नवीन लेखन...

ये ना पूछो किधर ये ना पूछो कहाॅं..

१९८२ सालातील गोष्ट आहे. मी माझ्या एका मित्राबरोबर ‘लक्ष्मी नारायण’ टाॅकीजला ‘प्रोफेसर’चा मॅटिनी शो पहायला गेलो होतो. १२ वाजता चित्रपट सुरु झाला तरी मित्र काही आला नाही. तो दहा मिनिटे उशिराने आला. आत गेल्यावर पाहिलं.. तर ‘हमारे गाव कोई आयेगा…’ हे गाणं सुरु झालेलं होतं. उरलेला चित्रपट पाहिला, अतिशय आवडला. गाणी, फोटोग्राफी, कलाकार आणि कथानक सगळीच ‘भट्टी’ मस्त जमलेली होती.‌

हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी मी पहात होतो.. साधारणपणे दहा वर्षांनंतर, चित्रपटाची नवीन प्रिंट काढली जाते. तशीच ही प्रिंट, नवी कोरी होती. त्याकाळी चित्रपटाच्या पोस्टरवर इस्टमनकलर, गेवाकलर, फुजीकलर, ओरवोकलर अशा निगेटिव्हच्या कंपन्यांची नावं असायची.. त्यातील हा फुजीकलर चित्रपट होता. दार्जिलिंगचं निसर्ग सौंदर्य या चित्रपटात अप्रतिमरित्या बंदिस्त केलेलं होतं.. दार्जिलिंग मधील मिनी ट्रेनसोबत केलेलं ‘मैं चली ऽ मैं चलीऽ..’ हे गाणं या चित्रपटाचं खास आकर्षण आहे..

May be a closeup of 1 personया प्रोफेसर चित्रपटातील नायिका, कल्पना मोहन मला फार आवडली. तिच्या चेहऱ्यात मला हाॅलीवुडची थोडी अ‍ॅंड्री हेपबर्न, थोडी एलिझाबेथ टेलरची झाक जाणवली..

मी देव आनंदचा फॅन आहे, साहजिकच ‘तीन देवीयाॅं’ मी तीन वेळा पाहिला. यामधील एक देवी, कल्पना आहे. यातील तिची भूमिकाही सिने अभिनेत्रीचीच आहे. ‘अरे यार मेरी..’ या गाण्यातून देव आनंद तिला सांगतो की, तू घुंगट ओढून घे.. म्हणजे तुला कोणीही ओळखणार नाही.. मात्र ती काही ऐकत नाही. ती सर्व गावकऱ्यांसमोर धुंद होऊन नाचते, गाते.. साहजिकच तिला सगळं पब्लिक ओळखतं.. आणि तिची मोठी पंचाईत होते.. गाणं तर अप्रतिम आहेच, हे गाणं एकदा पाहून, माझं कधीच समाधान होत नाही…

परवा सहजच कल्पनाच्या जीवनाबद्दल, गुगलवर माहिती वाचू लागलो.. तर माझ्या अंगावर काटा आला! एका सुंदर, गुणी अभिनेत्रीच्या वाट्याला, असं जीवन यावं? हे मला काही खरं वाटेना.. मात्र ते कटू ‘सत्य’ होतं..

१९४६ साली तिचा जन्म, भारताचं नंदनवन, काश्मीर मधील श्रीनगर येथे झाला. तिचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे जवाहरलाल नेहरूंशी जवळचे संबंध होते. कल्पनाचं खरं नाव अर्चना. तिने लहानपणापासून पंडित शंभू महाराज यांचेकडून शास्त्रशुद्ध कथ्थक नृत्य शिकून घेतलं होतं. नेहरूंकडे कोणी परदेशी पाहुणे आले की, हिच्या नृत्याचा कार्यक्रम हा ठरलेला असे. कल्पनाला चित्रपटात काम करण्याची महत्त्वाकांक्षा होतीच.. तशी संधी तिला, बलराज साहनी यांच्यामुळे मिळाली. ती मुंबईत आली..

