झुरळं अन् पाली ह्या काही शोभेच्या वस्तू नव्हेत. पण बाजारात त्या प्लॅस्टिकच्या मिळतात आणि काही लोक हौसेनं त्या आपल्या घराच्या भिंतीवर सजावट म्हणूनही लावतात. आता कोणाला काय आवडेल आणि कशात कला दिसेल ते सांगणे कठीणच!
मग असे असूनही माझ्या घरात प्लॅस्टिकचे झुरळ आणि तेही अगदी भिंतीवरच्या दिव्याखाली ठळकपणे दिसेल असे मी का लावले आहे असे तुम्ही विचाराल. पण मी हे ‘झुरळ’ लावले आहे ना त्याचा आणि गृहसजावटीचा काही संबंध नाही! ती एक आठवण आहे.
मी सध्या राहतो मुलुंडला. राजमाता चाळ नंबर १ मध्ये. इथे येऊन मला झाली वीस वर्षे. इथल्या बहुतेक राजमाता’ आसपासच्या सोसायट्यांमध्ये धुणंभांडी करतात. राजे’ समोरच्या ‘राजमाता’ वडापाव सेंटरमध्ये वडापाव चापतात आणि राजकुमार’ व ‘राजकन्या नाकातून सू सूं आवाज करत दंगा करत असतात. तर गोष्ट इथं रहायला येण्यापूर्वी सुरू होते. इथं येण्यापूर्वी मी चिंचपोकळी रेल्वेस्टेशनजवळ ‘भुताच्या चाळीत’ म्हणजे तिथं भुतं राहत होती म्हणून नव्हे, तिथं माणसंच राहतात पण चाळ स्मशानला अगदी खेटून म्हणून भुताची चाळ! तर मी कोकणातून मुंबईला नोकरीच्या शोधात आलो तेव्हा गावच्या मित्राकडे म्हणजे भुऱ्या सावत्याकडे चिंचपोकळीला मुक्काम ठोकला होता. आता आमच्या कोकणात कुणाला त्याच्या खऱ्या नावानं हाक मारण्याची पद्धत नाही. मला ‘बारक्या’ म्हणतात. तसे माझे खरे नाव विलास, विलास गावडे! आता ‘विलास’ हे नाव आमच्या तीर्थरूपांनी काय हेतूने ठेवले माहीत नाही! कारण ‘विलास’ नावाला शोभेल असे माझ्याकडे काही नाही. मी बुटका, जेमतेम ४ फूट ४ इंच. अंगानं किडकिडीत, रंगाने काळा नाही आणि तपकिरी नाही असा रापलेला, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा आणि हे सर्व कमी म्हणून की काय, ऐन तारुण्यात केस चक्क पांढरे! आता बोला! कितीही कल्पनाविलास केला तरी यात औषधाला तरी कुठे ‘विलास’ सापडेल का? ते असो! मला बारक्या म्हणतात. तसा हा भुया! तर आमच्या कोकणात अशी नावं ज्याला त्याला ठेवतात. पण कुणी रागवत नाही. सगळं प्रेमाचं. कुत्सितपणा मुळी देखील नाही. लोकांनी देवांची नावं नाही का अशी कायबाय ठेवली? कचऱ्या मारूती, भांग्या मारूती, पासोड्या, विठोबा, खुन्या मुरलीधर! ही काय नावं झाली? पुण्यात आलेल्या कुणा नवख्या माणसाला वाटेल पुण्याच्या रस्त्यावरून विठोबा बहुतेक पासोड्याचं गाठोडं घेऊन हिंडत असणार आणि ‘मुरलीधर’ खुनाची सुपारी घेत असणार! पण यात कुणाला नि खुद्द देवांनासुद्धा त्यात वाईट वाटत नाही.
तर आमच्या भुऱ्या सावत्यानं मला त्याच्या खोलीत आसरा दिला. त्याची खोली कसली? दहा बाय आठ फुटांची एक खोली. त्याच्या मागे स्वयंपाकघर. त्यात तो, त्याची बायको आणि चार पोरं! मला चिंता पडली. पण भुऱ्या म्हणाला, ‘बारक्या घाबरू नकोस, मी तुझी अगदी फर्स्ट क्लास सोय करतो बघ! चल ये दाखवतो तुला.’ असे म्हणून तो मला खोलीच्या मागे घेऊन गेला. मागे सुमारे दीडदोन फुटांवर रेल्वेचं कुंपण आणि पलीकडे रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रूळांचे जाळे. त्या दीडदोन फुटांच्या जागेत सिमेंटचा कोबा केला होता आणि एक जेमतेम फुटभर रूंद आणि चारसाडेचार फूट लांब बाकडे टाकले होते. ही आमची फर्स्ट क्लास सोय! भाडे फक्त पाच रुपये महिना आणि ते पण नोकरी लागल्यावर! दिवसभराच्या एस.टी.च्या प्रवासाने जाम शिणलो होतो. रात्री त्या बाकड्यावर पडलो. शेजारून जाणाऱ्या लोकलगाड्या आपल्याला चिरडणार तर नाही ना अशी सारखी धास्ती वाटत होती. तरी पण थोड्याच वेळात मला गाढ झोप लागली. रात्री कधीतरी नाकाजवळ काहीतरी गुदगुल्या झाल्यासारखे वाटून मी दचकून उठलो आणि डोळे उघडले आणि जाम टरकलो! माझ्या उरावर एक केसाळ राक्षस बसून शिंगे उगारतो आहे आणि गडगडाटी आवाज करून अंगातून प्रकाशाचे झोत फेकतो आहे असे भयंकर दृश्य दिसले! भीतीने माझी बोबडी वळली. दरदरून घाम फुटला आणि प्रतिक्षिप्त क्रियेनेच माझा हात एकदम वर उचलला गेला आणि मी त्याला झिडकारले! आणि एकदम ताठ उठून बसलो! क्षणभर मला मी कोठे आहे हे समजलेच नाही. थोड्याच वेळात मी पूर्ण जागा झालो आणि काय झाले हे लक्षात येताच मला खूप हसू आलं. स्वप्नात माझ्या उरावर बसलेला तो केसाळ राक्षस आता रेल्येच्या कुंपणावर बसून माझ्याकडे शिंगे वरखाली करून पाहत हेता! एक झुरळ! अगदी नाकावर बसल्यामुळे डोळे उघडताच मला ते प्रचंड वाटलं आणि त्याच वेळी शेजारून जाणाऱ्या लोकलचा धाडधाड आवाज म्हणजे त्याचा गडगडाट आणि रिकाम्या लोकलच्या दाराखिडक्यांमधून येणारा प्रकाश त्याच्या अंगावर आलटून पालटून पडत हेता. त्यामुळे त्याच्याच अंगातून प्रकाशाचे झोत पडताहेत असा क्षणभर भास झाला. त्याचवेळी मी ठरवले की, नोकरी मिळताच हा ‘फर्स्टक्लास’ सोडायचा! पण नोकरी मिळेपर्यंत दोन वर्ष गेली आणि तोपर्यंत मी या झुरळांच्या त्रासाला पूर्णपणे सरावलो, एवढेच नाही तर मला त्यांची मुळीच भीती वाटेनाशी झाली. उलट मीच त्यांच्या मिश्या पकडून भुऱ्याच्या पोरांची येला-जाता कमरणूक करत होतो.
-विनायक रा. अत्रे
(‘कथागुच्छ’ या कथासंग्रहातून)
Leave a Reply