वविक्रम करण्याची महाजबाबदारीही असेल. त्याचा खेळ आणि त्याचा विजय पाहू ईच्छीणा-या जगभरातील कोट्यावधी चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझंही असेल. आणि त्याच्या खेळावर कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणुक केलेल्या व्यावसायिक रेसलींग जगताच्या आर्थीक उलाढालीचा सगळा खेळही असेल. ‘द अंडरटेकर’ अर्थात मार्क कॉलोवे गेल्या पंचवीस वर्षांपासुन हा सगळा ‘खेळ’ समर्थपणे खेळतोय.

मात्र पंचविस वर्षापुर्वी मार्कला हा खेळ मुळीच खेळायचा नव्हता. अमेरिकेल्या प्रत्येक उंचपु-या आणि धिप्पाड मुलाचं जे एकमेव स्वप्न असतं तेच त्याचंही होतं – बास्केटबॉल! ह्युस्टन (टेक्सास) मधल्या कॅथरीन आणि फ्रॅंक कॉलॉवे या उच्च मध्यमवर्गीय दाम्पत्याच्या पाच मुलांपैकी मार्क हे शेंडेफळ. बास्केटबॉलचं जीतकं वेड तीतकंच कौशल्यही भारीच. ल्युफकिनमधील सन्मानाच्या ऍजेलीना कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला तोच मुळी बास्केटबॉलच्या शिष्यवृत्तीच्या भरवश्यावर! मात्र नियतिच्या मनात वेगळंच काही होतं. कॉलेजमध्ये एक एक पराक्रम करणा-या मार्कचा मैदानातच भयंकर अपघात झाला. टोंगळा असा काही दुखावला, की मैदानातून बाहेरच जावं लागलं. पुढची अनेक वर्षे या दुखापतीतून सुटका होणार नव्हती. मग दूसरं काहीतरी करायचं ठरलं.

त्या वेळी रॉड्रीक मॅकमॅहॉन यांनी अमेरीकेत सुरू केलेल्या व्यावसायिक रेसलिंगचं चांगलंच पेव फुटलेलं होतं. बॉक्सींग, मिक्स्ड मार्शल आर्ट, आणि बेबंद मारामारी या सगळ्यांचा संगम असलेली ही विचित्र स्पर्धा. त्यातही ग्लॅमर, अभिनय, माईंड गेम ईत्यादी यायला हवं अशी व्यवस्था केलेली. आपल्या नावाने लढता यायचं नाही. कुठलंतरी पात्र रंगवा. त्या पात्राच्या रूपाने लढाई करा. त्याला जींकवा, त्याला हरवा, असा हा खेळ. एकोणीस वर्षाच्या मार्कने या क्षेत्रात पाउल ठेवलं. अनेक नावं आणि अनेक पात्रं रंगवली. काही लढती जिंकल्यादेखील. व्यावसायिक रेसलींगचे सामने घेणा-या अनेक कंपन्या त्याने बदलवल्या.

१९८०-९० चा तो काळ होता. ‘डब्ल्युडब्ल्युएफ’ या सगळ्यात मोठ्या कंपनीशी पहिला करार झाला. व्हिन्सेन्ट मॅकमॅहॉन त्या वेळला आपल्या वडिलांची कंपनी सांभाळत होता (आजही सांभाळतो आहे.) त्याच्या सुपिक डोक्यातून उंचपु-या मार्कसाठी एका पात्राचा जन्म झाला. आजवर असं पात्र रेसलींगच्या रिंगमध्ये आलंच नव्हतं. जुन्या काळातील ख्रिश्चन स्मशानभुमीमध्ये राहणारा, तीथली कबर खोदण्यापासुन सगळी व्यवस्था पाहणारा म्हणजे अंडरटेकर! मुळात कल्पनाच भयावह. थेट स्मशानातून, ते रहस्य, ते गुढ, आणि त्या कपड्यांसह आलेला, तांत्रीक, अघोरी शक्तींनी परिपुर्ण असा अंडरटेकर! रिंगमध्ये पहिली एन्ट्री घेतल्या दिवसापासुन ते आजतागायत ‘द अंडरटेकर’ ची हीच ओळख कायम आहे. त्याच्या अनेक दंतकथा बनल्या. तो मरून परत आलाय. त्याला जीवंत गाडलं तरीही तो परतला. त्याला जाळल्यावरही तो जीवंत राहिला. तो अचानक प्रगट होतो. अचानक गायब होतो. आणि ईतरही अनेक! अर्थात हे सगळं लोकांनी रेसलींग पहावं म्हणुन विणलेलं जाळं. अगदी त्याचं मुळही ‘ह्युस्टन’ नसुन ‘डेथ व्हॅली’ असल्याचं सांगुन, त्याच्या शेवटच्या वाराला ‘लास्ट राईड’ आणि ‘टॉम्बस्टोन’ अशी नावं देऊन, त्याच्या व्यक्तीमत्त्वाभोवतीचं मृत्युचं मळभ आणखीच दाट करण्यात आलं.

