भारतीय स्टेट बँकेत 33 वर्षं नोकरी करताना त्यातील 25 पेक्षा जास्त वर्षं मी वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये होते आणि कॅशियर-कम-क्लार्क असल्याने प्रत्येक ठिकाणी कॅशमध्ये काम केलंच. इतक्या प्रकारची माणसं भेटली आणि इतके अनुभव मिळाले, काही विचारूच नका!
मला का कोण जाणे कॅश डिपार्टमेंटमध्ये विशेषतः पेमेंट काउंटरवर काम करायला फार आवडायचं, असं वाटायचं की आपणच लोकांना मोठमोठ्या रकमा वाटतोय. ठाण्याच्या कलेक्टर ऑफिस शाखेत असताना दर 1 तारखेला पेन्शन वाटप असायचं. त्या दिवशी अकराऐवजी आम्ही साडेनऊला काउंटर सुरू करायचो आणि पहिल्या मजल्यावरच्या काउंटरपासून पार तळमजल्याच्या बाहेरपर्यंत रांग असायची. मी आपण होऊन जायची पेमेंट करायला, खूप दमछाक व्हायची, पण खूप छान वाटायचं, सगळे पेन्शनर्स ओळखायचे, दुवा द्यायचे, एखादी आजी कानशिलावरून बोटं मोडून अलाबला घ्यायची आणि म्हणायची, ‘पुढच्या 1 तारखेला पण तूच ये गो बाय!’ तेव्हा अगदी धन्यता वाटायची, सगळे कष्ट विसरायला व्हायचे. तशीच गंमत गव्हर्नमेंट पेमेंट्सची. पोलीस खातं (त्यांच्या पेट्यांना कुलुपाऐवजी हातकडी असायची!), पाटबंधारे, टाउन प्लँनिंग, मेंटल हॉस्पिटल इत्यादींच्या पगाराच्या मोठमोठ्या रकमा असायच्या, घाईत कधी चूकही व्हायची, एकदा मीच चेक्सची बेरीज चुकवून 1 लाख रुपये जादा दिले होते, शोधाशोध केल्यावर कुणाला दिले ते समजलं, पण तोवर त्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांनी परत आणूनही दिले.
एका ब्रँचला एक पेन्शनर आजोबांचा एवढा विश्वास की, एकदा मी रजेवर होते, तर FD करायला आणलेली एक लाख वीस हजाराची रक्कम परत घरी घेऊन गेले, दुसऱ्या दिवशी मी म्हणाले, ‘काका पैसे नेण्याआणण्याची इतकी जोखीम का घेतली.’ तर म्हणाले, ‘तू नव्हतीस ना, मग मी आपला परत गेलो.’ एकदा एक काका म्हणाले, ‘अग तू डाव्या हाताने पैसे मोजतेस, उजव्या हाताने लिहितेस आणि परत डाव्या हाताने स्टॅम्प मारतेस, दोन्ही हातांनी काम करतेस, म्हणून तुझी रांग लवकर सरकते.’ रांगेत समोर असणारे आपल्याला किती बारकाईने ऑबझर्व्ह करतात हे जाणवलं त्यावेळी.
एका शाखेत करन्सी चेस्टची मी मुख्य अधिकारी होते. कॅश डिपॉझिट मशीनवर पैसे भरायला फार गर्दी असायची. एक दिवस एक पोलीस अधिकारी आले, ‘मॅडम काल रात्री मी तुमच्या मशीनमध्ये दहा हजार भरले. पण खात्यात नऊ हजारच जमा झाले, कसलं मशीन तुमचं! वगैरे.’ शांतपणे त्यांना सांगितलं की, ‘बरोबर आहे तुमचं, पण त्यातील एक हजाराची नोट नकली होती, म्हणून ती खात्यात आली नाही तुमच्या.’ मग शांत झाले, म्हणाले, ‘अंधार होता हो, मला लक्षात नाही आलं.’ एकदा एका माथाडी कामगाराने पैसे जमा केले, त्यात 500 ची नोट नकली असल्याने आम्ही ती जप्त केली, त्याने इतकी गयावया केली, त्याला पगारात त्या नोटा मिळाल्या होत्या, फार वाईट वाटले. त्याला समजावलं की, ती नोट रिझर्व्ह बँकेत पाठवावी लागते असं. तासाभराने परत आला पठ्ठ्या आणि मला हळूच सांगतो की, ‘मॅडम वाटल्यास हे शंभर रुपये घ्या, पण ती नोट परत द्या.’ कसाबसा त्याला वाटेला लावला.
मनाला अतिशय चटका लावणारी एक आठवण आमच्या एका साहेबांकडून ऐकलेली, पंचवीसएक वर्षांपूर्वी पेन्शन वाटप करताना एका व्यक्तीने सुट्टे मागितले म्हणून 10 रुपयांच्या नोटात 500 रुपये दिले त्यांनी. संध्याकाळी हिशेब करताना 10 रुपये जास्त आले, तसं त्यांना आठवलं की, फक्त एकाच पेन्शनरांना त्यांनी 10 च्या नोटा दिल्या होत्या. पुढल्या महिन्यात जेव्हा ते काका पेन्शन काढायला आले, तेव्हा आठवणीने साहेबानी त्यांचे 10 रुपये परत केले आणि क्षमा मागितली, त्यावर ते काका उन्मळून रडू लागले, चौकशीअंती समजलं ते असं की, आदल्या महिन्यात पैसे घरी नेल्यावर जेव्हा त्यात 10 रुपये कमी भरले, तेव्हा काकांच्या सुनेने त्यांना नाश्ता द्यायचं नाकारलं, का तर 10 रुपयाचं परस्पर बाहेर हादडून आले असतील म्हणून! हे ऐकून अक्षरश: काटा आला अंगावर.
तर अशी ही पैशांची महती, पैशाभोवती दुनिया फिरते म्हणतात ते काही खोटं नाही.
-प्रीती बक्षी
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply