प्रेमात पडलेली एक सुंदर ‘ ती ‘ . आपल्या ‘त्याचा ‘ सोबत घालवल्या क्षणाच्या आठवणीत निथळणारी . ‘आठवणीत निथळणारी ‘ म्हणजे ‘तो ‘सोबत नाहीय !पण त्याचा विरह किती गोड आहे ! येथे झुरणं नाही कि ,रडणं नाही , तर आनंदच उधाण आहे ! विरह आणि आनंदच उधाण एकत्र कसे ? तर ‘ तो ‘ फक्त तिच्या मनातच नाही तर , आसपासच्या बर्फाच्छादित पर्वत राईत , लगतच्या हिरव्यागार दऱ्याखोऱ्यात , त्यातल्या पायवाटेत , तेथे वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात , काठावरच्या उंच झाडांच्या शेंड्यावरून सरकणाऱ्या ढगात , तेथील शीतल वाऱ्याचा झुळकेत तो तिला जाणवतोय , त्याच्या प्रेमाची उब ती अनुभवतेय ! ‘मुझे घेर लेते ,है बाहो के साये ‘ असे तिला वाटते आहे ! हीच तर खरी प्रेमाची लज्जत असते!
हि सुंदर कल्पना आहे एका तरल मनाच्या कवीची , जान निसार अख्त्तर याच्या एका गीताची !
‘ ये दिल और उनकी ,निगहो के साये
मुझे घेर लेते ,है बाहो के साये ‘
हे गाणे आहे १९७३ सालच्या ‘प्रेम परबत ‘मधलं . हि एक ‘ लॉस्ट फिल्म ‘ आहे . म्हणजे आजमितीस या सिनेमाची एकही प्रिंट अस्तित्वात नाही ! इतक्या सुंदर गाण्याची मूळ प्रत नसावी हा सिने रसिकांचा दैव दुर्विलास आहे नाही तर काय ?
पण खरे सांगू या गाण्याला ‘पहाण्याची ‘गरज कधीच पडणार नाही ! जान निसार याचे शब्द ,लताजींचा आवाज आणि जयदेव यांचे संगीत —– फक्त डोळे मिटून गाणं ऐका , तुमच्या मनाच्या ‘सिनेमास्कोप स्क्रीनवर ‘ लोभस लोकेशन वरील (हिमालयाच्या पायथ्याचा परिसर आठवा ) पिक्चरायझेशन साकारेल ! अहो ,इतके जबरदस्त कंपोझिशन आहे या गाण्याचे . गीतकारांनी ‘ ती ‘च्या आठवणी सोबत निसर्गाची ‘सैर ‘ करवली आहे . हा गृहस्थ हे गाणे लिहताना शाई आणि पेन ऐवजी रंग आणि ब्रश घेऊन बसला होता कि काय ?,अशी शंका येते ! गाण्याच्या प्रत्येक कडव्यात एक ‘चित्र ‘ जाणवत !
लताजींचा आवाज या गाण्यातील शब्दांना अर्थ देवून जातो . त्यांचा आवाज या गाण्याची ‘जान ‘आहे . या गाण्यातील त्यांचा आवाज मल्टिडायमेन्शल आहे . म्हणजे शब्दांचा अर्थ ,त्यांचं त्यामागच्या भावनेचा संदर्भ , वातावरण निर्मिती ,सबकुछ प्रगट करून जात . ऐकणाऱ्याला सोबत घेऊन जात . संमोहित करून टाकत !गाण्याच्या सुरवातीला लालाजींनी जो ‘हू SSS म , हू SSS म ‘ हुंकार लावलाय तो आपल्याला सोबतच्या सरोद आणि बासरीच्या सुरात लपेटून हिमालयाच्या कुशीत कधी घेऊन जातो काळतही नाही ! वर तेथेच गाणंभर झुलवत ठेवतो ! पहिल्या कडव्यात ‘हवा हर नदी का बदंन चुमती है ‘ हि ओळ ऐकताना ओलसर वाऱ्याची , त्याचा लेमन फ्रेश वासा सगट , झुळूक जाणवते ,तर दुसऱ्या कडव्यात ‘ बहुत ठंडे -ठंडे ,है चाहो के साये ‘ ऐकणाऱ्याच्या कानात थंडगार वाऱ्याची फुंकर मारून जाते ! लताजींचा आवाज तसा गोडच आहे ,पण सी .रामचंद्र ,मदन -मोहन , सलील चौधरी आणि जयदेव यांच्या संगीतात तो बहरून येतो . कारण हे त्यांचे आवडते संगीतकार आहेत . लताजींच्या गाण्याची क्रमवारी लावणे एक कठीणच नाहीतर अशक्य काम आहे ,तरी त्यांच्या गाण्यात या गाण्याला ‘विशेष उच्च स्थान ‘ द्यावे लागेल .
