नवीन लेखन...

यशस्विता : काही पैलू  

यशस्विता ही एखाद्या हिर्‍यासारखी आहे. हिर्‍याला विविध पैलू असतात, व वेगवेगळ्या दिशांनी बघितल्यावर त्याची खरी चमक उमगते, खरी किंमत कळते. यशस्वितेचंही तसंच आहे.

भाग :

‘यशस्वी कोण’ असा प्रश्न जर आपल्याला कुणी विचारला तर एखादा खेळाडू, उद्योगपती, कलावंत, ख्यातनाम शास्त्रज्ञ वा समाजात काहीतरी चळवळ उभारू पहाणारा पुढारी, यांच्याकडे आपण बोट दाखवू. पण, यश म्हणजे काय, असं जर कुणी विचारलं तर पटकन सांगता येणार नाही. कारण यश ही बहुधा सामाजिक बाब मानली जाते. समाजानं दिलेला मान, आदर, लोकप्रियता, बक्षिसं, पदकं, इत्यादींच्या स्वरूपात व्यक्तीला ते मिळतं. परंतु, यशाला वैयक्तिक बाजू असतेच की ! ती समजण्यासाठी यशस्वी माणसांनाच प्रश्न विचारला की, ‘काय हो, तुम्ही स्वत:ला यशस्वी समजता का ?’, तर कदाचित बरीच यशस्वी माणसे निश्चित उत्तर देऊ शकणार नाहीत. ती बहुधा असं म्हणतील की, ‘अजून नाही’, किंवा ‘माझ्या मनात काही तरी अजून करायचं आहे’, किंवा ‘माझ्या मतें मी अजून पूर्णत्वाला पोचलेलो नाही’, इत्यादि.

याचा अर्थ आपण एवढाच घेऊ या की, यश ही काही एकसंध बाब नव्हे. तिला सामाजिक, वैयक्तिक, झालंच तर, आर्थिक, कौटुंबिक इत्यादि अनेक पैलू आहेत, व या सर्वांना भाषेच्या दारिद्र्यामुळे एकच नाव आहे. तूर्तास आपल्यापुरता आपण, ‘यश म्हणजे, ज्या हेतूनं काम करायला हाती घेतो, ते काम समाधानकारकपणे पार पाडणं’ हा अर्थ घेऊ या.

हे ईप्सित साध्य व्हायला कायकाय आवश्यक आहे ? असा समज आहे की, एकतर नशिबाची साथ हवी, किंवा थोडा ‘चक्रमपणा’ (दीवानगी, ध्यास, एककल्लीपणा,झपाटलेपणा) हवा, किंवा तुमच्यात असामान्य कौशल्य हवं, किंवा तुम्ही ज्याची भरभराट होत रहाणार आहे अशा क्षेत्रात असायला हवं.

आता, ह्या गृहीतकामधे, या स्टेटमेंटमधे कितपत तथ्य आहे, हे पाहू या.

  • नशीब :

आपण गृहीत धरतो की, कर्तृत्ववान माणसाच्या यशापाठी नशिबाचा काहीतरी वाटा असतोच. आपला असा समज असतो की, उद्योगपतीला धंदा वाढवण्यासाठी जी योग्य वेळ आवश्यक असते ती मिळते ; क्रिकेटपटूच्या घरी क्रिकेटला पोषक वातावरण असतं, झालंच तर त्याची वर्णी लावायला नातेवाइकांचं पाठबळ त्याला लाभतं ;  एखाद्या प्रथम-श्रेणीच्या विद्यार्थ्याला जन्मजात अशी कुशाग्र बुद्धिमत्ता व

उत्तम गुरु मिळालेले असतात ; एखादा मॅनेजर वरच्या जागेवर पोचतो कारण त्याच्या प्रमोशनच्या वेळेला खुर्ची रिकामी झालेली असते ; खुशमस्कर्‍या स्वभाव तसंच बॉसवर इंप्रेशन मारण्याची कला त्याला उपयोगी पडलेली असते.

पण असं म्हणणं कितपत योग्य आहे ? खरं तर, ह्या सर्व केसेसमधे, ‘यशासाठी केवळ एकच घटक आणि तो म्हणजे नशीब’, असं कुणीच म्हणू शकणार नाही. कारण, एखादी गोष्ट यशस्वी होण्यामागे अनेक ‘जर-तर’ असतात.  उदा. विद्यार्थ्याचे  परीक्षेतील उत्तम मार्क. एकतर, त्यातल्या त्यात जो विषय चांगला समजला असेल त्यावर प्रश्न यायला हवेत, पेपर तपासणारे निरीक्षक काटेकोर मार्क देणारे नसावेत, विद्यार्थ्याची तब्येत व मूड उत्तम हवा, कुटुंबातील वातावरण त्या वेळेला आनंदी हवं, इत्यादि. या सर्व गोष्टी जमून आल्या तरच परीक्षेत चांगलं यश मिळू शकेल. एखाद्या माणसाला ह्या सर्वच गोष्टी अनुकूल असतील तर त्यात नशिबाचा वाटा किती ; आणि त्याचे परिश्रम, विषयाची समज, परिस्थितीचा व एकूण घटनांचा त्याचा अंदाज इत्यादींचा वाटा किती ?

