नवीन लेखन...

ये है मुंबई मेरी जान

मुंबईचे आकर्षण इतर लोकांसारखेच मलापण पहीलेपासुन होते. मुंबईबद्दलच्या अनेक गोष्टी लहानपणापासुनचं मनावर बिंबवल्या गेल्या आहेत. मुंबईचे जीवन जास्त उलगडत गेले ते हिंदी सिनेमांमुळेच, त्याकाळच्या सिनेमांमधे जे काय मुंबईचे दर्शन झाले तितक्याच कारणांमुळे सामान्य माणुस मुंबईकडे आकर्षला गेला असावा व त्याचमुळे एक एक करता अख्खी कुटुंबे इथे जिथे जागा मिळेल तीथे स्थिरावली. मी मुंबईत फिरतांना नेहमी कॅबवाले, आॅटोवाले, टॅक्सी ड्रायव्हर्स यांच्याशी बोलते.

त्यातील बहुतेकजण सांगतात की आम्ही इथे चाळीस वर्षांपासुन आहोत. कमीत कमी २५ ते ३० वर्षांपासुन इथे राहणारे अनेक टॅक्सी ड्रायव्हर इथे आहेत. लांबचा प्रवास असला की त्यांच्या बोलण्यातुन त्यांचा जीवनप्रवास व मुंबईच्या अनेक गोष्टी ऐकावयास मिळतात. मला हे त्यांच्याद्वारे मुंबईचं जीवन उलगडत जाणे खुप आवडतं. यामधे संमिश्र अनुभव असतात. यांच्यापैकी अनेकजण पैसै कमवायला तर आलेलेचं आहेत परंतु महाराष्ट्र हा बिहार व उत्तर प्रदेश यांच्यापेक्षा कसा सुरक्षित आहे व मुंबईत माणुस उपाशी मरत नाही या एका भावनेपोटी ही लोक इथे कायमचे स्थिर व्हायला पाहतात हे जाणवतं. ही गोष्ट खरी आहे की मुंबई तुम्हाला उपाशी ठेवत नाही.

पोटापुरता कमाई तर इथे नक्कीच करता येते. वर्षानु वर्षे हीच भावना बळावल्या गेल्यामुळेचं मुंबईत रहायला जागा मिळत नाही तरी इथे माणसांची गर्दी वाढते आहे. शिवाय बाहेरुन आलेले लोकं म्हणतात की इथली शिक्षण पद्धती खुप चांगली आहे. त्यांच्याकडे ज्याच्याजवळ पैसा आहे तेच लोक चांगल्या नामांकीत शाळांमधे आपल्या पाल्यांना शिकवु शकतात. त्या राज्यांमधे म्युनिसीपाल्टीच्या शाळांची तर बोंबच आहे,गावांमधे प्राथमिक सुविधाच धड नाहीत व इतर बाबींचा बट्टयाबोळ आहे. तिकडच्या त्यांच्या खेड्यातील काय व शहरातील काय तेथील जनता स्थानिक धनदांडग्यांच्या गुंडगिरीने पिचलेली आहे. यांच्याविरुद्ध कोणी आवाज काढला तर बंदुकीच्या गोळीवर त्याचे नाव लीहीले गेलेच समजा असं या सामान्य व गरीब लोकांच्या बोलण्यातुन समजतं. एका सामान्य माणसाची स्वप्न ती काय असणार? ती स्वप्न ही माणसं मुंबईत राहुन पुर्ण करायला पाहतात म्हणुनचं ते मुंबईत रहायला पाहतात.

सगळीच लोक काही वाईट नसतात. परंतु आपल्याला मुंबई नकोशी वाटते कारण आपण महाराष्ट्रातलेच पण मुंबईच्या बाहेरचे, आपण जिथे राहतो तीथे आपल्याला या लोकांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. आपण एका सुरक्षित वातावरणात राहतो म्हणुन आपल्याला आयुष्याशी झगडणे माहीत नाही. मी काय किंवा तुम्ही काय आपण कोणीच यामधे काहीच बदल घडवुन आणु शकत नाही परंतु कमीत कमी या लोकांशी बोलल्यानंतर काही क्षणांपुरता का होईना आपलं अंतरंग कोणीतरी जाणुन घ्यायचा प्रयत्न करतं आहे असं वाटुन प्रवासाच्या त्या अर्ध्या एक तासात आपण जर त्यांना बोलतं केल तर ते आपल्याशी भरभरुन बोलतात. त्यांना व मलाही हे माहीत असतं की यानंतर मुंबईच्या त्या भाऊगर्दीत आपण परत कधीच परत भेटणार नाही आहोत.

मला अशा लोकांचे बोलणे ऐकुन घ्यायला आवडतं त्या वेळेपुरता का होईना परंतु त्यांच्या मनावरचा भार थोडया फार प्रमाणात कमी होत असावा अस माझ मत आहे. कोणाशी बोलल्याने आपल्याला खुप सारे चांगले वाईट विचार , मतं ऐकायला मिळतात. या लोकांमधे काही लोक तर इतकी हुशार असतात की आपण त्यांना एक प्रश्न विचारला तर ते त्याची उत्तरं वेगवेगळ्या प्रकारे उदाहरणांसह देतात. कधीकधी मी तर यांची बुद्धीमत्ता पाहुन अवाक होते. मुंबईत फिरतांना मला अनेक सामान्य लोक भेटले. यामधे बिहारी, उत्तर प्रदेशी, मराठी, कोकणी यांचा समावेश आहे. माझ्याकडे कामावर असलेल्या ताई चिपळुणजवळच्या एका खेड्यातील ,परंतु त्या मालवण व सिंधुदुर्गातील लोक आमच्यापेक्षा वेगळी आहेत व त्या स्वतः अस्सल मराठी आहेत अस सांगतात तेव्हा मला हसायला येत. परंतु याच लोकांच्या मुखातुन मुंबई आमची आहे व इथेचं आमचे सर्वस्व आहे असं जेव्हा मी ऐकते तेव्हा ही महानगरी या लोकांना खरचं आपल्या लेकरासारखी सांभाळते, त्यांना आयुष्याचे धडे गिरवायला सांगते, मेहनत करायला सांगते, प्रसंगी कर्तव्य कठोर होऊन वास्तविकतेचा सामनादेखील करवते असं वाटत. मुंबईत माणसाला संघर्ष केल्याशिवाय सहजासहजी काहीच मिळत नाही म्हणुनच ती जगायला शिकवते अस मी म्हणेल.मुलांना जशी आपली आई प्रिय असते तशीच मुंबई इथल्या सामान्य लोकांना प्रिय आहे.

आपण मुंबईच्या या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही का? विकृती तर सगळीकडेच आहेत पण आपल्याला ती फक्त मुंबईचीच जास्त दाखवल्या गेली आहे. वर्षानुवर्ष जी माणसे इथे राहतात त्यांना विचारा की मुंबई काय आहे तर ते हेच म्हणतांना दिसतील ,” ऐ दिल है मुश्कील जीना यहां, जरा हटके , जरा बचके , ये है मुंबई मेरी जान .

-सौ. माधवी जोशी माहुलकर. 

(लेख आवडल्यास माझ्या नावासह शेयर करण्यास माझी काही हरकत नाही.)

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..