मी जेव्हा जन्मलो, तेव्हा तो छत्तीस वर्षांचा होता.. चित्रपटात काम करायला सुरुवात करुन त्याला तेरा वर्षे झाली होती. नवकेतन फिल्म्स या स्वतःच्या निर्मिती संस्थेची स्थापना करुन त्याला दहा वर्षे झालेली होती.
पंजाब मधील गुरुदासपूर येथे जन्म झालेल्या या धरम देव पिशोरीमल आनंदने पासष्ट वर्षांची प्रदीर्घ सिने कारकिर्द करुन मनोरंजनाचा ‘धर्म’ अंगिकारला..
१९५४ साली, सहा वर्षांपूर्वी सुरैयाशी ब्रेकअप झाल्यानंतर ‘टॅक्सी ड्रायव्हर’ चित्रपटाच्या शुटींग दरम्यान त्यानं कल्पना कार्तिकचा गेटअप बदलण्यासाठी स्वतः तिचे केस कापून बाॅयकट केला व तिच्याशी ‘गांधर्व’ विवाहही केला..
पासष्ट वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्या असंख्य नायिका झाल्या. अगदी आईच्या मांडीवर बसून त्याचा चित्रपट पहाणारी स्वप्नसुंदरी हेमामालिनी देखील त्याच्या अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपटांची नायिका झाली..
सुरुवातीला ढगाळ्या पॅन्टमधला, केसांचा कोंबडा ठेवलेला देव, काळानुरूप बदलत गेला.. ‘तीन देवीया’ चित्रपटाच्या दरम्यान त्याने आपली हेअर स्टाईल बदलली. ‘गाईड’ चित्रपटात तो जुन्या व नव्या अशा दोन्ही रुपात दिसला.. ‘गाईड’ चित्रपटाने त्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.. खरंतर त्यासाठी ‘देव’पेक्षा, त्याचा ‘पुजारी” गोल्डीचीच मेहनत जास्त होती…
‘गॅम्बलर’ मध्ये त्याने लावलेली मिशी हास्यास्पद वाटत होती. ‘ज्वेल थीफ’ चित्रपटाच्या यशातही गोल्डीचा सिंहाचा वाटा होता.. त्यानंतरचा ‘जाॅनी मेरा नाम’ हा उत्कृष्ट चित्रपट विजय आनंदच्या दिग्दर्शन व संकलनाचा ‘माईलस्टोन’ ठरला!!
‘प्रेम पुजारी’ चित्रपटाद्वारे त्याने निर्मिती व दिग्दर्शन या दोन्ही बाजू सांभाळल्या. चित्रपट उत्तम झाला.. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान त्याने सर्व कलाकार, तंत्रज्ञांची काळजी घेतली.. त्यांची मर्जी सांभाळली.. या चित्रपटातील ‘रंगीलाऽ रे..’ या गाण्यासाठी परदेशातील ‘इंडिया हाॅल’ मिळाला नाही म्हणून त्याचे फोटो काढून तसाच सेट स्टुडिओत, उभा केला.. ते गाणं पडद्यावर पहाताना हा सेट आहे, हे सांगूनही कुणाला खरं वाटलं नाही.. ही कमाल केली होती, नवकेतनचे कलादिग्दर्शक टी. के. देसाई यांनी!!
‘ज्वेल थीफ’ च्या शुटींग दरम्यान देवला ‘हरे राम हरे कृष्ण’ चित्रपटाची कथा सुचली. त्या चित्रपटातील बहिणीच्या भूमिकेसाठी त्यानं तनुजाला विचारलं होतं, तिने नायिकेची भूमिका मागितली.. शेवटी ती भूमिका झीनत अमानच्या नशिबात होती आणि तिनं त्याचं सोनं केलं…
त्यानंतर त्यानं ‘इश्क इश्क इश्क’ चित्रपटाची निर्मिती केली. ‘बनारसी बाबू’, ‘अमीर गरीब’, ‘वाॅरंट’, ‘जानेमन’, ‘जोशीला’, ‘छुपा रुस्तम”, ‘देस परदेस’, ‘स्वामीदादा’ अशा त्याच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाचे मी फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहिलेले आहेत..
१९८४ साली ‘हम नौजवान’ चित्रपटाचं शुटींग पुणे विद्यापीठात चालू असल्याचं समजलं. मी त्याचं काढलेलं चित्र घेऊन धावतपळत त्या ठिकाणी पोहोचलो.. तेव्हा शुटींग पॅकअप होऊन, देव निघाले होते.. मी त्यांच्या कारच्या काचेवर चित्र धरले.. कार थांबली.. देवने चित्र हातात घेऊन सही केली व मला परत दिले.. आज ते चित्र, माझी एक अविस्मरणीय आठवण आहे..
देवचं वय झालं तरी अभिनय व चित्रपट निर्मिती थांबलेली नव्हती.. चित्रपट येत होते, अपयशी ठरत होते.. एवढं अपयश पदरी असूनही त्यानं कुणाचेही पैसे बुडवले नाहीत. शेवटी दहा वर्षांपूर्वी लंडनमध्ये या चिरतरूणाला हृदयविकाराने “चिरनिद्रा'” घ्यावी लागली..
त्याची पत्नी, कल्पनाचा परवाच नव्वदावा वाढदिवस साजरा झाला. मुलगा सुनील व कन्या देवीशा सोबत ती अमेरिकेतच स्थायिक झालेली आहे.. देव आनंद, विजय आनंद, चेतन आनंद हे तिघेही भाऊ आज या जगात नाहीत.. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत जे पासष्ट वर्षांचं योगदान दिलं ते कुणीही विसरु शकत नाही…
आज त्यांच्यापैकी भारतात कुणीही नाही. त्यांनी ज्या स्टुडिओत चित्रपट निर्मिती केली ते स्टुडिओच त्या वैभवाचे साक्षीदार आहेत.. अन्यथा ही सगळी ‘देव’ नाही, तर ‘दंतकथा’च वाटेल….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२६-९-२१.
Leave a Reply