निषेधार्ह पाणी भाग एक
काही श्लोकांचे अर्थ कळले नाहीत तरी ते द्यावेत असे वाटते. म्हणजे त्याविषयी वाचणाऱ्याच्या मनात शंका रहात नाही.
जसे वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे म्हणतात,
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाणडूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
यांनी पाणी पिऊ नये, कोणी ?
ज्यांचा अग्नि मंद आणि अल्प आहे, ज्यांना गुल्म, रक्ताल्पता, जलोदर, अतिसार, मुळव्याध, संग्रहणी, सूज हे आजार असतील त्यांनी (अतिरिक्त) पाणी (आयुर्वेदीय डिग्रीहोल्डर आणि शुद्ध आयुर्वेदाचीच प्रॅक्टीस करणाऱ्या वैद्यांच्या सल्ल्याशिवाय ) पिऊ नये.
आयुर्वेदाची सरकारमान्य पदवी धारकाकडूनच आयुर्वेदीय उपचार करून घ्यावेत. हे सुशिक्षितांना पण सांगावे लागते, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?
बरं केवळ पदवी असून उपयोगी नाही. ते स्वतःला “वैद्य” म्हणवून घ्यायला लाजत नाहीत असे हवेत. (स्वतःला डाॅक्टर म्हणवून घेण्यात कोणता आनंद मिळतो कोण जाणे ? असो.
प्रत्येकाचा स्वतःकडे किंवा स्वतःच्या व्यवसायाकडे पहाण्याचा विचार वेगवेगळा असू शकतो. )
पदवी आयुर्वेदाची असेलही, पण ते प्रॅक्टीस आयुर्वेदाची करत असतील याची खात्री नाही. म्हणून म्हटले, शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टीस करणाऱ्यांचा सल्ला घ्यावा. माझे काही मित्र म्हणतात, शुद्ध आयुर्वेद हा शब्दच चुकीचा आहे. अशुद्ध आयुर्वेद नसतोच ! पण समाजात बघितले की कळते, राजस्थानी, बंगाली, हिमालयीन जडीबूटीवाले, यांनी आयुर्वेद पोटासाठी अशुद्ध करून ठेवलाय. वैदूंनी जिवंत ठेवलाय, पण सशास्त्र नाही. आणि ज्या शास्त्र जाणणाऱ्यांनी आयुर्वेदाचे संगोपन करायला हवे होते, त्यांनी मात्र आता तरी सवतीभावाने आयुर्वेदाकडे पाहू नये. ही वेळ आयुर्वेद पुनरूत्थानाची आहे.
असो !
वरील श्लोकाचे शास्त्रीय स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास असे सांगता येते की, ज्या रोगांची नावे उल्लेखित केली आहेत, ते रोग तर आहेतच, पण तशाच लक्षणसमुहाचे अन्य रोग देखील जाणावेत, (हे वाक्य अनुक्त प्रकारात येते. अनुक्त म्हणजे, प्रत्यक्ष सांगितलेले नाही, पण यापूर्वी सांगितले असल्यामुळे इथे परत सांगत नाही, असे. )
या रोगांची प्रातिनिधीक यादी बघीतली तर सात व्याधी अन्नवह स्रोतसाशी प्रत्यक्ष संबंधीत आहेत. आणि सूज हे लक्षण रक्त आणि मूत्रवह संस्थेशी निगडीत आहे. म्हणजे पाण्यापासून ज्या अवयवांना विशेष हानी होणार आहे, असे हे अवयव जाणावेत. असे ग्रंथकर्ते वाग्भटाचार्य सुचवतात.
त्यात प्रथम उल्लेख केला आहे, भूक मंद आणि कमी असलेल्यांचा. स्वल्पम् आणि अल्पम् असे दोन वेगळे शब्द ग्रंथकार वापरतात. ते केवळ यमक जुळवून घेण्यासाठी नव्हे !
सध्या भूक म्हणजे काय, असाच प्रश्न पडतो. कारण भुकेची जाणीव व्हायच्या आतच पुढची खाण्याची डिश किंवा डबा समोर येतोय. इतकं अरबट चरबट खाणं अधे मधे होत असतं. ग्रहण केलेले अन्न पचवायला देखील वेळ हवा असतो ना ! तर त्यातून पोषक अंश शरीर तयार करेल. नाहीतर खाल्लेलं अन्नच रोगाच कारण होतंय.
यालाच म्हणतात भस्मासूर उलटणे !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
Leave a Reply