तिला पहिला चित्रपट मिळाला, ‘प्यार की जीत’. नंतर दुसरा ‘नाॅटी बाॅय’! यामध्ये किशोर कुमार तिचा नायक होता. तिसरा चित्रपट मिळाला, ‘प्रोफेसर’! या चित्रपटाने अफाट यश मिळविले. अवघ्या सोळाव्या वर्षी मिळालेल्या या यशाने तिला असं वाटलं की, पुढे खूप मोठी प्रगती होईल.. मात्र तो तिचा निव्वळ भ्रमच ठरला. शम्मी कपूरने या चित्रपटाच्यानंतर तिच्याबरोबर काम करण्यास स्पष्ट नकार दिला. तीन वर्षांनंतर तिचा ‘सहेली’, ‘तीन देवीयाॅं’ व ‘तिसरा कौन’ हे चित्रपट आले. यातील दोन चित्रपटात तिचा नायक होता, फिरोज खान!

फिरोज खानही तिच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. त्यानंतर तिचे चारच चित्रपट आले.. ‘तस्वीर’, ‘पिकनिक’, ‘प्यार किये जा’ व ‘नवाब सिरजुदौला’.. एवढ्या दहा चित्रपटांनंतर तिची कारकिर्द संपुष्टात आली…

तिने १९६५ साली सुप्रसिद्ध पटकथाकार व दिग्दर्शक सचिन भौमिक यांच्याशी लग्न केले. साठ आणि सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांचे ते यशस्वी लेखक होते. मात्र हे लग्न दोन वर्षही टिकलं नाही.‌.

१९६७ साली तिनं पुन्हा एकदा लग्नाचा डाव मांडून पाहिला, यावेळी देखील पुन्हा डाव हरली. पाच वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. तिच्या पदरात एक मुलगी होती. तिला तिनं लहानाचं मोठं केलं.

काही काळानंतर ती मुलीसह पुण्यात कल्याणीनगरला राहू लागली. जिनं एक काळ चित्रपटसृष्टी गाजवलेली होती, तिला अशा ग्लॅमरस जगापासून दूर अज्ञातवासात रहावं लागतं होतं..

मुलीचं लग्न झालं. ती अमेरिकेला गेली. आता कल्पना एकटी राहिली. तिच्या एका जमिनीच्या घोटाळ्याबाबत तिघा जणांनी, तिच्यामागे ससेमिरा लावला. दरम्यान तिला कॅन्सरने पछाडले होते. २००७ पासून त्या जमिनीच्या वादातून तिला ताणतणावाला सामोरे जावे लागले.‌ तब्येत खालावत गेली. मुलीने तिला पूना हाॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. अखेर कॅन्सरने तिच्यावर मात केली. काश्मीरमध्ये उमललेली एक कळी, पुण्यात कोमेजून गेली…

चंदेरी दुनियेतील असंख्य सिने अभिनेत्रींचा शेवट असा दारूण आणि दयनीय झालेला आहे.. ज्यांनी एक काळ रसिकांच्या हृदयावर राज्य केलेलं असतं, त्या अशा समाजापासून दूर काळोखातच ‘लुप्त’ होतात. वयाच्या चाळीशीनंतर सौंदर्य हे झपाट्याने उतरणीला लागतं. ज्या अभिनेत्री नव्वदी गाठतात, त्यांच्याकडे तर, पहावतही नाही.. एके काळच्या, गोबऱ्या गालांवर सुरकुत्यांचं जाळं असतं…

एकदा मला वाटलंही, जर मला कल्पनाबद्दल कळलं असतं तर, पूना हाॅस्पिटलमध्ये जाऊन तिला निदान पाहता तरी आलं असतं.. पण.. माझ्या डोळ्यासमोर, पडद्यावरची जी कल्पना होती, ती तर नक्कीच दिसली नसती.. त्या सुंदर कल्पना ऐवजी आजाराने कृश झालेली, निस्तेज अशा अभिनेत्रीला सामोरं जाण्याचं धाडस मला झालं नसतं.. किंबहुना तीच म्हणाली असती…

‘मैं चलीऽ मैं चलीऽ

ये ना पूछो किधरऽ.. ये ना पूछो कहाॅंऽ..

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२५-८-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..