नवीन लेखन...

युवकांपुढे एक अनोखा आदर्श

श्रीमंत बापाच्या पोटची वाया गेलेली ‘कारटी’ आपण नेहेमीच बघतो, पण……

 ६००० कोटींची उलाढाल आणि अब्जाधीश असणाऱ्या सावजी ढोलाकीया यांनी शिक्षण सुरु असतानाच आणि भविष्यात स्वतःचा उद्योग सांभाळायाची जबाबदारी येऊन पडणार आहे अश्या आपल्या मुलाला पाठवले कोचीनला, खडतर जगाचा अनुभव घ्यायला आणि काबाडकष्ट करून स्वतःच्या हिकमतीवर पैसे कमवून जगायला….

जगभरातल्या ७१ देशांमध्ये कारोबार असणाऱ्या सुरत येथील हरेकृष्णा डायमंड एक्सपोर्टसचे मालक असलेल्या सावजी यांनी दोनच वर्षांपूर्वी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते आणि कारण होते त्यांच्याकडे काम करणाऱ्या तब्बल १२०० लोकांना त्यांनी दिवाळी निमित्त भेट दिलेली घरे आणि कार्स. आज दोन वर्षानंतर चर्चेत आला श्री सावजी यांचा अमेरिकेत बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेला आणि भारतात एक महिन्याच्या सुट्टीवर आलेला २१ वर्षीय तरणाबांड मुलगा चि. द्रव्य.

श्री. सावजी यांच्या बिझनेस साम्राज्याची जबाबदारी आता ज्या द्रव्य या त्यांच्या मुलाच्या खांद्यावर थोड्याच दिवसांत पडणार आहे त्या मुलाला सावजी यांनी त्याची ही सुट्टी त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे केरळ येथील कोचीन येथे त्याच्या स्वतःच्या पायावर आणि जबाबदारीवर घालवण्यास सांगितले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःला पूर्णत: अपरिचित अश्या भारताच्या एखाद्या भागात एक महिना जावून राहणे आणि कुणालाही स्वतःची ओळख न सांगता , अत्यंत साधेपणाने कुठल्याही आलिशान जीवनाचा अंगीकार न करता स्वतःचा उदरनिर्वाह चालवणे अशी श्री सावजी यांच्या कुटुंबाची परंपरा आहे.

“एकदा बारा वर्षांपूर्वी लंडन इथल्या एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये आम्ही सर्व कुटुंबीयांनी गुजराथी पारंपारिक जेवण घेतले. बिल आले होते प्रत्येकी घसघशीत १०० पौंडस. इतके जास्त बिल कसे काय आले असे हॉटेल मालकाला सहजच विचारल्यावर हॉटेल मालक म्हणाला कि तुम्ही जेवणाची किंमत न पाहताच जेवण ऑर्डर केले आहे. इथे आमच्या कुटुंबाचे डोळे उघडले. इथेच आमच्या कुटुंबाने ठरवले कि आमच्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष यापुढे पैशाची किंमत जाणवण्यासाठी एक महिना खडतर आयुष्य जगेल.” द्रव्य म्हणाला.

याच प्रथेस अनुसरून आणि हे आव्हान स्वीकारून २१ जून २०१६ रोजी चि. द्रव्य केरळ येथील कोचीन मध्ये वडलांनी दिलेल्या कपड्यांचे तीन सेट्स आणि ७००० रुपये यांसोबत एक महिना रहायला गेला.

“मी माझ्या मुलाला ३ अटी घातल्या,” श्री सावजी टाईम्स ऑफ इंडियाला सांगत होते,”एक , तुला तुझे जगण्यासाठीचे पैसे वेगवेगळी कामे करून स्वतःला कमवायला लागतील. दोन, एका कामाच्या ठिकाणी एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ काम करावयाचे नाही. आणि तीन म्हणजे ,  तू कुठेही माझे नाव वापरायचे नाहीस, सोबत अगदीच संकटसमयी वापरण्यासाठी दिलेले ७००० रुपये वापरणार नाहीस आणि तुझा मोबाईल फोनही वापरणार नाहीस.

