नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे; पूर्वेला जळगाव; आग्नेयेला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, पश्चिमेला ठाणे, आणि वायव्येला डांग व सुरत (गुजरात) असे जिल्हे वसलेले आहेत. नाशिक जिल्हा हा तापी व गोदावरीच्या खोर्यात उत्तर महाराष्ट्रात वसला आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग डोंगररांगानी व्यापला असून या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन या भागात विविध कालावधींत सुमारे ३८ डोंगरी किल्ले उभारण्यात आले. तौला, सप्तशृंगी व साल्हेर ही जिल्ह्यातील उंच शिखरे असून साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण राज्यातील दुसर्या क्रमांकाचे उंच शिखर आहे.
गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी याच जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळ उगम पावून पूर्वेकडे वाहत जाते. मोसम, गिरणा, पांझरा, कादवा, बाणगंगा, दारणा व या जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. नाशिकमध्ये वाहणार्या जवळजवळ सर्व नद्या जिल्ह्यातच उगम पावतात हे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गोदावरी नदीवरील गंगापूर धरण, गिरणा नदीवरील चणकापूर व नांदगाव धरण तर दारणा नदीवरील दारणा धरण हे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प आहेत. गोदावरीवरील गंगापूर हे देशातील पहिले मातीचे धरण होय. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे २०% क्षेत्रावर वने आहेत. जिल्ह्यातील जंगल क्षेत्र प्रामुख्याने पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात म्हणजेच सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी व बागलाण या तालुक्यांमध्ये एकवटलेले आहे. साग हा वृक्ष प्रामुख्याने या वनांत आढळतो. याशिवाय ऐन, बांबू, शिसव, खैर, जांभूळ, मोह इत्यादी वृक्षही वनांत आढळतात.
Leave a Reply