पाण्याची प्रशंसता भाग तीन
जेणाच्या सुरवातीला पाणी पिऊ नये. कृशता येते.
जेवणानंतर लगेचच पिऊ नये. स्थूलत्व वाढते.
जेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे. त्याने प्रकृती साम्यावस्थेत राहाते. सातही धातुंचे पोषण उत्तम रितीने होते.
कसे ? आम्ही तर आजपर्यंत ऐकले आहे, जेवताना पाणी पिऊ नये, भूक मरते म्हणे. सगळंच चुकीचं चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीची झापडं लावल्यामुळे विचारांची किती भेसळ झाली आहे पाहा.
नारळ वाटण्यापूर्वी पाणी घातले तरी रस येत नाही. आणि नंतर पाणी घातले तरी रस नीट निघत नाही. नारळ वाटता वाटता जर त्यात पाणी घातले तरच रस चांगला निघतो ना ! हे वाटप पाट्या वरवंट्यावर असू देत किंवा मिक्सरमधे !
असेच व्यवहारात देखील दिसते.
जेवता जेवता अन्नामधे लाळ चांगली मिसळली तर पचनही चांगले होते. तोंडात लाळ नीट निर्माण होण्यासाठी घोटभर पाणी घोळवले की उत्तम काम होते.
पण नियम पाळायचे तर नीट ओळखून पाळावेत. जेवताना पाणी प्यायचे ते सुद्धा गरजेनुसार थोडे थोडे लागेल तसे प्यावे. उगाच नियम करून अमुकच लीटर पाणी हवे, असं अजिबात नको.
मग आमची जेवतानाची पाणी पिण्याची परंपरा मोडली कधी आणि कोणी कशी ?
हे शोधून काढणे जरा कठीण आहे. पण जे बदल झालेत, ते याच डोळ्यादेखत झालेत, हे नक्की आहे.
जेवताना पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे चवीचवीनं जेवता येतं. तिखट खाऊन झालं की नंतर गोड पदार्थ खायचा असेल तर दोन्ही चवींच्यामधे, चव नसलेलं पाणी घेतलं की दोन्ही चवीतला फरक नीट कळतो. नाहीतर प्रत्येक चव नीट कळत नाही. एक गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच दुसरं गोड खाल्लं तर, दुसऱ्या गोड पदार्थाची चव कमी गोड लागते, हे पण व्यवहारात आपण बघतोच. मधे पाणी प्यायले तर नंतरच्या पदार्थाची चव आणि लज्जत आणखीनच वाढते.
जे काही पाणी प्यायचे आहे ते जेवतानाच प्यावे. पाणी पिताना सावकाश प्यावे. लाळ मिसळून प्यावे. तहान लागली तर जरूर प्यावे. पण मुद्दाम जेवणापूर्वी , जेवणानंतर लगेच पिणे, नियम करून पिणे चुक आहे, हे लक्षात ठेवावे.
पाणी पिण्याचा किंवा माझ्या उत्तम प्रकृतीसाठी कोणताही बदल मी आजपासून करेन, असा संकल्प केला तर तो उत्साह दोन तीन दिवस टिकतो, नंतर पहिला विरोध होतो, तो आपल्याच घरातून ! स्वयंपाकघरातून फक्त एक सूचना येते, आणि आपले प्रामाणिक संकल्प कुठल्याकुठे उडून जातात. बदल आपल्यात हवा असेल आपल्यालाच बदलायला हवे ना !
तीळगुळ घ्या आणि ‘तुम्ही’ गोडगोड बोला, असा उपदेश आज सगळेच करतील. जे बदलायचे ते तुम्ही. ‘मी’ बदलणार नाही, असंच ठरवून तीळगुळ दिला की नंतर आपण शब्दात अडकायला आणि दुसऱ्याने शब्दात पकडायला नको.
जर मनापासून बदलायचं असेल तर असं म्हणा,
“तीळगुळ घ्या, ‘मी’ गोड बोलेन.” असं वचन देतोय मी ! कारण बदल मला माझ्यात करायला हवाय.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.01.2017
Leave a Reply