डॉ. केशव बळीराम हेडगेवार – डॉ.हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये केली. यांचे बालपण नागपुरातच गेले व यांचे शालेय शिक्षणही येथेच झाले. त्यांना रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक म्हटले जाते.त्यांनी अविवाहित राहून राष्ट्रकार्य करण्याचा संकल्प केला होता. तो त्यांनी रा. स्व. संघाच्या कार्याच्या माध्यमातून पूर्ण केला. त्यांच्या कार्याचे मुख्य केंद्र नागपूरच होते.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – २६ जून, १८७१ यांचा नागपूरमधे जन्म झाला. एक उत्तम विनोदी लेखक, नाटककार, व टीकाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. टीका लेखनाचा नवा प्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. त्यांचे ’सुदाम्याचे पोहे’ हे अत्यंत गाजलेले पुस्तक असून ‘ प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा’ ही महाराष्ट्राचा अभिमान व्यक्त करणारी त्यांची कविता संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. १९२७ सालच्या १३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
जगन्नाथ रघुनाथ घारपुरे- जन्म २४ जून ,१८७२ रोजी यांचा जन्म नागपूर येथे झाला. हे संस्कृतचे अभ्यासक होते. यांनी पुण्यात इंडियन लॉ सोसायटीची स्थापना केली. यांनी हिंदू आणि रोमन कायदेपध्दती आदी विषयांवर पुस्तके लिहिली आहेत.
सुरेश भट – महाराष्ट्रातील एक दिग्गज कवी म्हणून त्यांची ख्याती आहे.त्यांनी गझल हा वाड्मय प्रकार मराठीत लोकप्रिय केला. एल्गार, रंग माझा वेगळा, झंझावात यांसह त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. यांचे वास्तव्य नागपुरामध्येच होते. गडचिरोली येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
सी.के.(कोट्टारी कंकय्या) नायडू – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रिकेट पटू कर्नल सी.के. नायडू यांचा जन्म नागपूरचाच. आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती.त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच यांना पद्मभूषण सन्मानही प्राप्त झाला होता.षटकारांचे बादशहा म्हणून त्यांना ओळखले जात.
आदिती पंत – या समुद्री वैज्ञानिकाचा जन्म नागपूर येथे झाला.या अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणार्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोग शाळेत वैज्ञानिक म्हणून कार्य केले
त्याचप्रमाणे जेष्ठ साहित्यिक राम शेवाळकर आणि कविवर्य ग्रेस यांचा जन्मही नागपूरचाच आहे.
Leave a Reply