ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड इ. तालुक्यांत भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते.
जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
वसई भागात फुले, भाज्या (फळभाज्या, पालेभाज्या) यांचेही उत्पादन केले जाते. पालघर तालुक्यात वांगी, मिरची, गवार यांसारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. तर डहाणू तालुक्यात चिक्कू, पेरू, अननस, पपई इ. फळपिके अधिकतर घेतली जातात. जिल्ह्यातील वसईची केळी व डहाणूचे चिक्कू राज्यात प्रसिद्ध आहेत. मुंबई शहर व उपनगरे यांचे सान्निध्य असल्यामुळे जिल्ह्यातील फुले, फळे व भाज्या या कृषी मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे.
Leave a Reply