नवीन लेखन...

झाड म्हणालं…

पूर्वी अंगण मोठे असायचे. त्यात मुलांना खेळण्यासाठी जागा असायची. विशेष म्हणजे अंगणभर पुरेल अशी सावली देणारं मोठं झाडही असायचं. आजीच्या संगतीनं नातवंड झाडाखाली बसुन अनेक गोष्टी ऐकत बसायचे. ते बालपण खरच मोठे गमतीशीर आणि नशीबवान होतं.. असो…

अंगणातून रस्त्यावर आलेल्या आणि नंतर बोन्साय बनुन घराच्या गॅलरीत आलेल्या झाडाची स्वत:ची एक कहाणी असेल का? असू शकते ना? तर अंगणातलं हे झाड बोलू लागलं, म्हणालं, मलापण जरा बोलू द्या, खुप दिवस झाले कुऱ्हाडीचे घाव मुकपणाने सोसुन. आता बोललं पाहिजे….

जमिनीत रुजलेलं माझं बालपण अंकुरलं…. बहरलं… आणि वाढलं… उन, वारा, पाऊस अंगावर झेलतं वाढत होतं, फांद्यांचं फुटणं आणि पानांच बहरणं अनुभवलं होतं मी. जमिनीपासुन जरी उंच होत असलो तरी मुठीत माती घट्ट धरलेली होती. कधी सोडली नाही मातीची साथ. फांद्या फोफावू लागल्या, पानं बहरू लागली… मस्ती होती वाढण्याची.. जगण्याची. अशातच एक दिवस एक चिमणी उडत अलगद येऊन बसली माझ्या खांद्यावर… तिचा चिवचिवाट लोभस वाटू लागला, ऐकत रहावासा वाटू लागला. थोड्यावेळाने तिचा जोडीदारही आला. तसे क्षणभरात दोघेही उडाले.. थोड्या वेळाने दोघे परत आले. दोघांच्या चोचीत काड्या होत्या, घरटे बांधण्यासाठी. माझ्याच एका फांदीवर त्यांनी घरटं बांधलं. त्यांच चिवचिवणं मला रोज ऐकायला मिळेल हे पाहुन मनोमन समाधान वाटलं. चिमणा-चिमणीचा संसार बहरला… फुलला..

माझ्या फांद्यां पसरत होत्या, तशी माझी सावलीही वाढत होती. या सावलीत अनेक प्रकारची माणसे येऊन बसत होती. त्यांच्या गप्पांचे विषयही वेगवेगळे असायचे. काही खलबतेही करत रात्री बसुन माझ्या आडोशाला. काही रचत डाव, माणसांचे पाय ओढण्याचे. मी मात्र सारे जाणुनही गप्प असायचो. सगळं साठवून ठेवलंय आतल्या आत…

पुढे दिवस पालटत गेले, वातावरणात बदल होत गेले. तसे माझ्यातही बदल होऊ लागले. पानगळीचा मोसम सुरू झाला. माझ्याच अंगाचा भाग असलेली पानं मला सोडून जाऊ लागली. ज्यांच्या असण्यानं माझ्या सौदर्यांत भर पडत होती ते मला सोडून जाऊ लागले होते, त्यांचं हिरवेपण जाऊन शुष्कता आली होती. वाऱ्याच्या झुळूकीबरोबर ती माझ्यापासुन दूर जाऊन पडत होती. त्यांच्या दुरावण्याचं दु:ख होतं. पण जुनं गेल्यावरच नव्याला जागा मिळते हे मी जाणत होतो… त्यामुळे हे दु:ख क्षणभराचं होतं. ऋतू बदलला तशी नवी, हवीहवीशी कोवळी पानं पुन्हा माझ्या फांद्यांमधुन उमलू लागली. सृजनाच्या या सोहळ्याचं वर्णन तरी कसे करणार…

हे सारं चांगलं चाललेलं असताना, कुणाची नजर लागली कुणास ठाऊक? खांद्यावर कुऱ्हाडी घेऊन आलेल्या दोघांनी कशाचीही तमा न बाळगता थेट घाव घातला माझ्या हृदयावर… असंख्य वेदनांची त्सुनामी शरीरभर पसरली… वेदनेचा हुंकार पसरला… पण तो कुणाला ऐकू जाणार होता…!

कोण ऐकणार होत…!

दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..