नवीन लेखन...

अशी असेल २०२५ ची “ई-दिवाळी”

हा लेख सुमारे १० वर्षांपूर्वी लिहिला होता. यात २०२५ साली काय परिस्थिती असेल याचा वेध घेतलेला आहे. यातील अनेक बाबी आज तंतोतंत लागू होतात.

लेखक : डॉ. दीपक शिकारपूर – अद्वैत फिचर्स 

आगामी काळात मानव वेगवान प्रगती करेल यात शंका नाही. २०२५ पर्यंत बँका, वर्तमानपत्रे, टेलीकम्युनिकेशन, संगणक या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झालेले असतील. पोस्टासारख्या अनेक संकल्पना अस्तित्वातही नसतील. त्यावेळची दिवाळीही ई-दिवाळी बनली असेल. ई-फटाके, ई-शुभेच्छा, ई-टाईमपास, ई-भेट, ई-नमस्कार, ई-आशीर्वाद अशा जगात आपण जणू ई-मानवच बनून जाऊ. या सधन, समृद्ध भविष्यकाळाचा रंजक फेरफटका


आजच आपण पोस्टात फिरकत नाही. पण २०२५ मध्ये पोस्ट ऑफिस अस्तित्वात नसल्याचीही आपल्याला सवय झाली असेल. बँकांचे बरेच व्यवहार ऑनलाईन होत आहेत. आगामी काळात तर धनादेशही इतिहासजमा होतील. ब्रिटनमध्ये २०१८ पर्यंत धनादेशांचा वापर बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. धनादेश छापणे आणि ग्राहकाने बँकेत भरल्यावर त्यांच्यावर प्रक्रिया करणे यावर कोट्यवधी रुपये खर्च होतो. हे टाळण्यासाठी धनादेशांऐवजी ‘प्लास्टिक मनी’ आणि ऑनलाईन व्यवहारांचीच चलती राहील. बँकांच्या शाखांमध्येही आमूलाग्र बदल होतील. ग्राहकांची वर्दळ नसल्याने या शाखा सॉफ्टवेअर कंपन्यांच्या कार्यालयाप्रमाणे भासतील.

रोज सकाळी वर्तमानपत्र वाचायला मिळालं नाही तर दिवस सुरू झाल्यासारखं वाटत नाही. ढीगभर वृत्तवाहिन्या सुरू झाल्या असल्या आणि त्या मिनिटागणिक ब्रेकिंग न्यूज दाखवत असल्या तरी वृत्तपत्रांचं महत्व अबाधित आहे. पण, २०२५ पर्यंत ही परिस्थिती बदलेल. एक तर तरुणांचं वृत्तपत्रवाचन आधीच कमी झालं आहे. दिवसभर ऑनलाईन असणारा युवावर्ग संगणकावरच इ-पेपर वाचत जाईल. त्यामुळे रोज घरी येणारं छापील वर्तमानपत्र काही वर्षांनी दिसणार नाही. अर्थात त्यावेळी ई-पेपर विनामूल्य नव्हे तर ऑनलाईन पैसे भरून वाचावा लागेल. महिन्याचं पुस्तकांचीही तीच परिस्थिती होईल. वाचनाची आवड कमी झालेली असताना ई-रिडर आणि ऑनलाईन पुस्तके निम्म्या किंमतीत उपलब्ध झाली तर छापील पुस्तकांची ‘छुट्टीच होईल. मोबाईलचा वेगाने प्रसार झाल्यामुळे लँडलाईन टेलीफोनचं महत्त्व आजच कमी झालं आहे. परंतु, केवळ आपल्याकडे खूप वर्षांपासून आहे म्हणून तो बंद केला जात नाही. आजकाल तर त्याचा वापरही खूप कमी झाला आहे. २०२५ पर्यंत सर्वत्र मोबाईल फोनच दिसतील (कदाचित तेही शरीरात एखाद्या चिपच्या रुपात जाऊन बसले असतील) आणि लँडलाईन फोन्सचा वापर पूर्णत: बंद होईल असं वाटतं.

इंटरनेटच्या जमान्यात जवळजवळ सर्व वाहिन्यांवरील कार्यक्रम संगणकावर पाहता येत असल्याने केबल, डीटीएच या सेवा आणि दूरचित्रवाणी संच कालबाह्य ठरू लागले आहेत.

