पाणी शुद्धीकरण भाग सहा
काल काही प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरे म्हणजेच आजची टीप होऊ शकेल.
शुद्ध पाणी आता दुर्मिळ होत चालले आहे. आता पाणीच दुर्मिळ होत चालले आहे, असे म्हटले तरी चुकणार नाही.
यावर्षी पाऊस चांगला झाला पण नियोजनाअभावी निसर्गातून आलेले पाणी तसेच वाया घालवले.
हेच नभज, आंतरीक्षज, ऐंद्रज म्हणजे ढगातून जन्मलेले, अंतरीक्षातून आलेले किंवा इंद्राने पाठवलेले पाणी, गरज म्हणून शुद्ध स्वरूपातील म्हणून किंवा देवाचे तीर्थ म्हणून त्याचा आदर सन्मान नको का करायला ???? वाराणसीहून गडूमधे भरून आणलेलं गंगाजल आपण आयुष्यभर साठवून ठेवतो. का ? तर अंतिम क्षणी तोंडात शुद्ध गंगाजल पडावे. एवढं याच महत्व, माहिती असून देखील, आमच्या डोळ्यादेखत हे पुण्यप्रदान करणारे तीर्थ, गटारात वाहून चालले आहे.
हेच शुद्ध पाणी जर योग्य त्या भांड्यात साठवून ठेवले तर ????
हो मी पावसाचे पाणीच म्हणतोय. सैराट झाल्यानंतर इंग्रजीत सांगितल्याशिवाय कळतच नाही. “रेन वाॅटर हार्वेस्टींग” विषयीच बोलतोय मी
!
ग्रंथकर्त्यांनी सुद्धा सांगितले आहे की, आकाशातून पडणारे पाणी जर योग्य प्रकारे साठवले तर त्यावर कोणत्याही संस्कारांची गरज नाही. ते पाणी आपण तसेच्या तसे पुढे नऊ महिने देखील स्नानपानासाठी वापरू शकतो. फक्त बाहेरची घाण साठवलेल्या पाण्यात येणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल.
बोअरवेलचे पाणी मात्र सूर्येंदुपवनम् अदृष्टम असल्याने परत अग्निसंस्कार आदि शुद्धीक्रिया करून पिण्यासाठी वापरावे लागेल. मूळ तत्व विसरले नाही तर काय करायला हवे ते “तो” आपोआपच सुचवित जातो.
विहीर देखील वरून उघडी असावी. कचरा, पालापाचोळा आत जाऊ नये, यासाठी त्यावर फक्त एखादे आच्छादन असावे.
पाण्यामधे सोन्याचे नाणे, चांदीची लगड किंवा कल्हई केलेला तांब्या पितळीचा तुकडा टाकून ठेवला तरी चालतो. उकळताना ठेवला तरी चालेल, किंवा नुसताच पाण्यात ठेवला तरी चालेल.फक्त सोने, चांदी, तांबे, पितळ पूर्ण शुद्ध असावे. मग अगदी गंगेतला गोटा असला तरी चालेल.
शुद्ध पाण्याची पण प्लॅस्टिकची बाटली घेऊन किती ठिकाणी फिरणार ? आणि ते शिळे पाणी किती दिवस पुरणार ? आणि ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्षच आहे, त्याठिकाणी कसले शुद्धिकरण आणि कसले काय ?
शक्यतो प्लॅस्टिकच्या बाटल्या, कळश्या, टब, बादल्या वापरू नयेत. त्यापेक्षा स्टील, तांबे पितळीची भांडी चांगली. माती आणि काचेपेक्षा तरी जास्त सुरक्षित सल्ला देतोय ना ! मग या धातुच्या भांड्यांची आतून थोडी स्वच्छता, थोडी मेहनत रोज करावीच लागेल ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
02.01.2017
Leave a Reply