परभणी हा शेतीप्रधान जिल्हा आहे. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४ लाख ८९ हजार ५०० हेक्टर्स असून,त्यापैकी जिरायती क्षेत्र ३ लाख ९९ हजार ४०० हेक्टर्स , तर बागायत क्षेत्र ९० हजार १०० हेक्टर्स एवढे आहे. परभणी जिल्ह्याचे ज्वारी हे प्रमुख पीक आहे. त्यासोबत कापूस, भुईमुग, उदीड, तूर ही पिके खरीपात घेतली जातात. तर रब्बीत करडई, हरभरा व गव्हाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात दुबार पीक क्षेत्रात परभणी जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो (३.५ लाख हेक्टर). महाराष्ट्रात एकूण रब्बी व खरीप पिकांचे सर्वात जास्त क्षेत्र असलेल्या पहिल्या ५ जिल्ह्यांमधे परभणीचा समावेश होतो. महाराष्ट्रात करडईचे सर्वात जास्त उत्पादन परभणी जिल्ह्यात होते.
कृषिविषयक संशोधन व प्रशिक्षणासाठी परभणी येथे स्थापन झालेले मराठवाडा कृषी विद्यापीठ हे जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.परभणी येथे विद्यापीठाचे मुख्यालय असून परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना येथील एकूण ११ कृषी महाविद्यालये विद्यापीठास संलग्न आहेत. कडधान्य, ऊस, कापूस, रेशीम यांवर विद्यापीठात संशोधन केले जाते. या विद्यापीठातील विद्यार्थी प्रामुख्याने मराठवाडा विभागातील शेतकर्यांसाठी चर्चासत्रे, प्रशिक्षण शिबिरे, मेळावे, प्रदर्शने नेहमी आयोजित करतात व आधुनिक शेतीसाठी तंत्रज्ञानाचा प्रचार करतात. विद्यापीठाच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शक पुस्तिकाही प्रकाशित केल्या जातात.
Leave a Reply