परमेश्वर कलाकारांना काही वेगळ्याच पद्धतीने घडवून पाठवतो. त्यांच्याकडे काही वेगळे तत्व असते. ते सतत स्वर्गात विहरत असतात. राम गणेश गडकरी म्हणाले होते, खरा कलाकार आणि खोटा कलाकार यात फक्त दोन बोटांचे अंतर असते, खरा कलाकार स्वर्गात विहरत असतो, तर खोट्या कलाकाराला स्वर्ग दोन बोटे शिल्लक उरलेला असतो.
यशवंत दत्त असाच एक मनस्वी कलाकार होता. आपल्या अभिनयातील वैविध्यामुळे, त्यातील बारकाव्यांमुळे तो एकाच वेळी रसिक प्रेक्षक, समीक्षक आणि त्याच्यातील नम्रतेमुळे निर्मात्यांचा तो अतिशय आवडता होता. माझं भाग्य की मला त्याचा सहवास मोठ्या प्रमाणात मिळाला. माझे आतोबा हे विख्यात कलादिग्दर्शक दिगंबर कुलकर्णी! शापित, पुढचं पाऊल हे चित्रपट, गोट्यासारखी मालिका त्यांनी केली होती. एम् आर् आचरेकरांचा सहाय्यक या नात्याने त्यांनी राज कपूरचे अनेक चित्रपट केलेले. पॅसेज टू इंडिया सारख्या डेव्हीड लीनच्या ऑस्करविजेत्या चित्रपटाचे ते भारतातील सहाय्यक होते. त्यांच्यामुळे मला अनेक व्यक्तींचा परिचय होऊ शकला. विनय नेवाळकर, राजदत्त, सुधीर मोघे हे त्यांच्या खास वर्तुळातील.
शापित झाल्यानंतर केव्हा तरी आमच्या स्वर्गीय विसुभाऊकाकांच्या शेतावरच्या घरी यशवंत दत्त आराम करायला आला होता. (मी त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान होतो, पण त्याच्या दिलदार स्वभावामुळे त्याच्याबरोबरचे संबंध नेहमीच अरेतुरेचे राहिले.) दोन दिवस नुसती धमाल चाललेली होती. विविध प्रकारच्या गप्पा टप्पा चालू होत्या. अनेक नवनवे किस्से ऐकायला मिळत होते. मी कॉलेजमध्ये जाणारा मुलगा होतो. त्यामुळे तर मला अधिक गंमत वाटत होती. यशवंत दत्त तेव्हा जयवंत दळवींचं एक कालचक्र नावाचं नाटक व त्यात म्हातार्या घड्याळजीची भूमिका करत असे. त्याचवेळी तो राजसंन्यासमधील संभाजी, नटसम्राट मधील अप्पा बेलवलकर आणि चित्रपटातील तरुण नायकांच्या भूमिका करत असे. मी त्याला या भूमिकांचा समतोल कसा साधतोस असं विचारलं, त्यानं उत्तर दिलं, ते साधून जातं.
तो त्यावेळी वयाच्या पस्तिशीत होता. आणि नाटकात म्हातार्यांच्या भूमिका करत होता. तो म्हणालाः काही नाही रे, मी भूमिकांचा अभ्यास करताना त्या व्यक्तिरेखांसदृश माणसं कुठं सापडतात का ते पहात असे. कालचक्रमधला म्हातारा घड्याळजी असाच मला विचार करता करता सापडला. हा म्हातारा जातीनं सारस्वत आहे. तो घड्याळजी म्हणजे, घड्याळं दुरुस्त करणारा आहे. सतत दबून जगणारा माणूस आहे. मला त्याचं बसणं सापडलं, तो घड्याळं दुरुस्त करणारा, म्हणजे तो नेहमी पाठीत पोक काढूनच बसेल, तो नुसता बसला तरी तो घड्याळाच्या लंबकासारखा झुलत राहील, त्याचं बोलणं ठरवताना मला साहित्य संघाचे तात्या आमोणकर आठवले, मी तात्यांची बोलण्याची शैली त्या म्हातार्याला दिली, असा माझा म्हातारा घड्याळजी तयार होत गेला.
बाबा (यशवंत दत्त) त्यावेळी कवितावाचनाचा कार्यक्रम करत असे, तो स्वतः दर्जेदार कविता लिहित असे आणि सादरही करत असे. त्या दोन दिवसात त्याने इतक्या प्रकारे धमाल केली की विचारता सोय नाही.
आणि त्याचा जाण्याचा दिवस आला. तो आमच्या घरी कर्जतला आला, रविवारच्या सकाळी तो गप्पा मारत बसला, त्याला दुपारचं दोनचं शूटिंग होतं. दहा वाजले तो जायला निघाला. बाहेर फियाट उभी होती. आमचं घर कर्जतच्या मध्यवर्ती बाजारपेठेत आहे. तेवढ्यात आईनं आठवण केली; अरे, तू त्यांची सही घेतलीस की नाहीस? मी जीभ चावली आणि वही आणायला घरात पळालो. वही झटकन् सापडेना, बाहेरून बाबाचा आवाज अरे लवकर ये. मला तेव्हा नटसम्राट नाटक अभ्यासाला होतं. बाबा त्यात अप्पा बेलवलकरांची, म्हणजे नटसम्राटाची मुख्य भूमिका करत होता. मला ते पुस्तक समोर सापडलं, ती पहिली आवृत्ती होती, त्या नाटकाची! त्यावर वि वा शिरवाडकरांचीही सही होती. मी ते पुस्तक घेऊन रस्त्यावर आलो. दहा होऊन गेले होते, नुकतीच रामायण मालिका संपली होती. रस्ता गजबजू लागला होता. यशवंत दत्तला पाहून लोक जमा होत होते. मी पुस्तक पुढे केल्यावर त्यानं ते हातात घेतलं, मुखपृष्ठाचं पान फाटलं होतं. कुसुमाग्रजांची सही पहिल्याच पानावर पाहून त्यानं जीभ चावली, म्हणाला या पानावर मी नाही सही करणार, इथं महाकवींची सही आहे. मी म्हटलं सही तर हवीच आहे. मग आतल्या पानावर सही करू का? त्यानं पान उलटलं, समोर नाटकाचं पहिलं पान, अंक पहिला प्रवेश पहिला. बाबानं झोकात तिरपी लफ्फेदार सही केली यशवंत दत्त!
खाली पाहिलं.
अंक पहिला प्रवेश पहिला. बाबानं वाचलं
आणि नंतर, कर्जतच्या भर बाजारपेठेत, एक हात फियाटच्या दारावर एका हातात नटसम्राटचं पुस्तक धरलेलं! अशा स्थितीत पुढची चाळीस मिनिटं पहिलं स्वगत यशवंत दत्त म्हणत होता. त्या भर उन्हात कर्जतच्या बाजारपेठेनं एका अस्सल कलावंताचा अभूतपूर्व असा उत्स्फूर्त आविष्कार पाहिला. त्या कलावंताला नव्हतं भान बाजारपेठेचं, तिथल्या गर्दीचं, नव्हतं भान कशाचं! तो नव्हता यशवंत दत्त, तर त्या क्षणी तो होता – अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट!
आकाशातला सूर्य एका अभिनयसूर्याचं ते कौतुक पहाता पहाता काही क्षण स्वतःही स्तिमित झाला होता!!
— नीतिन दत्तात्रेय आरेकर
कर्जत-रायगड
Leave a Reply