इंटरनेटवर आपल्याला हव्या त्या वाहिनीवरील हव्या त्या कार्यक्रमाचा हवा तो भाग वेळेचे बंधन न पाळता पाहता येईल. त्यामुळे कार्यक्रम रेकॉर्ड करून ठेवण्यासारख्या अत्याधुनिक वाटणाऱ्या सुविधांना अर्थच उरणार नाही. साहजिकच दूरचित्रवाणी संच २०२५ मध्ये विस्मृतीत गेलेले असतील. संगणकविश्‍वही पुढील काळात पूर्ण बदलून जाईल. आजच्या सीडीज, डीव्हीज, हार्ड डिस्क यांची भविष्यात गरजच उरणार नाही. अँपल, मायक्रोसॉफ्ट, गूगल अशा कंपन्या त्यांच्या क्लाऊड’ सेवा सुरू करत आहेत. सर्व भविष्यात सर्व संगणक इंटरनेटला जोडलेले असतील. त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिम्स इंटरनेटवरच असतील. आपण केलेलं काम इंटरनेटवरील क्लाऊडमध्ये सेव्ह करता येईल आणि हवे तेव्हा तिथून काढता येईल. पण, भविष्यातील या व्हर्च्युअल जगात प्रायव्हसी मिळणार नाही. सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समुळे आपण सतत जगाच्या संपर्कात राहू. आजच्या संगणकाप्रमाणे भविष्यात माऊस, की बोर्ड, मॉनिटर, सीपीयु अशी रचना नसेल. एखादी लहानशी चीप हे संपूर्ण काम करेल. कदाचित अशीच एखादी चीप आपल्या शरीरातही असेल. ही चीप आपल्या शरीरातीलही अनेक कार्याचं नियंत्रण करेल आणि संगणक म्हणूनही काम करेल. पण, संगणकाधारित जगात मानवी संवाद कमी होईल.

अशा ई-जगात आपली सर्वांची लाडकी दिवाळी आजच्यासारखी राहणार नाही. ती ही ई-दिवाळी झालेली असेल. कल्पना करा, पहाटे पाच वाजता फटाक्यांच्या आवाजाने आपल्याला एकदम जाग येते. क्षणभर आपण दचकतो. आपण तर दिवाळीच्या सुट्टीसाठी भ्रमण करायला बंदीपूरच्या जंगल लॉजमध्ये आलो आहोत. इकडे फटाके कुणी उडवले? तेवढ्यात आपल्या लक्षात येईल की, आपण व्हिडिओ फोन ऑन करून झोपलो होतो आणि आपल्या चिरंजीवांनी पुण्याहून ई-फटाका पाठवला होत! आपली पत्नीही या आवाजाने जागी होते आणि आपल्या अंगठीतील व्हिडिओ फोनचा प्रोजेक्टर पुढील भिंतीवर प्रतिबिंबित करते. आपल्या या रिंगटॉपची बँडविडूथ आपण १० गिगाबाइट्स प्रतीसेकंद या वेगाला नुकतीच अद्ययावत केली होती. २०२० मध्येच पूर्ण हिंदुस्थान या अद्ययावत दळणवळण यंत्रणेने जोडला होता. आता पुण्याची बँडविड्थ २,००० गिगाबाइट प्रतीसेकंद आहे, तरीही नागरिक चरफडत होते की, ही २०,००० गिगाबाइट कधी होणार?

समोरच्या भिंतीवर त्रिमितीमध्ये आपला पुण्यातील मुलगा, त्याचे कुटुंब, सॅनहोजेमधील आपली मुलगी आणि तिचे कुटुंब हे पिक्चर-इन-पिक्चर तंत्रज्ञानात अवतीर्ण होतात आणि शुभ दीपावलीच्या ‘ई-शुभेच्छा’ तुम्हाला देतात. प्रदूषणामुळे जगात सर्वत्र फटाक्यांवर बंदी असल्याने २०१९ नंतर आपल्याला फक्त ई-फटाक्यांवरच समाधान मानावे लागले आहे. आपल्या नातवाकडे हातात ई-फुलबाजी आहे; पण त्याचा रिमोट तुमच्याकडे आहे. आपण आपल्या मेंदूतील संगणकीय चीपला सांगता की आता ‘शेअरवेअर’ म्हणजे सार्वजनिक स्मृतीपटल खुले करा. आता आपल्या मनातील काही विचारांद्वोरे आपण संगणकाला आदेश देऊ शकाल. की-बोर्ड आणि माऊस वापरून संगणक वापरायची पद्धत २०१५ नंतर रद्द झाली. २०१८ नंतर बोलीभाषा आणि नोटपॅडसुद्धा इतिहासजमा झाली. गेल्या सहा वर्षांत संगणकीय चीप्स आता आपल्या मेंदूत ट्रान्सप्लँट झाल्या आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे संगणकीय आज्ञावली मनातल्या मनात आठवल्या तरी त्याद्वारे नियंत्रित करू शकत आहात. या ई-आज्ञांद्वारे आपण आपल्या नातवाच्या ई-फुलबाजीची वात नियंत्रित करून पेटवू शकत आहात.

