पितळी भांड्यांचे शहर म्हणून भंडारा शहराची व जिल्ह्याच्या नावाची व्युत्पत्ती मांडली जाते. ‘भाणारा’ शब्दापासून ‘भंडारा’ हे नाव पडले असेही म्हटले जाते. या भागात १२ व्या शतकातील एका शिलालेखात भंडारा शहराचा भाणारा असा उल्लेख आढळतो. ‘भाण’ हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात असावा, असे अनुमान निघते. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिद्ध असल्यामुळे भाण शब्दावरून ‘भाणारा’ असे नाव पडून पुढे त्याचा अपभ्रश ‘भंडारा’ असा झाला असावा.पण स्थानिक लोक आजही भंडारा शहराच्या नावाचा उच्चार ‘भाणारा’ असाच करतात.
भंडारा जिल्ह्याचे अस्तित्व ११व्या शतकातदेखील होते याची नोंद रतनपूर (जि. बिलासपूर) येथील उत्खननात सापडलेल्या शिलालेखावरती आहे. महानुभव पंथाच्या लीलाचरित्र या पवित्र अशा ग्रंथात भंडारा जिल्ह्याचा संदर्भ अनेकदा आलेला आढळतो. उत्तम निसर्गसंपदा लाभलेला हा जिल्हा १७४३ पर्यंत गवळी राजवटीखाली होता. गवळी राजवटीत बांधलेला किल्ला भंडारा शहरातच असून त्याकाळी बांधलेला खांब तलाव आजही टिकून आहे. भंडारा जिल्हा अधिकृतरीत्या १८२१ मध्ये अस्तित्वात आल्याची नोंद इतिहासात आढळते. त्यानंतर १८५३ पर्यंत येथे मराठेशाही होती. मराठेशाहीच्या वारसदारा-अभावी भंडारा जिल्हा १८५३ मध्ये इंग्रजांच्या हाती गेला. पूर्व महाराष्ट्रातील (विदर्भातील) या जिल्ह्याचे १९९९ मध्ये विभाजन करण्यात आले व ‘गोंदिया’ जिल्हा निर्माण करण्यात आला.
Leave a Reply