युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जन्म १३ जून १९९० रोजी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे थोरले चिरंजीव. ते युवासेनेचे प्रमुख या नात्याने युवक संघटना सांभाळत आहेत. राज ठाकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आदित्य यांना युवकांची संघटना करण्यासाठी पुढे आणण्यात आले. आदित्य यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट व अन्य निवडणुकांमध्ये अभाविप व मनसेची विद्यार्थी संघटना यांच्यावर मात दिली.
उद्धव ठाकरे यांच्यासारखे आदित्य यांच्याकडेही संघटनकौशल्य आहे. मुंबईत जिजामाता उद्यानात पेंग्वीन आणण्याची कल्पना आदित्य ठाकरे यांचीच होती. कोणतीही निवडणूक न लढविणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेवरील असो वा राज्यातील युती सरकारवरील, ‘रिमोट कंट्रोल’चा ताबा कधी सुटला नाही. नंतर उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक टाळली. राज ठाकरेही या रिंगणाच्या बाहेरच राहिले. मात्र, आदित्य यांनी वरळीत पक्षमेळाव्यात आई रश्मी आणि बंधू तेजस यांच्या साक्षीने या रिंगणात उडी घेतली. कायद्याची पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या आदित्य यांचा २००७ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी ‘माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक’ या हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यांचा ‘उम्मीद’ हा गाण्यांचा अल्बमही प्रसिद्ध झाला आहे. २०१०मध्ये दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी युवासेनेची घोषणा करीत नातू आदित्य यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली. गेली पाच वर्षे ते या माध्यमातून सक्रिय राजकारणात आहेत.
३० वर्षांच्या आदित्य यांनी जन-आशीर्वाद यात्रेतून राज्यभर दौरा करून शिवसैनिक तसेच मतदारांचा कानोसा घेतला. त्यानंतर नवमहाराष्ट्र घडविण्याची हीच ती वेळ असे सांगत ते उमेदवार झाले. बाळासाहेबांना भेटण्यासाठी अनेकदा मुख्यमंत्री वेळ घेऊन ‘मातोश्री’वर यायचे. मंत्री, महापौर, खासदार, आमदार यांची तर तिथे नित्य वर्दळ. अशावेळी कशाला संसदीय राजकारणात यायचे, असा विचार उद्धव यांनीही पूर्वी केला असेल. पण आता बाहेरून राजकारण पाहण्यापेक्षा आत शिरून शिवसेना मजबूत करण्याचा हा प्रयत्न असावा. आदित्य ठाकरे यांच्या बद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. पण उद्धव ठाकरे ही शिवसेना कशी सांभाळणार ही चर्चाही झाली होतीच की. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ती टिकवून जोमाने वाढवली. त्यासाठी अर्थात काही वर्षे लागली.
आदित्य ठाकरे हे कवी असून त्यांचे दोन कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ठाकरे कुटुंबाच्या पाच दशकांच्या राजकीय प्रवासात निवडणूक लढविणारे आदित्य ठाकरे हे पहिलेच होते. २०१९ मध्ये वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे हे विधानसभेसाठी आमदार म्हणून निवडून आले. सध्या आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री म्हणून काम करत आहे. आदित्य ठाकरे यांचे राजकारणातील मूल्यमापन करायला काही वर्षे जावी लागतील.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply