सिन्नर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत हे नाशिकचे सचे औद्योगिक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी सुमारे २७०० हेक्टरच्या परिसरात १७५ मध्यम व मोठे औद्योगिक प्रकल्प कार्यरत आहेत.
जिल्ह्यात सातपूर, अंबड, मालेगाव, पेठ व मनमाड या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून ६ साखर कारखाने सुध्दा आहेत. नाशिकरोड येथे नोटा छापण्याचा कारखाना असून तेथे एक, दोन, पाच, दहा, पन्नास आणि शंभर रुपयांच्या चलनी नोटा छापल्या जातात. केंद्र सरकारद्वारा संचालित इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये इंदिरा विकास पत्रे, किसान विकास पत्रे, पोस्टल ऑर्डर्स, पासपोर्ट आदींची छपाई केली जाते.
इगतपुरी येथे नीलगिरीच्या झाडापासून कागद बनविण्याचा प्रकल्प आहे. जिल्ह्यातील येवल्याचे शालू, पैठणी साड्या व पितांबरदेखील (रंगबिरंगी धोतर) प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातील मालेगाव हे सोलापूर, इचलकरंजीप्रमाणेच राज्यातील हातमाग-यंत्रमाग उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे.
द्राक्ष हे या भागातील प्रमुख पीक असल्यामुळे द्राक्षावर आधारित उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर असुन ‘वायनरी’ उद्योगाचे (वाईन निर्मिती) आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख केंद्र म्हणून नाशिक प्रगती साधत आहे. जिल्ह्यातील कांदा व अन्य भाजीपाला यांचा पुरवठा महाराष्ट्रभर केला जातो. हा इथल्या शेतकर्यांच्या दृष्टीने मोठा व्यवसाय आहे.
Leave a Reply