पाणी शुद्धीकरण भाग एक
दूषित पाणी केवळ पिण्यासाठी नव्हे तर स्नानादिकांसाठी वापरले तरी अनेक रोग होतात, असे ग्रंथकारांनी नमूद करून ठेवले आहे.
दूषित पाण्यात कोळी, मासे इ. प्राण्यांची विष्ठा,मूत्र,त्यांच्या शरीरातील अन्य स्राव, किंवा त्यांचे मृत शरीर यामुळे दोष उत्पन्न होतात. तसेच अतिसूक्ष्म आणि स्थूल कृमी किटक, पालापाचोळा, चिखल, पाण्यावर वाढणारे डासाप्रमाणे असणारे अन्य जीवजंतु, किंवा त्यांच्यापासून तयार होणारे विष “जीवन” दूषित करतात.
आजच्या काळात वेगवेगळ्या रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी, अधिकृत आणि अनधिकृत कत्तलखान्यातून बाहेर पडणारे रक्त, मल, मांस, युक्त दुषित आणि कुजलेले पाणी, गावागावातून नदीमधे टाकला जाणारा उकीरड्यावरील जैववैविध कचरा, तसेच प्रत्येक घराघरातून बाहेर पडणारे साबणयुक्त रसायनमिश्रीत सांडपाणी…….. कित्ती मोठ्ठी यादी होईल…
हे सर्व दूषित पाणी आपल्या पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित करत आहेत.
भीती निर्माण करण्यासाठी नव्हे तर रोगाची कारणे शोधून काढून ती कारणे आपल्या जीवनशैलीतून कमी करता आली तर, किंवा काढता येतील तेवढी काढण्यासाठी या रोगांची यादी देतोय.
हे रोग फक्त अशुद्ध पाणी पिऊनच होतात असे नव्हे तर रोग होण्याच्या कारणामधे इतर कारणांबरोबरच दूषित पाणी हे देखील एक महत्वाचे कारण दुर्लक्ष करून चालणार नाही.
आठ प्रकारचे उदर रोग, वारंवार तहान लागणे, पोट फुगणे, वेगवेगळे तापाचे प्रकार, खोकला, भूक नाहीशी होणे, डोळे येणे, वेगवेगळे त्वचारोग, खाज येणे, गलगंड इ. अनेक रोग ग्रंथकार वर्णन करतात. त्याचबरोबर मुळव्याध, आदि गुदरोग, स्त्रीयामधील प्रदर आदि रोग, हत्तीरोग, रक्ताल्पता, शिरोरोग देखील नदीतील अशुद्ध पाणी, शुद्धी संस्कार करण्याअगोदर प्यायल्याने निर्माण होतात.
आजच्या भाषेत व्हायरल फिवरचे अनेक प्रकार नावं बदलून आपल्यासमोर रोज येत आहेत, अगदी चिकुनगुनीयापासून स्वाईन फ्लु, इबोला पर्यंत सर्व प्रकार पाण्याशी संबंधीत आहेत.
दूषित पाणी ज्या भागात आहे, त्या भागात हे आजार जास्त प्रमाणात पसरले आहेत. हे पण व्यवहारात दिसते.
या दूषित पाण्याखेरीज, अन्य ठिकाणचे जल, वापरासाठी नसेल तर याच दूषित जलावर योग्य ते शुद्धीसंस्कार करून नंतर ते वापरावे, म्हणजेच “रिसायकल” करून वापरावे, इथपर्यंत स्पष्ट आदेश देणारी आयुर्वेदाची दृष्टी, दूरदृष्टीची नाही, असे कसे म्हणू शकतो ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
28.12.2016
Leave a Reply