न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।
वाग्भट सूत्रस्थान 5-5/6
“चिखल, शेवाळ, गवत, व पाने यांनी व्याप्त व गढुळ झालेले, ऊन, चांदणे, व वायु यांचा जेथे कधीही प्रवेश झाला नाही अश्या ठिकाणचे, पावसाचे पाणी, नुकतेच मिळाल्यामुळे राड झालेले, जड, फेस आलेले, कृमीयुक्त, तापलेले, व दातास कळा उत्पन्न करण्यासारखे गार अशा प्रकारचे पाणी कधीही पिऊ नये.”
हा झाला ग्रंथातील एक श्लोक आणि त्याचा शब्दशः अर्थ. छापील उत्तरासारखं. आता ग्रंथकारांना नेमकं काय म्हणायचंय ते पाहू.
अशा ठिकाणचे पाणी पिऊ नका, ज्या जलाशयामधे तळात खूप चिखल, गाळ साठलेला आहे. अशा जलाशयातील झरे या चिखलामुळे बंद झालेले असतात. झरे बंद झाल्यामुळे पाण्याचा पाझर आणि पुनर्रभरण नीट होत नाही, पाण्याचा उसपा आणि साठा याचे संतुलन बिघडते. आणि पाणी पचायला जड होते. हा चिखल किंवा गाळ जलाशयाच्या तळामध्ये असतो आणि शेवाळ, पाने पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असतात. पाण्याचा पृष्ठभाग जर पूर्णपणे झाकला गेला असेल तर सूर्याचे प्रकाशकिरण तळागाळापर्यंत पोचू शकत नाहीत. सूर्याचे औषधी किरण जर पाण्यात पडले नाहीत तर पाण्यातील अशुद्धी दूर होत नाही, म्हणून असे आच्छादन असलेले पाणी देखील पचायला जड होते.
खालून चिखल वरून शेवाळ, पाण्यात पडलेल्या पानासारख्या कचऱ्याचे आच्छादन आणि मधे वाढणाऱ्या काही तृण वनस्पती यामुळे पाणी साठून रहाते. पाण्याचा नैसर्गिक वाहाणे हा गुण कमी होतो. पाणी गरजेपेक्षा जास्ती स्थिर होते. जिथे स्थिरपणा ( स्टॅग्नेशन)येते, जिथे गती कमी होते, तिथे पाण्यातील बुळबुळीतपणा वाढतो. शेवाळ जास्ती वाढते. पाण्यातील हालचाली मंद होतात. पाण्याची गुरूता, घनता हे गुण आणखीनच वाढतात.
गाळातील चिखल आणि वरील आच्छादन यामुळे पाण्याची घनता बदलते. आजच्या वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास पाण्याची पीएच बदलते. त्याची अम्लता किंवा क्षारीयता बदलते. असे पाणी पचायला घन आणि गुरू होते. श्लोकातील दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दांकडे विशेष लक्ष दिले की शास्त्रकारांची सूक्ष्म दृष्टी लक्षात येते.
पाण्यात हा बदल नैसर्गिक स्थितीमुळे झालेला असतो. त्याच्या इच्छेनुसार झालेला असतो.
जरूरी नाही, कि प्रत्येक वेळी मानवाच्या हस्तक्षेपामुळेच प्रदूषण होते. आणि जे जे सर्व नैसर्गिक म्हणजे निसर्गदत्त, निसर्गाने दिलेले आहे, ते सर्व उत्तम गुणाचे आणि मानवाच्या आरोग्याला हितकरच असेल !!??
यासाठी त्याने मानवाला बुद्धी दिली आहे. ही बुद्धी, योग्य ठिकाणी वापरून आपले कल्याण कशामधे आहे, याचा विवेक मानवाने करावा अशी त्याची इच्छा असते. त्याच्या इच्छेनुसार, आपली बुद्धी हवी तिथे वापरता येणे, याला विवेक म्हणतात, सारासार विचार करणे !!!
हे योग्य हे अयोग्य असा विचार करणे ज्याला जमले तो निरोगी राहिलाच म्हणून समजा !
सूत्रस्थान 5-5/6 भाग एक. ( क्रमशः )
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.12.2016
Leave a Reply