जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट – जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी झाला असला तरीही मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला होता. बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रेट मेडिकल कॉलेज, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. जगन्नाथ शंकर शेट हे आधुनिक मुंबईच्या (पर्यायाने पुढील काळातील महाराष्ट्राच्या) शिल्पकारांपैकी एक होत. आचार्य अत्रे यांनी तर नानांना ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट अशीच पदवी दिली.
बाळशास्त्री जांभेकर – १८३० पासून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून कार्य केले. १८३४ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये (साहाय्यक प्राध्यापक) असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. एल्फिन्स्टन महाविद्यालयातील ते पहिले भारतीय असिस्टंट प्रोफेसर होत. मुंबई परसिरातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक, तसेच मुंबईतील पहिल्या ट्रेनिंग कॉलेजचे संचालक याही पदांवर त्यांनी कार्य केले.
दादोबा पांडुरंग – यांचे पूर्ण नाव दादोबा पांडुरंग तर्खडकर. त्यांचा जन्म दि. ९ मे, १८१४ रोजी मुंबई येथे झाला. एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली. मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजचे संचालक, एका विभागाचे डेप्युटी कलेक्टर या पदांवर त्यांनी कार्य केले. परमसहंस सभा, मानवधर्म सभा, ज्ञानप्रसारक सभा या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतून सामाजिक व शैक्षणिक कार्य केले.
दादाभाई नौरोजी – दि. ४ सप्टेंबर, १८२५ रोजी दादाभाई नौरोजी यांचा जन्म मुंबई येथे झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. या कॉलेजात प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय म्हणून ते गणले जातात. ‘ज्ञानप्रप्रसार सभा’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील पहिली कन्याशाळा सुरू केली.
फिरोजशहा मेहता – यांचा जन्म दि. ४ ऑगस्ट, १८४५ रोजी झाला. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षीच त्यांनी एम.ए. ची पदवी संपादन केली. इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन भारतात परत आल्यावर त्यांनी मुंबईत वकिली सुरू केली. १८८४-८५ मध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवर त्यांची निवड झाली. या महानगरपालिकेचे ते जवळजवळ ४० वर्षे सभासद होते. त्यांना चार वेळा मुंबईचे महापौर होण्याचा मान मिळाला. त्यांना ‘मुंबईचा सिंह’ असे संबोधले जात असे.
डॉ. सलीम अली – आंतरराष्ट्रीय ‘यातीचे पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांच्या कार्याचे मुख्य केंद्र मुंबई हेच होते.
याचबरोबर न्यायमूर्ती रानडे, जमशेदजी नुसरेवानजी टाटा, मॅडम आर. के. कामा, भाऊ दाजी लाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एफ. नरिमन, होमी भाभा, कॉम्रेड श्रीपाद डांगे, बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण, जॉर्ज फर्नांडिस, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांसारख्या विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गजांनी मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे तसेच मुंबईचा लौकिक वाढवला आहे.
Leave a Reply