पाणी शुद्धीकरण भाग आठ
पाण्यातील अशुद्धी घालवण्यासाठी आणखी काही बीयांचा वापर करतात. जसे निर्मळी या झाडाच्या बीया, किंवा शेवग्याच्या वाळलेल्या बीया. या बीया पाण्यात टाकून ठेवल्या की त्यातील औषधी गुणांमुळे पाण्यातील अशुद्धी दूर होतात.
अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यानंतर पाणी शुद्ध होते, असेही ग्रंथामधे म्हटलेले आहे. ग्रह तारे यांच्या असण्याचा आणि नसण्याचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे, असे आयुर्वेद मानतो. काही औषधे सूर्यप्रकाशात तर काही चंद्रकिरणात करायला सांगितली आहेत. काही वनौषधी विशिष्ट नक्षत्र असताना काढायला सांगितले आहे.
तसेच काही धातुंचा संपर्क पाण्यातील अशुद्धी दूर करतो. शुद्धीकरणासाठी सर्वश्रेष्ठ धातु आहे, सोने. विषहर असा त्याचा गुणधर्मही सांगितलेला आहेच. पाणी पिताना, साठवताना सोन्याच्या भांड्यात साठवावे, हे आज सर्व सामान्यांनाच नव्हे तर उच्च श्रीमंत असलेल्याना सुद्धा जमणारे नाही. ( आणि आता तर एका परिवाराकडे अमुक तोळेच ठेवण्याचे चालले आहे म्हणे ! असो ! ) सोन्याचे पाणी स्वभावाने उष्ण गुणाचे तर चांदीच्या भांड्यातील पाणी थंड गुणाचे आहे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी उत्तम गुणाचे आहे, पण ते सूर्य उगवल्यानंतर भरावे आणि सूर्यास्तापर्यंत संपवावे. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी कळकते. चव बदलते, क्वचित हिरवट छटादेखील येते.
मातीचे मडके जे पूर्ण भाजलेले असते, त्या मातीतील अशुद्धी दूर झालेल्या असतात. अशा मातीच्या मडक्यात उकळून, गाळून भरलेले पाणी ठेवले तर नक्कीच चांगले असेल.
शुद्धीकरणाचे मापदंड आज व्यवहाराच्या पातळीवर तपासलेच पाहिजेत. शक्यता आणि वास्तवात खूप अंतर असते. गृहीत धरून नाही चालणार काही गोष्टी !
धातु जर शुद्ध स्वरूपात मिळत असतील तर त्यात ठेवलेल्या पाण्याची शुद्धी होईल, नाहीतर आगीतून फुफाट्यात….
प्रत्येक गोष्टीची शुद्धी करण्याची पद्धत आणि मापदंड वेगळे असतात. तांदळाची शुद्धी पाण्याने धुण्यात होते. तर सोन्याची शुद्धी अग्नीत जाळल्याने होते. बिब्बा शुद्ध करायचा झाल्यास दुधातच उकळावा लागेल. आपल्याला एखाद्या पदार्थाची शुद्धी का आणि कोणत्या प्रकारची शुद्धी अपेक्षित आहे, हे ठरवून ती, त्या पदार्थाला अनुकुल अशी प्रक्रिया करावी लागेल.
केवळ ग्रंथात सांगितले नाही, म्हणून हे शुद्धीकरण आम्हाला मान्य नाही असे म्हणून कसे चालेल ? काही “अनुक्त” विचारात ठेवावे लागतील.
दूध हे आरोग्यासाठी चांगले असते, ही एका जमान्यातली ग्रंथोक्त गोष्ट झाली. पण कुठचे ? कसे ?
आज उपलब्ध असलेले दूध, आणि दुधात घातले जाणारे (शुद्ध?) पाणी. यांची शुद्धी तपासायची झाल्यास ?
शुद्धीकरण करणे किती कठीण आहे ना ? पन्नास दिवस सुद्धा पुरणारे नाहीत. पन्नास साठ वर्षातील अशुद्धी दूर करायला फक्त पन्नास दिवस पुरतील ? निदान पन्नास साठ महिने तरी लागतीलच !
दुध कुठुन येते ती गाय आणि तिचा विदेशी वंश तपासणे आणि तो कायमचा दूर करणे हेच खरे शुद्धीकरण !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
04.01.2017
Leave a Reply