मला असं वाटतं की, जे घटक आपल्या हातात नाहीत त्यांच्या बाबतीत नशिबाचा वाटा आहे असं फारतर म्हणता येईल ; पण इतर बाबींमधे त्या व्यक्तीचे प्रयत्न, निर्णय, आकलन इत्यादींचा त्याच्या यशात मोठा वाटा आहे.

कबूल, की काहींचं आयुष्य एखाद्या फटक्यासरशी उजळतं. एखादा माणूस जिथे काम करतो तिथल्या फर्मच्या मालकाच्या मुलीबरोबर त्याचं लग्न जमतं, लग्न होतं व ती फर्मच त्याच्या हातात येते. किंवा, शेअर्सचे भाव वाढून लक्षावधी रुपये एखाद्याच्या हातात येतात.

नशिबाला दुसरी बाजूही असते. अत्यंत हुशार व मेहनती मनुष्य आहे. त्याने पेट्रोल वाचवण्याबाबत कष्टाने शोध लावला आहे, पण त्याच्या शोधाला मान्यता, पैसा मिळायच्या आधीच पेट्रोलचे भाव उतरले आहेत ;  परीक्षेत विद्यार्थ्याला उत्तम यश मिळूनही बोर्डाच्या चुकीमुळे ‘नापास’ असा शिक्का बसला आहे, व त्यामुळे प्रचंड मानसिक धक्का त्या विद्यार्थ्याला सहन करावा लागत आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

मला असं वाटतं की, काही माणसं जरा जास्त नशीबवान असतात, काही जरा कमी. बहुतेकांच्या आयुष्यात यशापयशाचे प्रसंग सारख्याच प्रमाणात असावेत. ‘ही जी थोडीशी काही नशीबवान माणसं आहेत ती केवळ नशिबाच्या जोरावर कीर्तीमान होतात व झाली आहेत, आणि बाकी सगळे नशिबाच्या अभावामुळे पाठीमागे राहिले आहेत’, असं म्हणणं बरोबर ठरणार नाही. अर्थात् , आपल्या सर्वांनाच असं समजणं दिलासा देणारं असतं की, ‘आपल्यातही काही कमी क्षमता नाही पण नशिबाची साथ हवी तेवढी नसल्यामुळे पाहिजे तितके यश आपल्या पदरी पडत नाही’.

खरी मेख ही आहे की, नशीब काही आपल्याला दार ठोठावून सांगत नाही की ‘माझे स्वागत करा’ . माणसाला वेळोवेळी अनेक संधी उपलब्ध होत असतात. काहींची त्याला कल्पना असते, तर काही त्याला हुडकून काढाव्या लागतात. कोणत्या संधी स्वीकारायच्या हे त्याची निर्णयशक्ती, परिस्थितीबाबतचे आकलन, यशापयशाची भीती तसेच त्याबद्दलचे अंदाज, यावर असतं. यशस्वी माणसं संधी आल्या तर निष्क्रियपणे बघ्याची भूमिका न घेता, निश्चय, आखणी व स्वत:ची खास स्टाइल वापरून तिचं रूपांतर प्रयत्नात करतात ; एवढंच नाही तर कधी कधी संधी स्वत: निर्माण करतात.

  • असामान्य कौशल्य, गुणवत्ता, ‘चक्रमपणा’ (दीवानगी, ध्यास, झपाटलेपणा) :

