शास्त्रकार स्पष्टपणे सांगत आहेत.
अतियोगेन सलिलं तृष्यतोऽपि प्रयोजितम
प्रयाति श्लेष्म पित्तत्वं ज्वरितस्य विशेषतः।
वर्धति आमतृष्णानिद्रा तंद्रा ध्मानांग गौरवम
कासाग्निसादह्रल्लासप्रसेक श्वास पीनसम् ।।
तहान लागली असताना सुद्धा ती ओळखता यायला हवी, तहान लागल्यानंतर पाणी जरूर प्यावे, पण जर का यावेळी देखील पाणी जास्त प्यायले गेले तर कफ आणि पित्त प्रकुपित होतात, म्हणजे वाढतात. विशेषत्वाने ताप आला असताना जर तहान लागली घसा कोरडा पडलाय म्हणून पाणी गरजेपेक्षा जास्ती प्यायले गेले तर शरीराचे नुकसान जास्ती होते.
तहानेपेक्षा अधिक पाणी प्यायल्याने शरीरात आमाची वृद्धी होते.
( आम म्हणजे काय, तो कसा तयार होतो, कुठे असतो, हे आपण मागील अनेक टीपांमधे आधी वाचले असेलच ! हा आम पुढे जाऊन नवीन व्याधींना जन्माला घालतो. )
यातूनच अधिक तहान लागणे, शरीर जड होणे, आळसावणे, भूक नाहीशी होणे, पोट फुगणे, खोकला, मळमळ वाटणे, तोंडाला पाणी सुटणे, दम लागणे, नाक वाहाणे, इ. आजारांची लक्षणे वाढतात.
याचाच अर्थ असा आहे, ही लक्षणे निर्माण झाली तर समजावे, आपल्या पोटात आम वाढला आहे. या अवस्थेत लंघन किंवा उपवास करायला हवा. अशा अवस्थेत पाणी सुद्धा पिऊन चालणार नाही. तेही पचत नाही. आणि व्याधी उग्र रूप धारण करतो.
लक्षात एवढेच ठेवायचे की, कधीही अनावश्यक पाणी पिऊ नये. ते नुकसान करणारे आहे.
पण आज बरोब्बर उलटेच सांगितले जात आहे. साध्या व्हायरल इन्फेक्शन पासून ते डायरीया पर्यंत, पाणी प्या पाणी प्या.!!! ज्या बिचाऱ्यांना आयुर्वेदातील “अ” म्हणजे काय, हे सुद्धा कळत नाही, अश्या ब्युटीशियन पासून एकजात सारे डाएटिशियन, नॅचरोपॅथस् सुद्धा सांगतात, ते एकवेळ मान्य करू. वाॅटसपवर तर आयुर्वेदाचे सल्ले द्यायला उधाणच आलेले असते. सर्व आयुर्वेद म्हणे एकशे चाळीस सूत्रात ??? आयुर्वेद एवढा चीप झालाय ? आयुर्वेदाच्या नावावर काहीऽही खपवले जातेय. तेव्हा सावधान !!!
कोणाच्या भरवंशावर कोण जाणे, पण अगदी पाश्चात्य वैद्यक तंत्राने शिकलेले तज्ञ, इंटीग्रेटेड व्यवसाय करणारे आयुर्वेद पदवीधारक आणि मिक्स प्रॅक्टीस करणारे होमियोपॅथीचे पदवीधर देखील पाणी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात, आणि लोक फसतात. आपला आजार वाढवतात.
जो तो उठतोय आणि सांगतोय भरपूर पाणी प्या. नुसता चिखल होतोय, बाकी काही नाही, नंतर सर्व निस्तरायला काही मोजके आयुर्वेदीय वैद्य आहेतच !
हे असे का सांगितले जातेय ? कोणत्या संहितेनुसार, माॅडर्नच्या कोणत्या सिद्धांतानुसार, होमियोपॅथीच्या कोणत्या तत्वानुसार ? काहींना कळतंय पण व्यावसायिक मौन पाळून आहेत.
मौनात अर्थ सारे…..
हे चक्क बाजार वाढवणे आहे. असे वाटले तर काय चुकले ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
Leave a Reply