बेनिन

बेनिनचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Bénin; जुने नाव: दहोमी) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. बेनिनच्या पूर्वेला नायजेरिया, उत्तरेला नायजर व बर्किना फासो, पश्चिमेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात हा अटलांटिक महासागराचा उपसमुद्र आहे. दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्याजवळ बव्हंशी लोकवस्ती एकवटलेल्या बेनिनची राजधानी पोर्तो-नोव्हो असून कोतोनू हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

अंदाजे इ.स. १६०० ते १९व्या शतकाच्या अखेरपर्यंत हा भूभाग दहोमीचे राजतंत्र ह्या नावाने ओळखला जात असे. येथील कृष्णवर्णीय लोकांना युरोप व अमेरिका खंडांमध्ये गुलाम म्हणून विकले जात असे. ह्या व्यापारामध्ये दहोमीच्या राजाने प्रचंड संपत्ती कमावली होती. इ.स. १८९४ साली दहोमी राजतंत्राचा अस्त झाला व हा भूभाग फ्रेंचांनी काबीज केला. पुढील ६० वर्षांहून अधिक काळ फ्रेंच पश्चिम आफ्रिका ह्या वसाहतीचा भाग राहिल्यानंतर १९६० साली बेनिनला स्वातंत्र्य मिळाले. पुढील १२ वर्षे येथे हिंसाचार व यादवी सुरू होती. १९७२ साली माथियू केरेकू ह्या लष्करी अधिकाऱ्याने सत्ता बळकावली व बेनिनला मार्क्सवादी–लेनिनी साम्यवादाच्या दिशेकडे नेले. १९७५ ते १९९० दरम्यान हा देश बेनिनचे जनतेचे प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे.

१९९० साली झालेल्या एका क्रांतीदरम्यान केरेकूने पदत्याग केला व बेनिन पुन्हा एक लोकशाहीवादी राष्ट्र बनले. सध्या येथे अध्यक्षीय प्रजासत्ताक असून २००६ सालापासून यायी बोनी हा राष्ट्राध्यक्षपदावर आहे. बेनिन अर्थिक दृष्ट्या एक कमकूवत देश असून येथील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबुन आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण अत्यंत कमी असून मानवी विकास निर्देशांक देखील खालच्या पातळीवर आहे. बेनिन आफ्रिकन संघ, ला फ्रांकोफोनी, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : पोर्तो-नोव्हो
सर्वात मोठे शहर : कोतोनू
अधिकृत भाषा : फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस : १ ऑगस्ट १९६० (फ्रान्स पासून)
राष्ट्रीय चलन : पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*