बहुधा आपण माणसं निर्णय घेतांना एक मध्यम-मार्ग अनुसरत असतो. म्हणजे असं की एखादी नवीन नोकरी मिळत असेल तर तिच्यामुळे कुटुंबाचे स्थलांतर करावं लागेल का ? मुलांचं शिक्षण तिथे कसं असेल ? हवापाणी कसं काय आहे ? मुख्य म्हणजे कष्ट किती करावे लागतील ? स्थैर्य कितपत आहे ? इत्यादि अनेक प्रश्न विचारात घेतले जातात व मग निर्णय होतो. म्हणजेच कुटुंब-आरोग्य, सुरक्षितता, चैन, मानमरातब ह्या सर्वांचा जमेल तेवढ्या प्रमाणात धस लावला जातो. त्यात काही चूक आहे असं जरी म्हणता आलं नाही, तरी, एक गोष्ट मात्र खरी आहे, की , ध्येयनिष्ठ माणसं एका विवक्षित गोष्टीचा ध्यास घेतात, एक ध्येयाकडे त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं , त्यांनी अग्रक्रम (priorities) बहुतेक निश्चित केलेले असतात, प्रसंगी इतर बाबींकडे ते दुर्लक्ष करतात. वरील, नोकरीचं उदाहरण घेऊ या.  एखाद्या नोकरीत नवीन शिकण्याची संधी असते,  एखाद्या विशिष्ठ प्रकारचं तंत्रज्ञान आत्मसात करता येतं, त्याच्या जोरावर पुढं पाऊल टाकता येतं. एखाद माणूस असा विचार करेल की, आज मला हे शिक्षण कठीण जाणार असलं तर ते पुढच्या करीयरसाठी आवश्यक आहे ;  मग मी ते, कितीही कष्ट पडले तरी करेनच. दुसरा एखादा असं म्हणू शकेल की, सध्याची नोकरी तशी बरी आहे, सगळं व्यवस्थित चाललंय. दुसरीकडे नवीन काम शिकता येईल हें खरं, पण असं तर होतच रहाणार, नवीन नवीन तंत्रज्ञानं, कामं, निर्माण होतच रहाणार. मला त्याच्यासाठी इतकी किंमत मोजावी लागणार असेल तर इथेच रहाणं बरं. थोड्याच वर्षांत प्रमोशन ड्यू आहे, इत्यादि. आता, ह्या दोन उमेदवारांमधला पहिला आहे तो माझ्या मते व्यवसायात अधिक यशस्वी होईल. कारण, त्याचा अग्रक्रम व ध्येय त्याने ‘ठामपणे’ ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी, तो चाकोरीबद्ध निर्णय घेत नाही. या दृष्टीनं, कीर्तिवान् माणसं सर्वसामान्य माणसांपेक्षा एककल्ली, धडपडी व चाकोरीबाहेरचं वागतात. म्हणून त्यांना ‘चक्रम’ (दीवाने, झपाटलेले, एककल्ली) म्हणायचं, इतकाच त्याचा अर्थ.

खेळाडू, कलावंत, शास्त्रज्ञ, समाजसुधारक, किंबहुना प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या सर्वच व्यक्ती आपल्या यशाचं श्रेय आपल्या गुणवत्तेला देतात. त्यांच्या प्रत्येक यशस्वी प्रयत्नामागे त्यांची हुशारी असतेच ; परंतु इतरांच्यापुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम व योग्य प्रशिक्षणाचीही तितकीच आवश्यकता असत नाही का ? एवढंच नाही, तर योग्य अशा मानसिक दृष्टिकोनाचीही जरूरी असते. त्यानुसार ती व्यक्ती आपल्या प्रयत्नांची आखणी (स्ट्रॅटेजी) करते. उदा. काही वर्षांपूर्वी वर्ल्ड-कप क्रिकेटमधे श्रीलंकेला सर्वप्रथम मिळालेलं यश, (अर्थात् , त्यांनी पहिल्यांदा तो कप जिंकला). आखणी करतांना यशाची व्याख्या केली जाते. म्हणजेच, काय साधायचं आहे हे निश्चितपणे ठरवलं जातं, वेळोवेळी खेळ चाळू असतांना यशापयशाचे जे चढउतार होत असतात त्यांचं निदान व चिकित्सा केली जाते. याचा परिणाम एकूण वाटचालीवर होत असतोच. आपल्याला माहीतच आहे की, त्यापूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाची प्रतिमा दुय्यम किंवा कनिष्ठच होती. मग त्यांना ते उत्तुंग यश कसं मिळालं असेल ? मेहनत व गुणवत्ता,

याबरोबरच त्यांचा दृष्टिकोण. तो म्हणजे, प्रचंड आत्मविश्वास, धडाकेबाज खेळ, दबावाला भीक न घालण्याची वृत्ती, वरचे खेळाडू लवकर आऊट झाले तरीही पुढल्या खेळाडूनं खेळ चालू ठेवण्याची ऊर्मी, इत्यादि कारणीभूत नाही असं कोण म्हणेल ?

