सगळं कार्य आटपून रवींद्र माजघराच्या मागच्या दारातून वाडीत आला. काल रात्री एक पर्व संपलं होतं, त्याच्या आईचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता आणि मग रात्री पासूनच गावातल्यांची लगबग सुरू झाली होती. मोठी बहीण मुंबई ला असल्याने तिला रात्री त्रास देण्यात अर्थ नव्हता पण पहाटे मात्र तिला फोन करून झालेली दुर्घटना सांगितली होती रवींद्रने आणि ताई सुद्धा आईच्या शेवटच्या दर्शना साठी लागलीच मुंबईहून निघून आली होती.
श्रीवर्धन गाठायचे म्हणजे 5 ते 6 तास लागणार हे माहीत होते पण मुंबईचे ट्राफिक कधी भरून येईल त्याला काही प्रमाण नसते. त्यामुळे 6.30 ला निघालेली बहीण घरी पोचायला 1.30 वाजला होता. बहीण आल्यावर मग हुंदके यायला लागले. पण आयुष्य जगून गेली होती त्यांची आई त्यामुळे एक समाधान होते. सुख हे मानण्यावर असतं असं रवीला त्याची आई नेहमी म्हणायची त्यामुळे आयुष्यात दारिद्र्याचे चटके असे कधी बसले नाहीत घराला. असलेली परिस्थिती हसून स्वीकारायची अन कमरेला सुख नेहमी टांगून ठेवायचं म्हणजे जिथे जाऊ तिथे हसत जगण्याची वेळ येण्याची वाट पहावी लागत नाही असे ती रवींद्रला नेहमी सांगायची.
सर्वांचे दर्शन झाल्यावर म्हातारी ला चौघांनी खांद्यावर घेतले अन पुढच्या काही वेळात ते शव धगधगत्या ज्वालांमध्ये नाहीसे देखील झाले. मसणवटा वाडीला लागूनच असल्यामुळे फार लांब जावे लागले नाही. तेथूनच पुढे काही पावलांवर कित्येक युगानुयुगे अविरत जगणारा समुद्र होता.
घरी येऊन रविंद्रने अंघोळ उरकली आणि घरात जमलेल्या माणसांना टाळून तो माजघरातून मागच्या दरवाज्याने वाडीत आला. स्वतः रवींद्र पन्नाशीचा असल्याने आणि आयुष्य आई वडिलांबरोबर गेल्याने मन भावुक होणं स्वाभाविक होतं. आईचा ५० वर्षांचा सहवास रविंद्रने तिचं सगळं करण्यात घालवला होता. वडील काही वर्षांपूर्वी गेले तेव्हा जेवढा एकटेपणा जाणवला नाही तेवढा अत्ता त्याच्या मनाला जाणवत होता. वडील गेल्यावर आता तू आणि आई माझ्याकडे या कायमचे हे बहिणीचे शब्द रविंद्रने झिडकारले होते. आईला घर सोडवणार नाही हे रवी ला चांगलं ठाऊक होतं. त्यामुळे गेली काही वर्षे तो आणि आई या श्रीवर्धन मधे आपल्या घरात शांतपणे जगत होते. खरेतर आलेला दिवस ढकलत होते. कारण पोटासाठी करावं लागणारा घाट शहरात घेऊन जाणारा होता आणि घरात इतरांनी सुरू केल्या प्रमाणे पर्यटन सुरू करायला आईचा विरोध होता. “तुम्ही कोकणातली माणसं ना अशीच हेकट आहात, काही चांगलं घडतंय असं वाटलं की पाय ओढणारचं” या रवीच्या बोलण्याला आई नुसतं तोंड वाकड करून दाखवायची पण तिने कधीही पर्यटनास होकार दिला नाही.