या गाण्याचे संगीतकार आहेत जयदेव . खरेतर हे गाणे त्यांनी या सिनेमासाठी केले नव्हते ,पण दिग्दर्शक वेद राही याना हे गाणे इतके आवडले कि त्यांनी ते या सिनेमात घेतलेच . जयदेव यांनी हे गाणे राग पहाडी वर बेतलंय . हा हिमालयातील पहाडी लोक संगीतावर आधारित राग . या रागात लय आणि गती अफलातून असते . आपल्याला ती या गाण्यातही जाणवेल .या रागाला वेळेचे बंधन नाही . केव्हाही हा गाता येतो . या गाण्यात लताजीनच्या आवाजास सरोद ,बासरीची साथ उत्तम लाभली आहे . उदाहरण म्हणून गाण्यातला एक स्पॉट सांगतो . दुसऱ्या कडव्यांची पहिली ओळ आहे ‘ लिपटते ये पेढोसे ,बादल घनेरे ‘ या ओळी च्या शेवटी ,जो बासरीचा पीस वाजवलंय ,तो आपल्या सूरांसोबत ऐकणाऱ्याला उंच असलेल्या त्या ‘ घनेऱ्या बादल ‘ पर्यंत उडवत नेतो ! गाण्याच्या गती साठी तबल्याला आठ मात्रांचा केरवा जुंपलाय !
जयदेव एस . डी . बर्मन कडे सहायक होते . १९६१च्या ‘हम दोनो ‘ ने त्यांना लाईम लाईट मध्ये आणले . तसा हा गुणी संगीतकार सामान्यांच्या ‘काना ‘पासून काहीसा दूर आणि दुर्लक्षितच राहिला . व्यावसायिकतेचा आलेख कमीच पडला . हरिवंश राय बच्चन यांच्या ‘मधुशाला ‘चा मन्नाडेच्या आवाजातील अल्बम यांचाच . (माझा तो ऐकायचा राहून गेलाय .) जयदेव यांचे शेवटचे योगदान प्रसिद्ध टी .व्ही . सिरीयल ‘रामायण ‘ला लाभले . प्रसिद्धी साठी सिद्धी आवश्यक असते ,पण साऱ्याच सिद्धाना प्रसिद्धी मिळत नाही ! तसेच काहीसे जयदेवांन बाबतीत झाले असावे .
तर असे हे राग पहाडीतले सुंदर गाणे . ऐकणाऱ्या कानांना मेजवानी .’ प्रेम ‘ करणाऱ्यांचं गाणं . लताजींच्या आवाजातलं काव्य शिल्प ! दगडाच्या ,लाकडाच्या शिल्पना काळ झिजवून टाकेल ,पण हे शिल्प कालातीत आहे ! फक्त येणाऱ्या पिढीने ते जपून ठेवावे ,इतकीच तळमळ आहे . हे गाणं तस सर्वांसाठी आहे , पण जर तुम्ही वयाची साठी पार केली असेल तर —तर जरूर ऐका , कारण —–या गाण्याच्या सहा मिनिटा पुरते तरी तुम्ही चाळीस वर्षांनी तरुण व्हाल .
जाता जाता राग पहाडी वरील मला माहित असणारी काही गाणी
करवटे बदलती रहे आधी रात हम —–आपकी कसम
दिल पुकारे ,आरे आरे ——————–ज्युयेल थीफ
जो वादा किया ओ निभाना पडेगा ——ताज महाल
रहे ना रहे हम —————————-ममता
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .