पाणी शुद्धीकरण भाग नऊ
या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ?
ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण पोचतो यातही स्पर्धा व्हायची, बिचारा पाणी काढणारा तसाच तहानलेला रहायचा….
आठवतंय का शाळेतील पाण्याचे पिंप ? पी ई चा तास संपला की, धावत पळत पिंपाभोवती पाणी प्यायला धावत जाणं…. एकाने नळाखाली भांड धरलं असताना मधेच कोणीतरी नळ बंद करणे, पाणी वरून पित असताना मुद्दाम कोपरावर हात मारून पाणी त्याच्या शर्टावर सांडणे, मग रागाने भांड्याला तोंड लावूनच पाणी पिणे, खूप घाई असली तर नळाखाली पाणी पडण्याची वाट न बघता पिंपाचे झाकण काढून वरूनच भांडे बुचकळवून प्यायलेले पाणी. हातावरची सर्व शुद्धी पाण्यात उतरायची…
गंमत होती सर्व …
गेली ती सारी गंमत…..
“एवढं अशुद्ध पाणी तुम्ही पित होतात बाबा,” लेकीनं प्रांजळपणे प्रश्न विचारला. तिला म्हटलं,
” यामुळेच आमची इम्युनिटी वाढत होती. असंच पाणी पिण्याची सवय लहानपणापासून असल्यामुळे चांगलं शुद्ध पाणीच कधीतरी बाधायचं….” माझं तिरकस उत्तर.
त्यावर ती म्हणाली,
” आमच्या शाळेतच्या बाजुला लमाणी लोकांची वस्ती आहे. तिथली मुलं आम्ही खेळताना पाहून ग्राऊंडवर येतात आणि आमच्याबरोबर खेळतात. काय साॅलीड स्टॅमिना असतो एकेकाचा, पण अस्वच्छ दिसतात. आंघोळ नाही. वर कपडे नसतातच, सर्व अंगाला माती लागलेली, हात न धुताच खातात, पाणी पण साधेच पितात, न ऊकळलेलं.”
तेव्हा लेकीला कुलकर्ण्यांची एक चारोळी ऐकवली,
” पिंपळाचं झाड कसं कुठेही उगवतं,
कुठेही उगवतं,
म्हणून त्याचं
कसंही निभावतं ”
खरंच आहे, यानेच त्यांची प्रतिकारक्षमता वाढत असेल का ?
जमिनीवर पडलेलं खायचं नसतं, आमच्या लहानपणी खाली पडलेली एक सुद्धा चिंच, बोर किंवा लिमलेटची गोळी वाया जाऊ देत नव्हतो. काळा झालेला आंबा, काळा भाग काढून टाकून खात होतो, पक्ष्यांनी खाऊन टाकलेले पेरू आधी खात होतो, चुकुन खाली पडलेला प्रसादाचा पेढा किंवा फुटाणा मटकावीत होतो, आता आमच्या पोरांना शाळेला जाताना रोज उकळलेलं पाणी देतोय, पण शेंबडं ते शेंबडच !
जरा पाणी बदललं, सहलीला गेली, भेळवाल्याकडचं पाणी प्याली, मामा मावशीकडून सुट्टीवरून आली की आजारी पडलीच म्हणून समजा. असं का ?
एवढ्या निर्जंतुक पाण्याची रोज सवय असली तर जरा कधी पाणी बदललं तर आजारी पडणारच ना !
आजच्या भाषेत “इम्युनिटी” कशी वाढणार आणि कधी वाढणार ? जरा पिऊ देत ना साधं पाणी, बारा गावं, बारा ठिकाणचं पाणी पिऊन सगळीकडचं पाणी पचवायची सवय होते ना ! आणि एखाद्या रोगाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, दंडावर, अर्धवट मारलेले रोगजंतुच टोचून भरतात ना !
हे असं लिहिलेलं पण काही मातांच्या पचनी पडणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.01.2017
Leave a Reply