मार्क कॉलॉवे मात्र त्यात चपखल बसला. विस वर्षांच्या वाटचालीत सगळ्याच चॅंम्पियनशिप्सचे बेल्टस त्याने आपल्या कंबरेभोवती गुंडाळले, जवळपास सर्व मोठमोठ्या लढवैय्यांना धूळ चारली. अगदी आपल्या भारतातून तीकडे गेलेल्या महाकाय ग्रेट खलीलाही हरवलं. या सर्व चॅम्पीअनशिप्सपेक्षा ‘द अंडरटेकर’ हे नाव केव्हाच वरच्या पातळीवर पोचलं. तो त्याच्या खेळाचा राजदूत बनला.

मात्र या भितीदायक पात्राचा कधीकधी कंटाळाही येऊच नये का? तसा तो मार्कलाही आला. खासकरून दोन गोंडस मुलींचा बाप झाल्यावर असले डोळे पांढरे करणे, भुताचे खेळ करणे त्याला नकोसे वाटू लागले. म्हणुन मग त्याने अमेरिकन बॅड ऍस नावाचं एक पात्र जगायला सुरूवात केली. मोटरसायल चालवण्याची त्याला भारी आवड. मोटरसायलचं एक मोठं कलेक्शनच त्याच्याकडे आहे. त्यातूनच एक गाडी काढून थेट गाडीवर बसुनच त्याने रिंगमध्ये जाणं सुरू केलं.

मात्र जुन्या अंडरटेकरची आठवण कुणालाच पुसता आली नाही. २००४ मध्ये आपल्या जुन्या रूपात त्यानं पुनरागमन केलं. त्यानंतर आजपर्यंत ‘डेडमॅन’ रेसलींग जगतावर राज्य करतो आहे. रेसलींगच्या चाहत्या तरूण वर्गासाठी ‘अंडरटेकर’ म्हणजे स्फुर्ती, शक्तीचं स्थान आहे. अमेरिकेच्या स्थलसैन्यामधील सैनिकांना प्रोत्साहन म्हणुन त्यांच्याबरोबर थेट छावणीत जाऊन राहणारा; महाविद्यांलयांमध्ये जाऊन बास्केटबॉलचे धडे देणारा, आणि रेसलींगच्या रिंगच्या बाहेर आल्यावर वाचन, सिनेमा, बॉक्सींग, रेसिंग ईत्यादींची आवड बाळगणारा, अतीशय नर्मविनोदी आणि हसतमुख व्यक्तीमत्त्वाचा अमेरिकन मध्यमवयिन माणूस ही मार्क कॉलॉवेची खरी रूपं आहेत. रेसलींगव्यतीरिक्त स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचा त्याचा व्यवसायही आहे. अर्थात भागीदारीमध्ये. कारण सेलीब्रिटी असल्यामुळे मार्क स्वतः डिल फिक्स करायला जाऊ शकत नाही. मात्र मागे एकदा एंजेलीना जॉली आणि ब्रॅड पिट यांना एक अपार्टमेन्ट विकलं, तेव्हा तो स्वतः कागदपत्रं घेऊन गेल्याचं अमेरिकेल्या नियतकालिकांनी प्रकाशीत केलं होतं.

शरीर साथ देतंय तोवर रेसलींग रिंगची मजा आहे, हे मार्कला ठाऊक आहे. त्यामुळेच त्याचा फिटनेस कमालीचा आहे. आजही दिवसातले सहा तास तो जीममध्ये असतो. ज्या वयात अनेकजण या जीवघेण्या खेळातून निवृत्ती पत्करून समालोचक किंवा मॅनॅजर होतात, त्या वयात तो त्याच्या करिअरच्या सर्वात देदिप्यमान शिखरावर पोचलेला आहे. कदाचित येत्या रवीवारी २०-० चा विश्वविक्रम काबीज करून तो शतकांची शंभरी पुर्ण करणा-या सचिनसारखा ‘आभाळाएवढा’ही होउन बसेल.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..