पाण्याची प्रशंसता भाग एक
पाणी म्हणजे जीवन जर योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य मात्रेमधे प्यायले तर !
हे विश्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे. प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. असे पाणी न मिळाल्यास तोंडाला कोरड पडते, शरीर चैतन्यहीन होते. अवयव शिथील होतात, आणि शेवटी मृत्यु येतो. पाण्याशिवाय कोणत्याही प्राण्यांचे कार्य चालूच शकत नाही, मग तो रोगी असो वा निरोगी, पाणी हेच जीवन आहे.
निरोगी राहाण्यासाठी वाग्भटजी म्हणतात,
जेवणाच्या आरंभी पाणी प्यायल्याने मनुष्य बारीक होतो.
जेवणाच्या नंतर पाणी प्यायले असता, माणूस स्थूल होतो.
तर जेवताना पाणी प्यायले असता मनुष्य सडसडीत राहातो.
तो मूळ संदर्भ असा आहे.
समस्थूलकृशा भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपा : ।
भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशांगताम् ।
अंते करोति स्थूलत्वं ऊर्ध्व चामाशयात्कफम
मध्ये मध्यांगतां साम्यं धातूनां जरणं सुखम् ।।
जेवताना देवाचे स्मरण करून पहिली आपोषणी घेतात. घसा ओला होण्यापुरतेच हे पाणी सांगितले आहे. नंतरचा घास अडकू नये, म्हणून घसा थोडा ओला करून घेणे. एक पळी पाणी उजव्या हाताची तर्जनी आंगठ्याच्या मुळाशी लावून तळहातावर छोटा खळगा करून त्यात एकच पळी पाणी घेतात……
देवपूजे मधेदेखील कोणत्याही कार्याच्या सुरवातीला आपोषणी घेतात.
केशवाय… नारायणाय….माधवाय नमः।
इथेपण तीनच पळ्या पाणी सांगितले आहे….
पाणी भरपूर प्यायचा नियम जर आपल्या संस्कृती मधे असला असता तर तिथे एक पळीभर ऐवजी, एकेक पेलाभर किंवा एकेक तांब्याभर पाणी प्यायला का सांगितले जात नाही?
“कारणाशिवाय पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, पाणी प्यायचे असल्यास एक पळीभरच पाणी प्यावे” हा संदेश यातून मिळतो.
जेवणापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पाचक स्राव कमी होतात.भूक मारली जाते. जेवण कमी जाते, त्यामुळे बारीक व्हायला होते. शरीर कृश होते, म्हणून असे करू नये.
हो. हे आधी ठरवले पाहिजे की, आपण सडसडीत असले पाहिजे. जाड पण नको. आणि बारीक पण नको. केवळ बारीक दिसण्यासाठी, डाएटींगच्या नावाखाली, पाणी पित रहाणे हा रानटी क्रूरपणा आहे. कृपया असे करू नये. आम्ही आमच्या विचारधाराच बदलून टाकल्या आहेत. आम्ही आमचे आदर्शच बदलून टाकले आहेत.
आमचे आदर्श जर दीपिका नि कॅटरीना असतील तर जीवनात वादळं आल्याशिवाय राहाणार नाही. काय दीपक लावायचे आहेत, ते कर्तृत्वात दाखवा. नुसते ‘फिगर फिगर’ करण्यात काही अर्थ नाही. शरीर अगदी नाजूक आखीव रेखीव, पण जरा काम सांगितले की कंबर जाते मोडून !
तरूणांचा आदर्श सुद्धा संजय दत्त नको, तर बटुकेश्वर दत्त हवा. पाश्चात्य विचारांचे पाणी जोखणारा आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळवणारा !!
कृश होणे, बारीक होणे हे, ‘अशक्त होणे’ या अर्थी आहे, हे लक्षात घ्यावे. म्हणून शहाण्या माणसानी जेवणापूर्वी पाणी पिऊ नये.
तोंडातील लाळ औषधी असते, पण सकाळी सकाळी तोंड धुवायच्या अगोदरची नाही. रात्रभर तोंडात तयार झालेली, किडलेल्या दाढांमधे भरून राहिलेली, लाळ औषधी कशी असेल ? राजा भोज यानी लिहिलेल्या एका ग्रंथातील संदर्भ असं सांगतो, पण वाग्भटजी असं कुठेही सांगत नाहीत.
आपले राजे केवळ युद्धच करत नव्हते तर ग्रंथ देखील लिहित होते. आमच्या छत्रपती शंभुराजांच्या संस्कृतमधे लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचे नाव तरी आठवत असेल. हे सर्व प्राचीन ग्रंथ खरंतर शालेय अभ्यासक्रमात असायला हवेत. असो.
गोऱ्या कातडीचे लोक काय सांगतात, यापेक्षा आपल्या परंपरा आणि आमचे आप्त काय सांगतात, ते जास्त महत्वाचे. त्यांनी नक्कीच चार पावसाळे जास्त बघितलेले आहेत.
थोडा विश्वास दाखवूया, आमच्या आप्तांवर !
त्यांनी आखून दिलेल्या चालीरीती वर !!
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.01.2017
Leave a Reply