अगदी एकाच व्यवसायातल्या व्यक्ती घेतल्या तरी, सर्वांमधे सारखंच टॅलंट असत नाही. कोणाकडे कमी तर कोणाकडे जास्त. प्रश्न असा उपस्थित होतो की, टॅलंट कमी असलं तर मग कठोर परिश्रम, प्रशिक्षण असल्या गोष्टींमधे वेळ दवडणं कितपत योग्य आहे ? याचं उत्तर हे आहे की, आधी मेहनत करा आणि पहा काय परिणाम होतो ते. टॅलंट असलं तरी परिश्रमांनीच ते चकाकतं. योग्य प्रशिक्षणाशिवाय नैसर्गिक कौशल्याला पूर्णता येणार नाही. जितकी गुणवत्ता जास्त तितका श्रमांचा मोबदला अधिक मिळतो हेही सत्य आहे. परंतु अजिबात काही न करता नुसत्या टॅलंटवर अवलंबून राहिलं तर कदाचित काहींच मिळणार  नाही.

  • योग्य क्षेत्र :

काही उद्योग-व्यवसाय हे वाढणारे, फोफावणारे असतात, (उदा. आय्. टी. इंडस्ट्री), तर काही त्यामानाने कमी वाढीची असतात, (उदा. स्टील इंडस्ट्री). त्यामुळे, यश मिळण्यासाठी, वाढणार्‍या-क्षेत्रात असणं महत्वाचं ठरतं.

एखाद्या विवक्षित क्षेत्रातही काही काळ भरभराटीचा असतो. तुम्ही त्यावेळी तिथे असलात तर तुम्हालाही त्याचा लाभ मिळतो. उदा. लश्करी अधिकार्‍यासाठी, शांततेच्या काळापेक्षा युद्धकाळात उदय होण्याची संधी जास्त असते. दुसरं म्हणजे, एखादं क्षेत्र एखाद्या विशिष्ठ गुणवत्तेला, विकासाची उत्तम संधी उपलब्ध करून देत असतं. उदा. जाहिरात क्षेत्रात सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) फायद्याची ठरते.

भरभराटीच्या क्षेत्रात असणं हा योगायोगाचा किंवा जाणीवपूर्वक केलेल्या निवडीचा भाग असू शकतो. म्हणजे असं की, तुम्ही काही न ठरवता एखाद्या क्षेत्रात पाऊल टाकता, आणि ते वाढायला सुरुवात होते. किंवा, तुम्हाला अंदाज असतो की अमुक अमुक क्षेत्रांची झपाट्यानं वाढ होणार आहे. मग तुम्ही कसोशीनं त्यात जाता, प्रयत्न करता. हे ठीक आहे ; पण प्रश्न असा आहे की,  तुमची गुणवत्ता, कौशल्य विशेष उपयोगात येत नाही अशा क्षेत्रात तुम्ही जर काम करत आहात, अगर क्षेत्राला आवश्यक असणारी गुणवत्ता तुमच्यापाशी नाही, तर अशा वेळी तुम्हाला यश मिळू शकेल का ? उदा. आय्. टी. क्षेत्रात जायची इच्छा आहे, पण सॉफ्टवेअर लिहिणं जमत नाही. याचं उत्तर असं आहे की, योग्य अशा क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक मार्ग विचारात घ्यावे लागतात. तुम्हाला सॉफ्टवेअर विकत घेता येईल, किंवा दुसर्‍याकडून लिहवून घेणं जमेल. शिवाय, एका कामामधे कौशल्य आहे, याचा अर्थ, दुसर्‍या कामामधे अजिबात नाही, असा होत नाही. समजा, सॉफ्टवेअर लिहायचं नसलं, तरी त्याच व्यवसायातलं दुसरं एखादं काम चांगलं जमू शकेल (उदा. प्रॉडक्ट मॅनेजमेंट). तसा प्रयत्न करून बघायला, किंवा निदान तसा विचार करायला काय हरकत आहे ? शाळेत गणित विषय उत्तम असणारा मुलगा मोठेपणी प्रोफेसर होऊ शकेल, पण त्याचबरोबर तो फर्ममधे एक्झिक्युटिव्ह म्हणूनही नाव काढू शकेल.

  • गुंतागुंतीचं समीकरण :

वैयक्तिक दृष्ट्या मला हे पटत नाही की, यश मिळवण्यासाठी तुम्ही भाग्यवान, ‘चक्रम’ (ध्यास घेऊन झपाटलेले, दिवाणे झालेले), किंवा अतिहुशार, अथवा विवक्षित क्षेत्रात असायला हवं. पण असा सर्वसाधारण ग्रह आहे म्हणून हे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला. यशामधे या सर्व गोष्टींचा वाटा असू शकतो , एखाद्या व्यक्तीच्या भरभराटीमधे ह्यातला एखादा घटक अधिक जबाबदार असतो ; तर दुसर्‍या अनेक केसेसमधे यातला कुठलाच घटक ठळकपणे नजरेस पडत नाही. एखाद्या केसमधे यशामागलं समीकरण अगदी साधं असतं तर दुसर्‍या एखाद्या केसमधे तेच अतिशय गुंतागुंतीचं असतं. एखादं क्षेत्र झपाट्यानं वाढलं आणि त्याबरोबर एखादा माणूस भराभर वर चढत गेला, इतकं कारण एखाद्या केसमधे पुरेसं आहे ; तर काही वेळा वर उल्लेखलेली कारणंसुद्धा पुरेशी नसतात, तर त्यांच्याही पलिकडे आणखी काही घटक कारणीभूत झालेले बघायला मिळतात. अनेक अपयशांमधून जात असतां स्वत:ला नैराश्य (डिप्रेशन) येऊ न देण्याचा खेळकरपणा ; किंवा, जर व्यवसायात (उदा. व्यवस्थापन) अनेकांकडून काम करून घ्यायचं आहे तर माणसाची पारख, टीम-बिल्डिंग, लीडरशिप, हे गुण सुद्धा वरील कारणांबरोबर हातमिळवणी करतात.