या सगळ्या आठवणी, विचार, घटना रवींद्र च्या डोळ्यांसमोरून धावत होत्या आणि त्यात बुडालेला रवी केव्हा वाडी ओलांडून सुरीचे बन पालथे घालून त्या अथांग सागरा समोर केव्हा आला हे त्याचं त्यालाही कळले नाही. दिवसभराचा थकवा, मनाची झालेली घालमेल, चितेवरच्या ज्वालांनी डोळ्यात साठलेले ते शेवटचे क्षण सगळे सगळे त्याला सगळ्यांपासून दूर इथे या अमरत्व प्राप्त असलेल्या सागरासमोर घेऊन आले होते.
सांजवेळेस बुडत असलेला तो नारायण त्याच्यातल्या अनेक रंगाच्या छटांनी ते सारं आसमंत फुलवत होता, त्या विश्वाला मोहून टाकत होता पण त्या समोर असलेल्या रवींद्रला मात्र त्या सूर्याच्या एकटेपणा दिसत होता. रवींद्र त्या तापून परत शांत होत चाललेल्या वाळूत बसला आणि त्या समोरच्या दृष्याकडे पाहू लागला.
गावाकडचे घर,वाडी, शेती तीही थोडीफार या सगळ्यात काय राहिलं होतं. आईने लग्न कर म्हणून किती वर्षे आपल्या मागे तगादा लावला होता पण आधी जेव्हा मुलगी पहायची वेळ होती तेव्हा घर खर्च भागेल की नाही या विवंचनेत काळ गेला आणि मग वय वाढले त्यामुळे मुलगी मिळेनाशी झाली. शेवटी आता लग्न करायचे नाही हेच सत्य आहे हे मनाशी पक्के केले. “आमच्यापायी कशाला स्वतःच आयुष्य फुकट घालवतोस लेका, आम्ही काय तुला शेवटपर्यंत पुरणार नाही हो, अजूनही लग्नाचं बघ रे बाबा.” आईचे शब्द रवींद्र च्या मनात वाऱ्यासारखे घुमत होते. गावात घरोघरी नारळ, सुपारी होतीच त्यामुळे ते गावात विकायचा काही नेम नसायचा, कधी कोणास हवे असल्यास विक्री व्हायची अथवा पर्यटनासाठी आलेल्या कोणी विचारले तर. शेती मशागत करायला दुसर्यास दिली होती त्याबदल्यात तांदूळ यायचा त्यामुळे आयुष्यभर सकाळ- दुपार- रात्र भात खाण्यात गेली होती. नारळ- सुपारी- शहाळी- रामफळ- जायफळ- केळी हे विकून काही पैसे यायचे त्यात सारं भागवावे लागायचे. आईची औषधं, घर खर्च सारं जाऊन हाती काही फार पैसे उरायचे नाहीत. त्यामुळे त्याने लग्नाचा विचार सोडून दिला होता पण आईची शेवटची इच्छा तीच होती हेही त्याला ठाऊक होतं.
हे सगळे विचार तो आपल्या नजरेने समोर अस्ताला जाणाऱ्या सूर्याला सांगत होता तर तो सूर्य त्याचे दुःख आपल्या पोटात घेऊन त्या बदल्यात संधीप्रकाशातून अजून एक संधी देत होता. त्या सूर्यास्ताच्या नजाऱ्याला पाहताना रवींद्र च्या मनात विचार आला की या सूर्याने कित्येक युगांतरे पाहिली असतील तरी याचा स्थितप्रज्ञ पणा अजूनही तसाच आहे. पण आज माझ्या आयुष्यात युगांतर होतंय आणि तरीही मी असा भेदरलेला, दबलेला का आहे, नाही मलाही या सुर्यासारखं स्थितप्रज्ञ, अभेद्य व्हायलाच हवं, व्हायलाच हवं…. मनाशी निश्चय करून त्याने त्या अस्तास गेलेल्या सूर्यास हात जोडून नमस्कार केला आणि एका युगांतराला नव्याने सामोरा जायला निघाला.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply