नवीन लेखन...

यहा के हम है सिकंदर

परवा घर आवरताना एक डबा दिसला, मी तो धरायला गेले तर हातातून पडला. आधीच तो माझ्यावर रुसल्यासारखा मला दिसत होता म्हणजे रॅकमधून तो माझ्याकडे जरा नाराजीनंच पाहात आहे. असंच मला वाटलं म्हणून मी तो उघडून पाहायला गेले या विचाराने
‘‘काय बरं आहे यात?’’
तर तो खालीच पडला. जणू मला म्हणत होता, ‘‘तुला माझी काही आठवण आहे की नाही? जा आता कशाला आलीस माझ्याजवळ.’’
मी परत तो उचलला आणि मला तत्क्षणी आठवलं, अरे हा आधी बरेच दिवस एका नातेवाईकाकडे होता आणि तिथून नुकताच त्यांनी तो मला दिला, पण न वापरताच मी तसाच ठेवला. तसा कोणताही डबा किंवा स्वयंपाकघरातील कोणतीही वस्तू म्हणजे गृहिणीचा जीव की प्राण. मी अगदी प्रेमाने तो उचलला आणि परत छान पुसून त्याच्यात खडीसाखर भरून ठेवली. गोड पदार्थ भरला म्हणजे म्हंटलं त्याचा राग जाईल माझ्यावरचा असा बालिश विचार मनात डोकावला.
तुम्ही म्हणाल काय हे लावलंय डबा पुराण. पण मला खरंच असं वाटतं खरंच त्या स्वयंपाकघरातील वस्तू गृहिणीच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या असतील. एखाद्या मैत्रिणीला आपण फोन करतो, एखादीला नाही तेव्हा दुसरी म्हणते, ‘‘ती कशाला मला फोन करेल. ती तुझी खास.’’ तसंच हे डबे किंवा भांडी म्हणत असतील का एकमेकांना, ‘‘तू तिचा आवडता आहेस म्हणून तुलाच ती ऑफिसमध्ये घेऊन जाते. आम्ही आपले घरीच. ट्रॉलीत बंद.’’ किंवा एखादा चकचकीत सेट आपण पाहुणे आल्यावर काढतो तेव्हा तो चकचकीत सेट दिमाखाने इतरांना चिडवत असेल, ‘‘बघा मी म्हटलं नव्हतं, मीच तिचा लाडका आहे. मोठे पाहुणे आले की, माझ्याशिवाय तिचं पानही हलणार नाही.’’
तेव्हा रोजची ताटं त्याला चिडवत असतील, ‘‘असुदे आलाय मोठा शाहाणा, वर्षातून चार वेळाच तुला मान, इतर वेळी मात्र आम्हीच हो…’’
आता पूर्वीसारखं शेजारी-पाजारी काही देणं-घेणं राहिलं नाही, पण या पूर्वीच्या बायका आपल्या घरातला चमचासुद्धा ओळखतात याचं मला तेव्हा नवल वाटायचं. ही माझी वाटी नाही, ती बघा ती आहे ना ती माझी वाटी. आम्ही म्हणू वाटीला वाटी नी ताटलीला ताटली आहे ना मग काय हरकत आहे? पण नाही त्यांचा जीवच मुळी त्या भांड्यांवर. मला आठवतंय 9-10 वर्षांपूर्वी एकदा सासूबाई माझ्याकडे राहायला आलेल्या तेव्हा बदलीनिमित्त आम्ही बाहेरगावी होतो. जिन्यातून जाता जाता त्यांनी मला सांगितलं, ‘‘अगं त्या शेजारच्या काकूंकडे आपली वाटी आणि चमचा आहे हा आठवणीने घे परत.’’ प्रवासाला निघालेल्या त्यांना त्या वाटीचमच्याची आठवण काय ग बाई… असं मला तेव्हा वाटून गेलं.
पण आता जेव्हा आपल्या संसाराला इतकी वर्षं झाली तेव्हा वाटतं ‘खरंच जीव ओततो ना आपण या निर्जीव वस्तूंमध्ये. दहा डबे असतील, पण एखादा डबा किंवा त्याचं झाकण मिळालं नाही की, अर्धा तास घालवतो आपण तो शोधण्यात. लगेच हवा असतो असं नाही, पण ते मिळाल्याशिवाय चैन नाही. एखादं भांडं दिसेनासं झालं तर कुठे बरं ठेवलं असेल असे विचारचक्र चालू.
आणि डब्यांची तर गंमतच आहे. एकही डबा रिकामा सापडेल तर शपथ. आज बाजारातून नवीन डबा आणला की, त्यासाठी काहीतरी तयार असतेच. एरवी तो नसला तरी चालतं, पण असला की हमखास लागतोच. तर असं आहे सगळं.
बरेच दिवसांनी तो डबा दिसल्यावर मात्रं माझं मलाच हायसं वाटलं आणि तो खडीसाखरेचा डबाही दिमाखात मिरवू लागला, ‘यहा के हम है सिकंदर.’
— सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..