  • विशिष्ठ फॉर्म्युला नसतो :

थोडक्यात सांगायचं म्हणजे, यशाचा काही विशिष्ठ फॉर्म्युला नसतो. आपण जर यशवंत लोकांची, त्यांच्या यशाबद्दल, कामगिरीबद्दल मतं विचारली, तर प्रत्येकाचं ऍनॉलिसिस वेगळं असतं, आणि मुख्य म्हणजे कामाची जी एक स्वतंत्र शैली असते, व ती त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर वा थोड्याफार प्रमाणात व्यवसायावर अवलंबून असते. वेगवेगळ्या व्यवसायात तर असंख्य शैली आणि अप्रोच. कुणाची सतत काम करत रहाणं याची ऊर्मी, तर आणखी कुणाचा आत्मविश्वास, कुणाचा कामचा उरक, तर कुणाचा मनाचा कणखरपणा.

  • समान सूत्रे :

इतक्या विविध शैली, दृष्टिकोन, आणि यशाचे मार्ग असूनही, त्यांच्यातून काही समान सूत्रे निघतात.

  • उत्साह, चिकाटी, निश्चय, आणि एकतानता :

हे सर्व गुण यशस्वी व्यक्तींमधे दिसून येतात. कामात दिरंगाई, धरसोडवृत्ती हे दुर्गुण यशाला आपलंसं होऊ देत नाहीत.

  • कृतिप्रियता :

ही माणसं कृतिप्रिय असतात. स्वस्थ बसून रहाणं आणि काय घडतंय ते निष्क्रियपणे पहाणं, हे त्यांना पटत नाही; काहीतरी ठरवून ते स्टेप घेतात, मग दुसरी, तिसरी, इत्यादि.

  • स्वत:शी प्रमाणिक असणे :

ह्या व्यक्ती स्वत:शी प्रामाणिक असतात. याचा अर्थ असा की, आपल्याला काय करायचं आहे, हे त्यांना ठाऊक असतं. ते योग्य आहे, एवढंच नव्हे तर, कां, कसं योग्य आहे, ते कशा प्रकारे साध्य करायचं आहे, याचं पक्कं भान त्यांना असतं. म्हणजे, त्यांचा वैचारिक गोंधळ होत नाही, किंवा ते कुणाचा सल्ला मानत नाहीत, असं नाही; पण स्वत:ची ओळख चांगल्याप्रकारे असल्यामुळे त्यांच्या विचारांना दिशा असते, विचार एकत्रित होऊन त्यांचा सुसंगत मिलाफ झालेला असतो. म्हणूनच, मार्गावर ज्या अडचणी येतात, त्यांच्यावर ते मात करू शकतात.

  • सकारात्मक विचारधारा :

आज ना उद्या आपण लक्ष्य साध्य करू, अशी त्यांची सकारात्मक विचारधारा असते.

  • सृजनशीलता : (क्रिएटिव्हिटी) :

सृजनशीलता म्हणजे, रुळलेल्या विचारांपेक्षा वेगळा विचार, चौकटीबाहेरचा विचार, या व्यक्ती करतात.

  • आलेल्या संधीची उचल :

आलेली संधी ते उचलून धरतातच, तिचा फायदा घेतातच ; पण ते स्वत:ही संधी निर्माण करतात.

  • यश ही अंतिम पायरी नव्हे :

एकदा एखाद्या कामात यश मिळालं की यश मिळवण्याची प्रक्रिया संपत नाही. जसं गिर्यारोहकांना एक शिखर चढल्यावर दुसरं एखादं अधिक-उंच शिखर चढायचं असतं, तसं धडपड्या माणसाला वेगवेगळ्या प्रांतांत काम करून दाखवायचं असतं. यश म्हणजे अशी वस्तू नव्हे. (उदा. प्रमोशन, नफा, परीक्षा, इत्यादि) , की एकदा मिळवली की संपलं.