माझ्या मुलाने आयुष्याचे खरे रूप पाहावे, अनुभवावे , गरीब लोकांना आयुष्यात किती खस्ता खाव्या लागतात आणि पैसे कमावण्यासाठी किती खडतर आयुष्य जगावे लागते याची त्याला पुरेपूर कल्पना यावी अशी माझी इच्छा होती. कारण जगातले कुठलेच विद्यापीठ तुम्हाला हे अनुभवांचे जिवंत शिक्षण देऊ शकतच नाही.”  या एका महिन्याच्या कोचीन येथील वास्तव्यामध्ये द्रव्य याला अनेकानेक आव्हानांचा सामना करावा लागला.

गुजरात मधल्या एका गरीब घरातला बारावीतला मुलगा अशी स्वतःची ओळख देऊन द्रव्य कोचीन येथे राहिला.  एका संपूर्णतः अनभीज्ञ अश्या शहरात कुणाच्याही संपर्कावीना असलेला द्रव्य आणि त्यात तेथील मल्याळी भाषाही अजिबातच माहित नसण्याचेही एक मोठे आव्हान त्याच्या समोर उभे होते.  “माझे कामही मलाच शोधायचे होते. पहीले पाच दिवस माझ्याकडे काम तर सोडाच राहायला निट अशी जागाही नव्हती आणि त्यामुळे मी भयंकर विमनस्क झालो होतो. काम मिळवण्यासाठी मी जोडे झिझवलेल्या तब्बल ६० ठिकाणाहून मला काम न देताच हाकलून देण्यात आले.

नकार म्हणजे काय चीज आहे आणि या आत्ताच्या दिवसात काम मिळणे आणि त्याहीपेक्षा मिळालेले काम टिकवणे ही किती अवघड गोष्ट आहे हे मला तिथे जवळून अनुभवाला आले. मी माझ्या आयुष्यात आत्तापावेतो कधीच पैशांची चिंता केली नव्हती. वस्तूची किंमत न पाहताच वस्तू खरेदी करणारा मी एका बाजूला आणि कोचीन येथील या वास्तव्यात माझ्या रोजच्या जेवणासाठी ४० रुपये सुद्धा प्रचंड कष्टपूर्वक कमावणारा मी एका बाजूला ही वस्तुस्थिती मी शब्दशः कोचीनला जगलो.” अब्जाधीश चि. द्रव्य ढोलाकीया सांगत होता.

चेरनाल्लूर इथे द्रव्यला एका बेकरीमध्ये त्याची पहिली नोकरी मिळाली. पुढच्या आठवड्यात एका कॉल सेंटर मध्ये, त्याच्या पुढच्या आठवड्यात एका चपलांच्या दुकानात आणि सर्वात शेवटी एका मॅकडोनाल्ड आउटलेट मध्ये द्रव्य याने नोकरी केली. या एका महिन्यात चि. द्रव्य कोचीन येथे एका साध्याश्या हॉस्टेलमध्ये यशस्वीपणे राहिला आणि कष्टाची कामे करून त्याने तिथे चार हजार रुपये सुद्धा कमावले.

येत्या ५ ऑगस्टला चि. द्रव्य त्याच्या पुढील शिक्षणासाठी पुन्हा एकदा अमेरिकेतल्या पेस विद्यापीठात दाखल होणार आहे.

(बातमी सौजन्य – टाईम्स ऑफ इंडिया आणि )

http://timesofindia.indiatimes.com/city/kochi/Billionaire-dad-sends-son-to-Kerala-to-work-as-aam-aadmi/articleshow/53327403.cms

http://www.newindianexpress.com/cities/kochi/Billionaire-business-heir-waits-for-slice-of-hard-life/2016/07/22/article3541148.ece

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..