तेवढ्यात आपल्या सॅनहोजेमधील मुलीच्या घरातील फराळाचा ई-सुगंध दरवळू लागतो आणि आपली गोडधोड खायची उर्मी जागृत होते. आपण पटकन जाऊन मुखमार्जन करून येता, पण तेवढ्यात आपल्या लक्षात येते की आपल्याला मधुमेह आणि रक्‍तदाब असल्याने गोडधोड तसेच तळकट खायला डॉक्टरसाहेबांनी बंदी केली आहे. आपल्या पोटातील संगणकीय चीप डॉक्टरसाहेबांच्या डेटाबेसवर आपण काही अबरचबर खाले तर तक्रार करेल आणि त्यामुळे डॉक्टरसाहेब लगेच आपल्याला ई-झापतील. आपली विमा कंपनी त्यामुळे आपले पेनल्टी पॉईंट्स वाढवील आणि त्यामुळे पुढील वर्षाचा विम्याचा हप्ताही वाढेल. या भीतीने आपण विंडोज २०२५ चे कंट्रोल पॅनेल मनातील रिमोट कंट्रोलद्वारे उघडता आणि स्मेल ऑप्शन डिसेबल करता. त्यामुळे आता आपल्याला संगणकीय वास येणे बंद होईल. याला वैतागून तुम्ही लगेच कोणत्याही खाद्यपदार्थांचा शरीरावर दुष्परिणाम होणार नाही अशी चिप बसवायचं ठरवून टाकाल.

आपली मुले वा नातवंडे तुम्हा उभयतांना ई-शुभेच्छा देतात आणि आपल्या ई-पाया पडतात. तुम्हीही ‘शतायुषी भव’ असा ई-आशीर्वाद देता. पुणे आणि सॅनहोजेमधील हवामानाची चौकशी करता. आता पुढील ई-भेट भाऊबीजेच्या दिवशी १२ वाजता हे ठरवून आपले ई-संभाषण संपते. आपण उभयता आपले आटोपता अणि आता शुभेच्छा संदेश ई-चाळायला सुरुवात करता. ग्रीटिंग कार्डद्वारे शुभेच्छा द्यायची प्रथा २०१२ नंतर हळूहळू कमी होत गेली आणि आता फक्त हस्तलिखित संदेशाची देवाणघेवाण करतात. मुलांना हाताने लिहायला शिकवावे की नाही’ हा परिसंवाद वसंत व्याख्यानमालेत सन २०२२ मध्ये कसा रंगला हे अपल्याला एकदम आठवतं. चलत्‌चित्रे आणि आपल्याला आवडणारे काही क्षण यांचे चित्रण मल्टीमिडिया आयुांद्वारे आपण करू शकता अन्‌ भावभाठनांचे प्रतिबिंब असणारी व्यक्तिगत शुभेच्छा इतरांना पाठवू शकता. आता आपल्याला ‘ई-तरांचा’ कंटाळा यायला लागतो आणि आपण जंगलात फेरफटका मारायला जाता. कुठल्याही आयुधांची कटकट नको कानामागील मेनस्विच ऑफ करता. यामुळे फक्त शरीरातील अत्यावश्यक संगणक यंत्रणाच सुरू राहते आणि फक्त ‘अत्यंत महत्त्वाचे’ तेसुद्धा ठरवू त्या प्रेषकांकडून आलेले ई-संदेशच आपण ग्रहण करू शकतात.

दुपारचे चार वाजलेत. आपण वामकुक्षीनंतर जागे झालात आणि आपल्याला सहा वाजता जंगलात इव्हिनिंग सफरीला जायचे आहे. आता वेळ कसा घालवावा ही चिंता ई-जीवनपद्धतीत मुळीच करू नका. सर्वप्रथम आलेले ई-संदेश चाळा. त्यानंतर कंटाळा आला की, >ींळाशशि.ले या वेबसाईटला भेट द्या. १९८७ मधील दिवाळीत दूरदर्शनवर दाखवलेला ‘गजरा’ हा आपला आवडता कार्यक्रम. आपल्या शक्तिशाली संगणकातील सर्च इंजिन हा कार्यक्रम मायक्रोसॉफ्टच्या मनोरंजनाच्या डेटा वेअरहाऊसमधून शोधून काढेल आणि पुढील दीड तास आपण उभयता गतस्मृतींना उजाळा देत घालवाल. आपल्याला जाहिरातींव्यतिरिकत ‘गजरा’ पाहायचा असेल, तर पे-चॅनेल कम साईट तुम्हाला रु. ५०० दर मिनिट या माफक दराने हा कार्यक्रम दाखवेल! हे पैसे आपल्या ई-बँकेतील खात्यातून आपोआप वळते करून घ्यायची सोय असल्याने पैसे द्यायचे कसे ही विवंचना आपल्याला अजिबात नाही.

डॉ. दीपक शिकारपूर

अद्वैत फिचर्स (SV10)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..