  • जीवनशैली :

यशस्विता ही एक प्रेरकशक्ती आहे, जीवनशैली आहे. ही प्रेरणा सतत मिळत राहिली तर यश आपोआप मिळतं.

भाग – २ :

आता आणखी काही गोष्टी पाहू. यशाला अनेक पैलू आहेत, पण त्यातले सामाजिक व व्यक्तिगत पैलू महत्वाचे आहेत.

  • यशाचा सामाजिक पैलू :

एखादा माणूस यशस्वी आहे असे आपण म्हणतो, म्हणजेच त्याला समाजाने मान्यता दिलेली असते.

याचाच अर्थ असा की, यशस्वितेसाठी समाजाची, किंवा समाजातील एखाद्या विशिष्ठ घटकाची, मान्यता प्राप्त असायला हवी. बरं, कुणा सोम्यागोम्याची मान्यता मिळून व्यक्तीला ते चालत नाही. व्यक्तीला आपल्या  पीयर-ग्रूप (Peer-Group) चीच मान्यता लागते. म्हणजेच, समाजाचा जो घटक त्या व्यक्तीला महत्वाचा वाटतो, त्या घटकाकडूनच मिळालेली मान्यता त्या व्यक्तीला अपेक्षित असते. एखादा दरोडेखोर किंवा ‘सुपार्‍या’ घेणारा गुंड यांना समाज ‘यशस्वी’ म्हणत नाही ; आणि , समाज काय म्हणतो याची त्यांना पर्वाही नसते. ‘बदनाम हुए तो क्या, नाम तो हुआ’ असे एका शेरमधे म्हटले आहे, त्याप्रमाणे त्या दरोडेखोराचे वा गुंडाचे ‘नाव’ मात्र होते, व ती व्यक्ती दरोडेखोरांच्या-गुंडांच्या गोतावळ्यात ‘यशस्वी’ म्हणून गणलीही जाते. आय्. आर्. ए. (आयरिश रिपब्लिकन आर्मी) , पी.एल्. ओ. (पॅलेस्टाइन लिबरेशन ऑरगनायझेशन) , अल् कायदा , लश्करे तय्यबा , जैश-ए-मुहम्मद  वगैरे संघटनांमधील पुढारी,

ती-ती विशिष्ठ विचारधारा अनुसरणार्‍या व्यक्तींना ‘यशस्वी’ वाटले तर नवल नव्हे.  (अशा संघटनांनी अवलंबलेल्या मार्गाचे मला मुळीच समर्थन करायचे नाही. परंतु, यशस्वितेचा मापदंड समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी कसा वेगवेगळा असू शकतो, एवढेच इथे दाखवायचे आहे). थोडक्यात काय की, व्यक्तीच्या ‘peer-group’ च्या नजरेत जे ‘यशस्वी’ ठरेल, ती त्या व्यक्तीच्या दृष्टीने ‘यशस्विता’ होय.

  • यशाचा व्यक्तिगत (personal) पैलू :

सर्वसाधारणपणे पैसा, नाव, अधिकाराची जागा वगैरे मिळालं, की ती व्यक्ती यशस्वी झाली असे समाज म्हणतो. पण हा लौकिक अर्थ झाला. यशस्विता ही याहून अधिक कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीची अशी गोष्ट आहे. समाजाला दिसणार्‍या लौकिक यशस्वितेहून, व्यक्तीला स्वत:ला अभिप्रेत यशस्विता ही भिन्न असू शकते. आपण जरासं या ‘आस्पेक्ट’ च्या आत विविध बाजूंनी डोकावून पाहू या, व ही गोष्ट समजून

घेऊ या.

  • पु. ल. देशपांडे यांच्या ‘आमचा धंदा : एक विलापिका’  नामक लेखातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी वेगळं व्हायचं असतं. डॉक्टरला गवई व्हायचं होतं, वकिलाला नट, तर प्रोफेसरला आय्. ए. एस्. व्हायचं होतं. यातील विनोदाचा भाग जरी सोडला तरी, पु.ल. या लेखात जीवनातील एक मोठं सत्य सांगून गेले आहेत, अन् ते हे की, समाजाला यशस्वी वाटणार्‍या व्यक्तीला स्वत:ला, ‘आपण यशस्वी आहोत’ असं वाटेलच असं नाही , आणि असं एखादं क्षेत्र, अशी एखादी कामगिरी असते जिच्यात यशस्विता मिळवायची त्या व्यक्तीची इच्छा असते.
  • आपण अशी उदाहरणे ऐकली-वाचली-पाहिली आहेत जिथे त्या व्यक्तीने आपल्या आय्. ए. एस्. वा आय्. पी. एस्. अथवा अन्य कुठल्यातरी मोठ्या पदाचा त्याग करून काही विशिष्ठ सामाजिक कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलेले आहे. (चंद्रशेखर धर्माधिकारी, अरविंद केजरीवाल, माजी पोलिस अधिकारी वाय्.पी. सिंग, शेतकरी संघटनेचे शरद जोशी, ही काही नावे डोळ्यापुढे येतात) . अशाच

एका राजस्थानी गृहस्थाची मुलाखत टी.व्ही.वर पाहिल्याचे मला स्मरते. त्याला विचारले गेले होते की, आय्. ए. एस्. म्हणून असलेले मोठे पद सोडून तुम्ही सामाजिक कार्यात पडला आहात, तर आता आपण यशस्वी आहोत असे तुम्हाला वाटते काय ? त्याचे उत्तर अर्थपूर्ण आहे. तो म्हणाला की, ‘लौकिक अर्थानं मी यशस्वी नाही असं कुणाला वाटेलही ; पण मला स्वत:ला जे काही करावं असं तीव्रतेनं वाटत होतं, ते मी आज करतो आहे याचं मला समाधान आहे ; म्हणजेच माझ्या दृष्टीनं मी यशस्वी आहे’. त्याचं हे स्पष्टीकरण पुरेसं बोलकं आहे, असं मला वाटतं.

  • लक्ष्य, यश व स्वत:चं परसेप्शन (perception) :

वरील उदाहरणावरून हे स्पष्ट होईल की, आपण स्वत:साठी काय लक्ष्य ठेवतो, व तिथे पोचतो किंवा नाही (ते अचीव्ह करतो किंवा नाही) , यावर आपल्या स्वत:च्या नजरेत आपली यशस्विता असते. हे बघा, एक साधारण मुलगा आहे, फारसा हुशार नाही. त्याच्या घरच्या आर्थिक परिस्थितीनुसार, ‘कारकुनाची नोकरी मिळवणं’ हे तो स्वत:चं लक्ष्य ठरवतो ; तशी नोकरी त्याला मिळते, व तो स्वत:ला यशस्वी समजतो. याउलट, दुसरा एक अति हुशार मुलगा आहे. तो स्वत:चं लक्ष्य ठरवतो, ‘स्कॉलरशिप मिळवून परदेशीं उच्च शिक्षणासाठी जाणे’. पण ते त्याला जमत नाही, तो देशातच शिकतो व अधिकारी होतो. पण तो स्वत:ला अयशस्वी समजतो, कारण त्याचे स्वत:चे परदेशी-शिक्षणाचे त्याचे ध्येय साध्य झालेले नसते.

  • भूमिका (role) व यशस्विता :

प्रत्येक व्यक्ती जीवनात वेगवेगळ्या भूमिका (roles) पार पाडत असते. त्या सर्व दृष्टिकोनांतून यशस्वितेचा निकष एकच (same) असेल, असे नव्हे.

–  एक उदाहरण पाहू. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक माणूस एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून आपले आयुष्य वेचतो, देशासाठी वारंवार तुरुंगात जातो, एक त्यागी नेता, एक सेनानी म्हणून पुढे येतो. समाजाच्या दृष्टीने तो एक यशस्वी सेनानी असतो. पण पती म्हणून, पिता म्हणून, त्याच्या कुटुंबियांच्या, त्याच्याकडून काही भिन्न अपेक्षा असतात. त्या तो पूर्ण करू शकत नाही. इथे,

नेता म्हणून आणि पती वा पिता म्हणून, इतर व्यक्तींकडून त्या माणसाच्या यशस्वी असण्याबद्दलचे निकष नुसते भिन्नभिन्नच आहेत असे नाही, तर ते एकमेकांविरुद्धचेही (conflicting) असू शकतात. त्या व्यक्तीने स्वत: आपल्या ‘स्वातंत्र्यसैनिक’ या भूमिकेला प्राधान्य दिलेले असल्यामुळे, तो त्या दृष्टीने स्वत:च्या नजरेत यशस्वी झालेला आहे. परंतु, जर त्याची मुले त्याच्यापासून दुरावली, तर ‘एक पिता म्हणून आपण असफल आहोत’, असेच त्याला वाटते.

