सितार्यांची झगमगती दुनिया! चंदेरी दुनियेचा सोनेरी प्रकाश तरुणाईला आकर्षित न करेल तर नवलच. यात तरुणाईची काहीच चूक नाही कारण, मुळात हे वयच असं असतं जिथे मानव प्रजाती अनेक स्वप्नं पहात असते आणि त्याला सत्यात उतरविण्याच्या प्रयत्नांमध्ये असते. सध्या तंत्रज्ञान खूप प्रगत झालं असल्याने संपूर्ण विश्व जवळ आलं आहे अगदी इतकं जवळ की एका क्लिकवर जगात काय चालू आहे हे समजतं. अशात तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेले Celebrities सोशल मिडिया, न्युज चॅनल आणि प्रसिद्धी माध्यमांवर आपलं आयुष्यात काय चालू आहे याचे Updates देत असतात. यात तरुणाईला त्यांची महागडी जीवनशैली, त्यांना मिळणारा मानमरातब, त्यांना मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी इत्यादी गोष्टी दिसतात. मग काय या पाशात तरुणाई सहज अडकली जाते. वर नमुद केल्याप्रमाणे तरुणाईला त्या सगळ्या गोष्टी आकर्षू लागतात. मग तरुणाई या चंदेरी दुनियेत कोणाचाही पाठिंबा नसताना आपलं नशीब आजमाविण्यासाठी प्रवेश करते. इथेच बरेच तरुण फसले जातात. पाठीशी काही अनुभव नाही, कोणाशी ओळख नाही, खिशात पैसे नाही, पैसे नाहीत त्यामुळे खाण्याचे व रहाण्याचे वांदे इ. गोष्टींचा अनुभव या पायरीवर तरुणांच्या नशीबात येतो. जे काही काळासाठी आलेले आहेत किंवा घरच्यांची परवानगी घेऊन आलेले आहेत त्यांचं ठीक आहे पण जे न सांगता घरातून पळून आले आहेत ते पुरते या पायरीवर फसतात आणि इथून नैराश्याची साथ त्यांना लाभते.
हल्ली काही वर्षांपूर्वीच या चंदेरी दुनियेत आणखीन एका नवीन प्रकाराने प्रवेश केला आहे तो म्ह्णजे वेब सिरिज. आजकाल जवळ जवळ सगळ्यांकडेच स्मार्ट मोबाईल असल्यामुळे या अगदी सहज बघता येतात. यात अनेक नवीन चेहरे तरुणांना दिसत असल्या कारणाने जे नवीन तरुण या क्षेत्रात पदार्पण करु इच्छितात त्यांच्या आशा अजून पल्लवित होतात. मग हे देखील त्या दृष्टीने आपली वाटचाल त्या दिशेने सुरु करतात. प्रयत्न सुरु करण्यापूर्वीपर्यंत सगळं ठीक असतं पण प्रत्यक्षात जेव्हा प्रयत्नांना सुरुवात होते तेव्हा बघता बघता अनेक वर्षं निघून जातात पण अपेक्षित यश काही लगेच मिळत नाही. अशा गोष्टींमुळेच मग या चंदेरी दुनियेला नावं ठेवण्यास सुरुवात होते. नवीन तरुण एक गोष्ट विसरतात इथे अनेक दिग्गज किंवा या क्षेत्रात मुरलेल्या व्यक्ती तुम्हांला वारंवार लेखांमधून, प्रगट मुलाखतींमधून मार्गदर्शन करीत असतात. पण आपण फक्त चंदेरी दुनियेच्या झगमगाटात एवढे गुंतलेले असतो की आपल्यावर या गोष्टींचा परिणामच होत नाही मग अशातच अपूर्ण ज्ञानामुळे तरुणांवर फसण्याची पाळी येते. या मुलाखती किंवा लेख किंवा या क्षेत्राशी निगडीत अनेक पुस्तकं जर वाचून आत्मसाद केली तर ही वेळ येणार नाही असं मला वाटतं. प्रत्येक क्षेत्रात टप्प्याटप्प्याने पुढे सरकता येतं. उदाहरणार्थ इयत्ता पहिलीतून आपण कधीच Direct Graduation ला जाऊ शकत नाही त्यासाठी पहिली ते चौदावी इयत्तांमध्ये उत्तीर्ण होऊनच Graduate होऊ शकतो.
वेब सिरिज बनविणं हा खूप कठीण Task असतो. नुसती कथा लिहिली एका मित्राने हौशीसाठी कॅमेरा विकत घेतला त्याला शूटींगसाठी बोलावलं आपल्यातल्या काही फिल्मवेड्या मित्रांनी दिग्दर्शन व अभिनय केला इतकं सोपं ते नक्कीच नसतं. जरी आपला चमू/ समूह अगदी आपल्या भाषेत Group असला तरी सगळं गणित येऊन अडकतं ते पैश्यांवर. जर निर्माताच नसेल तर या सगळ्या गोष्टींचा काय फायदा? आपल्या नशीबाने एखादा निर्माता जरी मिळाला तरी तो आपल्या सारख्या नवख्या लोकांवर का पैसे लावेल? जरी लावले तरी आपण त्याला त्याचे पैसे कधी व कसे परत करणार? या सगळ्या प्रश्नांची Confirm उत्तरं आपण जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत वेब सिरीज शूट करणं हे खूप अवघड होऊन जातं. पुढे शूट केल्यानंतर आणखीन जबाबदार्या वाढतात. वेब सिरीज कुठे दाखवायची? त्याची प्रसिद्धी कशी करायची? या प्रश्नांच्याही आधी काही प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर ठाऊक असतील तर आणि तरच आपण एक Successful Super Duper Hit Web Series बनवू शकतो.
हे सगळं वाचल्यावर तरुणाईला प्रश्न पडेल की या क्षेत्रात पदार्पण करायच की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर हो आहे पण नुसतं येऊ नका या क्षेत्राचा अभ्यास करुनच या. तुमच्यात संयम पाळण्याची क्षमता असेल तरच या. घरच्या आर्थिक बाबींची जुळवाजुळव झालेली असल्यास या. खूप वाचा, खूप शिका. मुळात कितीही शिकलो तरी अजून काहीतरी शिकायचंच आहे हा दृष्टीकोन घेऊन या क्षेत्रात या. हे सगळं करुन मनाची व मेहनतीची तयारी जर तुम्ही करुन याल तर निश्चितच या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल.
सरतेशेवटी एकच सांगू इच्छितो की कुठलंही क्षेत्र हे चांगलं किंवा वाईट नसतं. वाईट असतो तो आपला दृष्टीकोन.
–आदित्य दि. संभूस.
(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)
Leave a Reply