–  दुसरं एक उदाहरण पाहू या. एक राजा आहे. एक राजा म्हणून समाजाची त्याच्याकडून एक अपेक्षा असते, व तिची पूर्तता केल्यास समाज त्याला यशस्वी म्हणतो. पण, एक माणूस म्हणून, त्याला स्वत:ला काय हवे आहे ? उत्तररामचरित्रातील श्रीराम हा एक धोब्याच्या कथनामुळे असा निर्णय घेतो की समाजापुढे राजाचा आदर्श असायला हवा, राजावर कलंक नको; आणि म्हणून तो सीतेचा त्याग करतो. पती म्हणून, सीतेचा त्याग करतांना रामाला आनंद झाला असं नव्हे, उलट दु:खच झालं. पण, त्यानं आपल्या ‘आदर्श-राजा’ या भूमिकेला प्राधान्य दिलं, आणि त्या भूमिकेत तो यशस्वी झाला. याउलट, इसवी सन १९३६ मधे इंग्लंडचा राजा एडवर्ड तृतीय (नंतरचा ड्यूक ऑफ विंडसर) हा, अमेरिकन डायव्होर्सी मिसेस सिम्सन हिच्यावरील प्रेमाखातर राज्यावरून पायउतार झाला (abdicated). इथे, त्याने, समाज काय म्हणेल याची पर्वा केली नाही. ‘नाममात्र राजा’

म्हणून रहाण्यापेक्षा, स्वत:च्या व्यक्तिगत जीवनाला त्यानं प्राधान्य दिलं, व स्वत:च्या नजरेत तोयशस्वी झाला.

थोडक्यात म्हणजे, ईप्सित साधल्यावर मिळणारं मनाचं समाधान हेंच कुणाही व्यक्तीच्या दृष्टीनं यशाचं गमक आहे.

  • कालसापेक्षता :

वर म्हटलंच आहे की, यश ही अंतिम पायरी नव्हे. याचाच अर्थ असा की, यशासाठी व्यक्तीने ठरवलेले निकष कालानुसार बदलू शकतात. एक लक्ष्य गाठलं की, माणूस दुसरं एखादं लक्ष्य ठरवतो. मग ते

त्याच रस्यावरील अधिक उंच शिखर असो, किंवा एखाद्या पूर्णपणे भिन्न विषयाशी निगडित असो.

किंवा, एखादं लक्ष्य गाठण्यात अयशस्वी झाल्यास माणूस स्वत:साठी कमी उंचीचं किंवा भिन्न दिशेचं लक्ष्य ठरवू शकतो. जीवनमार्गात असे यशापयशाचे अनेक मुक्काम येतच रहातात. थांबायचं की पुढे चालायचं हे जो-तो ठरवत जात असतो.  एक लक्ष्य गाठण्यात माणूस यशस्वी झाला तरी दुसर्‍या एखाद्या ऍक्टिव्हिटीमधे तो अयशस्वी होऊ शकतो ; तसेच एखाद्या गोष्टीत अयशस्वी झालेली व्यक्ती दुसर्‍या एखाद्या गोष्टीत, किंवा नंतरच्या काळात, यशस्वी होऊ शकते. यश-अपयश, अपयश-यश, असं हे चक्र आहे. अपयशानंतर माणूस जर हताश-हतबल झाला नाही, हिंमत हरला नाही, त्याने जर प्रयत्न चालूच ठेवले, तर भविष्यकाळात तो यशस्वी होऊ शकतो.  नव्हे ; होणारच.

महाभारतातील पांडवाचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. द्यूतात युधिष्ठिर म्हणजेच पर्यायानं पांडव हरले, अपयशी झाले. परिणामीं द्रौपदीची विटंबना झाली, व पांडवांना वनवास अन् अज्ञातवास भोगावा लागला. अज्ञातवासातील कष्ट व अपमान यांची कल्पनासुद्धा करणे आपल्याला कठीण आहे. राज्ञी द्रौपदी ही दासी होऊन राहिली, वीरवर भीम हा बल्लव म्हणजे आचारी, तर अतुल धनुर्धर अर्जुन हा बुहन्नला म्हणजे तृतीयपंथी बनून राहिला. काय हे जीवन !! पण पांडवांनी धीर सोडला नाही, ते तावून-सुलाखून या दिव्यातून बाहेर पडले. पुढे कुरुक्षेत्रावरील युद्धात काय झाले, ते सर्वविदित आहे. तिथे पांडव यशस्वी झाले.

  • समारोप :

थोडक्यात काय, यशस्विता समाजाभिमुख आहे तशीच व्यक्तिगत-दृष्टिकोनावर अवलंबून आहे, व ती कालसापेक्षही आहे. पण मुख्य म्हणजे, यशस्विता माणसाच्या मनातच सामावलेली आहे.

यशस्विता ही एक प्रेरकशक्ती आहे, जीवनशैली आहे, जगायची ऊर्मी आहे. स्वत:च्या क्षमता वाढवून, त्यांचा कस लावून, जे काम आपण करतो ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, ही प्रेरणा ती आपल्याला देते. अशी प्रेरण सतत मिळत राहिली तर यश आपोआप मिळतं, मिळत रहातं.

— डॉ. स्नेहलता नाईक.

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..